महिला सुद्धा अल्लाने निर्माण केलेला माणुसच आहे

[dropcap]पु[/dropcap]रुषांच्या बरोबरीने महिलांना सुद्धा मशीदीत नमाज पडण्याचा अधिकार बजावता यावा यासाठी जुबेर व यास्मिन पीरजादे या पुणेवासीय दांपत्याने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामागील कारणांची उकल करण्यासाठी ‘द लिफलेट मराठी’च्या संपादकांनी जुबेर पीरजादे यांचेशी बातचीत केली. ती बातचीत संपादित स्वरुपात प्रस्तुत करीत आहोत.

 

द लिफलेट: तुम्ही आणि यास्मिन यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केलेली आहे, की महिलांना पुरुषांसोबत मशीदीमध्ये नमाज पढण्याचा अधिकार आहे. प्रश्न असा आहे की हा अधिकार जर आहे तर आजपर्यंत कोणीही तो अंमलात का आणला नाही? 

जुबेर पीरजादे: हा अत्यंत चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. मला तुम्हाला असं सांगायचं आहे की चार पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी जिथं राहतो बोपोडीत, तिथं मशीदीच्या ट्रस्टींना एक अर्ज दिला की बोपोडी मशीद मध्ये आपण महिलांना बोलावून त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनाचा कार्यक्रम घेऊ या. तो अर्ज आम्ही दिल्यानंतर आमच्याच काही मित्रांनी जे उलेमा होते, त्यांनी असा अर्ज दिला की मुस्लिम महिलांना मशीदीमध्ये परवानगी नाही. त्यांना मशीदमध्ये परवानगी नाही. धर्मानुसार ते मशीदमध्ये येऊच शकत नाहीत. तेव्हा तुम्ही यांना आहा कार्यक्रमाला मशीदीमध्ये परवानगी देऊ नका, असा जेव्हा त्यांचा अर्ज आला तेव्हा आश्चर्य वाटलं. धर्म तर समानता सांगतो, तर अशी विषमता कशी काय असू शकते? मग आम्ही तिथून अभ्यासाला सुरुवात केली. तिथून आमच्या अभ्यासाचा प्रवास सुरु झाला की नेमकं धर्मात काय आहे? मग आम्ही अभ्यास करत असताना असं आमच्या लक्षात आलं की कुराणमध्ये कुठंही असं लिहीलेलं नाही की महिलांनी मशीदमध्ये येऊ नये. आणि हदीस मध्ये पण कुठंही असं नाही आहे की महिलांनी मशीदमध्ये येऊ नये. याउलट  पैगंबर साहेबांनी असं सांगितलं, प्रेषित महम्मद सल्ललाहू वसल्लम साहेबांनी असं सांगितलंय की ज्या महिला मशीदमध्ये येत असतील त्यांना तुम्ही रोखू नका, असा स्पष्ट आदेश आहे आणि हा आदेश पूर्ण जगभरातील उलेमा फॉलो करतात, ह्याला मानतात. आता प्रश्न राहिला भारतातली परिस्थिती तुम्ही विचारली की हे तुमच्या लक्षात का नाही आलं? वर्षानुवर्ष आम्हाला उलेमांनी, काही उलेमांनी अशी अर्धवट किंवा चुकीची किंवा अशी माहिती दिली की महिला मशीदमध्ये येऊच शकत नाही. आणि आम्ही सगळा समाज याच परंपरेला किंवा याच गोष्टीला मान्य करून पुढे चालत आलो. आमच्या समोर जेव्हा प्रश्न आला आणि त्याला अनुसरून आम्ही जेव्हा अभ्यास केला त्यावेळेला असे मोठमोठे हदीस समोर आले, की त्याला जगातला कोणताही उलेमा नाकारू शकत नाही. त्यामुळे एवढे वर्ष या विषयाला झाकून ठेवलेलं होतं आणि काही उलेमा लोकांना चुकीची माहिती, अर्धवट माहिती देत होते, त्यामुळे लोकांना असं वाटत होतं की उलेमा हे जे सांगतायत ते बरोबर आहे, म्हणून याचा कोणी उपभोग घेतला नाही.

 

द लिफलेट: पण तुम्हाला असं का वाटलं की महिलांनी सुद्धा मशीदीत यावं? सहसा असं पुरुषांना वाटत नाही, आपल्या समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्येच. मग तुम्हाला का असं वाटलं?

जुबेर पीरजादे: महिला ही सुद्धा अल्लाने निर्माण केलेला माणुसच आहे. जसा मी आहे तशी माझी बायको आहे, तशी माझी बहीण आहे, तशीच माझी आई आहे. आणि धर्माने टाकलेले सर्व कर्म, हज असेल, नमाज असेल, उमरा  असेल, जेवढं मला आहे तेवढंच महिलांना सुद्धा आहे. आणि पैगंबर साहेबांच्या काळात पाच वेळा महिला मशीदमध्ये पैगंबर साहेबांच्या बरोबर नमाज पढायच्या. हे तेव्हापासून तर आजपर्यंत पूर्ण अरब जगामध्ये आशिया खंड असेल, अमेरिका असेल, आफ्रिका सगळ्या ठिकाणी महिला मशीदमध्ये येऊनच नमाज पढतात. मग भारतातच या मुस्लिम महिलांवर अघोषित बंदी का, असा प्रश्न माझ्या मनात नेहमीच यायचा. त्यामुळे मला असं वाटायचं की महिलांना जेव्हा हक्क आहेत, त्यांचा अधिकार आहे. एक तर संविधानाने त्यांना हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. ह्या आमच्या मुद्याला दोन बाजू आहेत. मला तुम्हाला सांगावं वाटतं साथीदार साहेब तुम्ही लक्षात घ्या.

 

 

एक तर घटनेनं अधिकार दिला आहे की पुरुष आणि महिला समान आहेत. महिला आहे म्हणून कुठंही रोखता येणार नाही, हा एक अधिकार आहे. घटनेनं दुसरा एक अधिकार दिला आहे की तुम्ही तुमच्या धर्माला अनुसरून पूर्ण स्वातंत्र्य आहे, तुम्ही पाहिजे तसं वागू शकता, धर्मानुसार आचरण करू शकता. तर धर्माने सुद्धा परवानगी दिलेली आहे की तुम्ही मशीदमध्ये येऊ शकता.

 

 

ही जी चुकीची माहिती लोकांना सांगतायत हे दोन्ही कायद्याचं उल्लंघन करतायत. धार्मिक कायद्याचंही करतायत आणि राज्यघटनेचंही उल्लंघन करतायत. म्हणून माझ्या मनात हे नेहमी यायचं की महिलांना पुरुषांबरोबर म्हणजे मशीदमध्ये जसे पुरुष नमाज पढतात तसे महिलांनाही जागा असली पाहिजे.

 

द लिफलेट: शबरीमला प्रकरणामध्ये सुद्धा संवैधानिक अधिकार होतेच. परंतु सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर  केरळसारख्या पुरोगामी लोकांच्या सत्तेखाली सुद्धा धर्मांध व महिलाविरोधी शक्तींनी महिलांना मज्जाव करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तुमच्या प्रकरणात तुम्हाला दोन्ही प्रकारचे अधिकार असतांना जेव्हा यावर निर्णय येईल तेव्हा फार मोठा गदारोळ उठणार आहे. तो गदारोळ शांत करण्यासाठी आपल्या समाजातील पुरोगामी विचारवंत किंवा संघटना किंवा राजकीय पक्षाचे नेते अशा लोकांची कितपत तयारी असणार आहे?

जुबेर पीरजादे: यात शबरीमलाचा तुम्ही उल्लेख केला. मी तुम्हाला मुस्लिम समाजाची बाजू सांगतो की नेमकी परिस्थिती कशी होईल. आता आम्ही पीटीशन दाखल केलंय त्याच्यामुळे सगळ्या मीडियाला, प्रेसला बातम्या आहेत. विषय लोकांपर्यंत पोहचलाय. आता काय झालं, मुस्लिम समाजामध्ये एक मोठी गोष्ट ही आहे की ते प्रत्येक गोष्ट धर्मावर तपासतात. जुबेर जो बोलतोय त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत आणि येथून पुढे उलेमा जे सांगतील कदाचित त्यांच्या शब्दावर ते विश्वास ठेवणार नाहीत. आता काय करतील, तर ते कुराण आणि हदीसमध्ये तपासतील की सत्य काय आहे? यात खरं कोण बोलते आणि खोटं कोण बोलते. आणि मुस्लिम समाज नेहमीच सत्याच्या बाजूने उभा राहिलाय. आणि भविष्यात त्याला सत्य कळाल्यानंतर शंभर टक्के, सत्य जे आहे त्याच्या बाजुनेच उभा राहील. आणि एकदा त्यांच्या लक्षात हा विषय आला की धर्माने आपल्याला परवानगी दिलेली आहे, तर तो एकदम सहजतेने आणि अत्यंत आनंदाने हे सर्व स्वीकारेल.

 

द लिफलेट: अनेक महिलांनी मला म्हटलेलं आहे की हा यास्मिनचा एकटीचा लढा नाही तर हा आमचा आवाज आहे. आम्ही यास्मिनला ओळखत नसलो तरी, असं मला खाजगीत अनेक महिलांनी म्हटलेलं आहे. दुसरीकडे काही  पुरोगामी मुस्लिम पुरुष असेही आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे की याचिकाकर्त्यांना कदाचित आर.एस.एस. च्या लोकांनी अशी चिथावणी दिली असेल. तेव्हा आपल्या समाजात जे सकारात्मक विचार करतात व जे नकारात्मक विचार करतात त्यांच्यात एक संतुलन कायम ठेवण्यासाठी काय डावपेच आखले पाहिजेत?     

जुबेर पीरजादे: आता ज्या परिस्थितीतून देश चाललाय ते तुम्हीही बघताय, मीही बघतोय. आणि सध्या एलेक्शनचं सगळं वातावरण आहे. तर सगळे विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने जर आपण हाताळलेत तर शंभर टक्के आपल्याला त्यात यश येईल. कोणतेही विषय असू द्या. त्यात एक गोष्ट आवर्जून मी तुम्हाला सांगतो, आणि तुम्हालाच सांगतो साथीदार साहेब मी ही महत्वाची गोष्ट, मुस्लिम समाजाचं आतापर्यंत काय झालं माहितेय का? राजकरणी मंडळी असेल, किंवा मोठे नेते असतील, कोणीही असतील, यंत्रणा असेल, त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला जर विकास हवाय, तुम्हाला जर डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर तुमची धर्माची जी चौकट आहे ती मोडून तुम्ही बाहेर या, मगच तुमची आणि विकासाची भेट होईल. आणि मुस्लिम समाज नेहमी धर्माच्या चौकटीत राहण्यात आनंद मानतो आणि तो समाधानी असतो. त्याला काही मिळेल न मिळेल, त्याला काही अपेक्षा नसते. आणि ते चांगलं आहे, ज्याला त्याला आपल्या पद्धतीनं जगण्याचा अधिकार आहे.

 

 

पण आतापर्यंत असंच झालंय की तुम्हाला जर प्रगति हवी असेल तर तुम्ही धर्माची चौकट मोडून तुम्ही पुढे या. ही भीती त्यांच्या मनात आहे, त्या भीतीपोटी ते असे प्रश्न विचारतात. आता जुबेरने व यास्मिनने हा जो प्रश्न आणलाय तो आर.एस.एस.ने तर आणला नाही! किंवा आणखी डावे उजवे जो कोणी असेल ह्यांनी तर आणला नाही! त्यांना अजून हा विश्वास बसायला थोडा वेळ लागेल की, हा पुर्णपणे धार्मिक आणि भारतीय मुस्लिम महिलांच्या प्रगतीकरणाचा प्रश्न आहे.

 

 

एकदा त्यांच्या लक्षात हा विषय आला की ही जी गोष्ट आहे याच्यासाठी धर्माची चौकट मोडावी लागणार नाही, आपल्या धर्मातच सगळ्या प्रोव्हिजन आहेत. आपल्या धर्मानेच हे स्वातंत्र्य दिलंय. पैगंबर सल्लालाहू वसल्लम साहेबांपेक्षा मोठा धर्मगुरू या जगात कयामतपर्यंत होणार नाही. म्हणून त्यांनी केलेले आदेश रद्द करण्याची हैसियत, औकात, लायकी जगातल्या कोणत्याही उलेमाची कयामतपर्यंत नाही ही माझी निष्ठा आहे. आणि ही समाजाला जर कळली तर तुम्हाला सांगतो एकदम चांगल्या पद्धतीनं हा विषय हाताळला जाईल. सामाजिक, राजकीय संघटना असतील, एनजीओ असतील, या सगळ्यांनी सुद्धा जे सत्य आहे ते समोर आणण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला एक उदाहरण मी एकदम चांगलं सांगतो. तुम्ही आज बघा, आज परिस्थिति काय आहे. मी आणि माझी बायको समजा शॉपिंगला गेलो आणि शॉपिंगला गेल्यानंतर नमाजची अजान झाली, नमाजची वेळ झाली आणि मला नमाजला जायचं असलं तर मी माझ्या बायकोला मशीदच्या बाहेर उभं करतो. कारण मशीदच्या आतमध्ये प्रोव्हिजन केलेली नाही. परमिशन नाही. कारण डोक्यात विषयच नाही की महिला मशीदमध्ये येऊ शकते. तर तुम्हाला माहीत आहे का, जिथं भिक्षा मागणारे, गोरगरीब, भीक मागणारे लोकं जिथं मशीदच्या बाहेर उभे असतात, त्या लाईनीत, तिथं त्या जागेवर माझ्या बायकोला उभं करून मला आत मध्ये जावं लागतं. म्हणजे अल्लाची प्रार्थना करायचे अधिकार मला पण आहेत आणि तिला पण आहेत. मग एक अजान झाल्यावर मी मशीदमध्ये जातो आणि ती भिकार्‍यांच्या लाईनमध्ये उभी राहते, ही दुर्दशा कशी काय? ही दुर्दशा कुणी केली? ही अल्लाने केलेली नाही, ही पैगंबर साहेबांनी केलेली नाही, ही धर्माने केलेली नाही, ही जी पुरुषप्रधान व्यवस्था सध्या जी आहे, ही त्यांनी केलेली आहे. हा आपला लढा त्यांच्या विरोधातला लढा आहे आणि हा सत्यासाठी लढा आहे. त्यामुळे सत्य समोर आणायचं तर लोकं हा विषय प्रेमाने स्वागताने स्वीकारतील.