मैं वो एक मुश्ते गुबार हूं … ! भाग २ 

भगत सिंगांचे लाडके बटुकेश्वर दत्त समाजवादी समाजव्यवस्थेच्या स्थापनेसाठी जीवनाचे बलिदान करणारे उच्च दर्जाचे क्रांतिकारक आणि आणि तेवढेच संवेदनशील विचारवंतही होते, हे त्यांनी लिहिलेल्या या प्रस्तुत लेखावरून दिसून येते. भगतसिंगांसोबत जवळीक, अगदी कमी वयातही क्रांतीबद्दलची त्यांची निष्ठा, स्पष्टता आणि संपूर्ण जीवनात भोगाव्या लागणाऱ्या परिस्थितीशी मुकाबला करण्याची दुर्मिळ जिद्द यांचे उत्तम उदाहरण आहे.

आणि सरदारचा तो प्रेमळ आदेश-‘पी, वेळ नको लावूस,  तुला प्यावेच लागेल’,  दूधवाल्याच्या दुकानापुढे गरम दुधाचा ग्लास घेऊन तो मला आदेश देतो आहे. त्या काळात मला दुधाची नावड नव्हती, परंतु पोटभर जेवल्यानंतर चांगले अर्धा शेर दुध पिणे माझ्या पोटाला कठीणच होते. आजही दिल्ली आणि आग्रा येथील दुधाच्या दुकानांची दृष्ये माझ्या नजरेसमोर येतात. नंतर त्याच दुकानांचे मालक, आम्ही दिल्ली व आग्र्यात होतो हे सिद्ध करण्यासाठी आमच्या खटल्यात आले होते.

खरेतर जेवणानंतर चांगले ग्लासभर गरम दूध घेण्याचा पाठ मला सरदारने घालून दिला होता. कधी पैसे जवळ असले की त्याचा दूध पिण्याचा विलास चुकत नव्हता. जेथे भाकरीच्या तुकड्यांची शाश्वती नाही तेथे दुग्धपान विलासितेच्या श्रेणीतच येईल ना! आणि फक्त तीन पाव गरम गरम दुधाने त्याचे समाधान होत नव्हते,तर दुधावर किमान दीड छटाक जाड मलईचा तुकडाही पडला पाहिजे. मलईनसेल तर तो तुपाचा तडका गरम दुधात घेत असे. शरीरात रक्त वाढवण्याचा हाच त्याचा उपयुक्त उपाय होता. त्याच्या मनात दुधाप्रति खुपच आसक्ती होती. आरोग्याबद्दल तो कधीही निष्काळजी राहिला नाही. नंतरच्या पक्षीय जीवनात आम्हाला नियमित जेवणहीमिळाले नाही, ही बाब अलाहिदा…! क्रांतिकारक जीवनातील अनिश्चित परिस्थिती तसेच जगण्याची मर्यादित साधने व व्यवस्थेअभावी सुद्धा शरीर आणि आरोग्याबद्दल तो नेहमीच जागरूक राहिला.जीवनाबद्दल त्याच्या मनात अतिशय आसक्ती असली तरी जीवन जेव्हा अधिक सुंदर आणि प्रिय वाटते तेव्हा ते आपल्या  ध्येयासाठी कुर्बान केले पाहिजे, असे त्याचे मत होते. आठवणींच्या या मालिकेच्या रूपाने आणखी एक दृश्य माझ्या नजरे पुढे येते….

माणसांचा महापूर आलेला कानपूर स्थानकाचा फलाट. ‘जो बोले सो निहाल, सतश्री अकाल…’च्या आकाश भेदणार्‍या घोषणांनी संपुर्ण अवकाश दुमदुमले होते. गुरूच्या बागेतील सत्याग्रही शीख मोर्चा काढण्याकरिता पंजाबला जात होते. त्या दिवसांतजेथे जेथे गाडी थांबत असे,तेथे तेथे सत्याग्रहींच्या दर्शनासाठी जेवणाकरिता लंगर सुरू करण्यात आले होते. कानपूर स्थानकावरही अशीच व्यवस्था होती आणि सत्याग्रहींची एक झलक पाहण्याकरिता जनता तुटून पडली होती. फूल आणि हारांचा वर्षाव! मीसुद्धा स्थानकावर गेलो होतो.अपार जनसमूहाचा आवेगओलांडून सत्याग्रहींच्या डब्यापर्यंतजाऊ शकत नसल्याने नाईलाजास्तव मी पुलावर उभा राहिलोव असंख्य डोक्यांनी भरलेल्या फलाटाचे दृश्य तेथूनच पाहण्यात गुंग होतो. तेवढ्यात गर्दी भेदणारी माझी नजर माझ्या सरदार मित्रावर पडली. तोच पांढरा रेशमी फेटा व पांढरा सदरा दोन्ही बाह्या वर दुमडलेला. एका हातात शरबताची बादली व दुसऱ्या हातात मोठा ग्लास घेतलेला. आपल्या दोन्ही खांद्यांनी गर्दीला ढकलत तो सत्याग्रहींच्या हातात शरबताचे ग्लास देत होता. गर्दीच्या ओढाताणीत फेटा डोक्यावरून घसरत खांद्यावर आलेला, पण त्याला याची चिंता नव्हती. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सत्याग्रहींची तहान भागवण्याची व्यग्रता त्याचा चेहरा, डोळे आणि त्याच्या चालण्यात पाहता येऊ शकत होती.गाडीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची त्याची अविश्रांत धावपळ! माझ्या प्रिय साथी सरदारचे हे आणखी एक रूप होते.

थोडा वेळ थांबल्यानंतर गाडी सुरु झाली. पुन्हा एकदा सतश्री अकालच्या घोषणेने आकाश दुमदुमले आणि गोंगाटाने गजबजलेले स्थानक रिकामे होऊ लागले. गर्दी ओसरू लागली.जे लोक सत्याग्रहींना पाहण्यासाठी आले होते,ते बाहेर पडू लागले, उरला हातात बादली व ग्लास घेतलेला माझा सरदार मित्र! मी पुलावरून खाली उतरून शेजारी उभा राहिलो,परंतु त्याला तर कशाची शुद्धच नव्हती. गाडी गेली त्या दिशेने भारावलेल्या उदास नजरेने तो रिकाम्या रुळांकडे पाहत होता. माझ्या हाताचा दाब खांद्यावर जाणवल्यावर तो वळला वस्मित करून एक हाताने माझ्या पंजावर जोर दिला, बोटू….! त्याच्या डोळ्यात कोणतातरी अदृश्य निर्णय उमटला होता त्यावेळी.

त्यादिवशी तो जवळ जवळ अबोल आणि उदास असा निर्जन स्थानकातून माझ्याबरोबर बाहेर पडला आणि मग तो दिवस उगवला जेव्हा त्याला पक्षाच्या आदेशान्वये कानपूर, ‘प्रताप’, सुरेश दादा आणि मला सोडून एकाशाळेचा मुख्याध्यापक बनून दुसरीकडे जावे लागले. क्रांतिकारक पक्षाच्या नियमानुसार कुतूहलापोटी कुणाची आवश्यकतेपेक्षा जास्त माहिती करून घेण्याची आम्हाला मनाई होती. आणि इतके दिवस काहीतरी रहस्य आपल्या एकमेव जिवलग साथीपासून-माझ्यापासून लपवत राहिला,असे कदाचित सरदारला वाटले असावे. अन्यथा कानपूरचा निरोप घेण्याच्या दिवशीच ते कां उघड झाले असते. शिक्षकाचे पद ग्रहण करण्यापूर्वी तो मला भेटावयास आला होताव आमची आंतरिक जवळीक असतानाही पक्षाच्या नियमांचे पालन करण्याकरिता त्याने जे रहस्य आतापर्यंत लपवून ठेवले होते ते निरोप घेताना तो व्यक्त केल्याशिवाय राहू शकला नाही. तरुण बलवंत सिंगाच्या स्नेह सापळ्यात मी आतापर्यंत बंदिस्त होतो, त्यानेच भगतसिंगाच्यारूपात माझा निरोप घेतला.

हाच त्याचा खरा परिचय होता. नंतर लोकांना त्याची क्रांतिकारक भगतसिंगाच्या रूपात ओळख झाली, परंतु माझ्यासाठी तरतो नेहमी मानवी गुणसंपन्न, गंभीर भावनिकतेने ओतप्रोत भरलेला बलवंत सिंगच राहिला.नंतरची आमची मैत्री उत्तरार्धाच्या क्रांतीपर्वात एकमेकांच्या सहकाऱ्यांची भूमिका, त्याच्या फाशीपासून तर माझ्या हद्दपारीपर्यंतचा प्रसंग या मालिकेची वेगळी कथा आहे.

सन १९२७-२८ चा काळ आपल्या राष्ट्रीय जीवनात क्रांतीसोबतच संकटांचाही काळहोता, असे म्हणता येते. कारण त्याच काळात स्वातंत्र्याच्या लढाईचा स्त्रोत एका नव्यामार्गाकडे प्रवाहित झाला.त्यावेळेपर्यंत देशवासीयांना क्रांतिकारक चळवळ आणि तिच्या विचारधारेची फारशी माहिती नव्हती आणि इंग्रज सरकार क्रांतिकारकांची गणनासामान्य खुनी व दरोडेखोरांच्या श्रेणीत करून जनतेला सदासर्वकाळ संभ्रमात ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. देशात परिवर्तन व्हावे हा क्रांतिकारकांचा आग्रह असताना, ते देशात व्यवस्था व अराजक पसरवू पाहत आहेत, असे इंग्रज सरकार म्हणत असे. सामान्य जनतेला क्रांतीप्रति जागरूक करून आर्थिक परिवर्तनाद्वारे शोषणविहीन समाजाची स्थापना हेच क्रांतिकारकांचे ध्येय होते. क्रांतिकारकांनी देशवासीयांपुढे एक निश्चित कार्यक्रम ठेवणे व देशातील नेत्यांना संसद भवनातील डावपेचातून बाहेर काढून जनआंदोलनाप्रति उत्साहीत करणे आवश्यक होते. दिल्लीच्या केंद्रीय विधिमंडळात भारताच्या स्वायत्ततेची मागणी इंग्रज सरकारने वारंवार फेटाळली होती.लोकनेत्यांचा प्रखर विरोध धुडकावून येथील जनतेचे मानवी अधिकार संपुष्टात आणण्यासाठी व्यापार विवाद विधेयक केंद्रीय विधिमंडळात पारित करण्यात आले होते. या कायद्यान्वये देशाच्या  कोट्यावधी लोकांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या प्रारंभिक स्वत्व आणि एकमेव उपाय असलेल्या संपाच्या अधिकारापासून वंचित करण्यात आले होते. आपल्या केंद्रीय विधी मंडळातील तो अपमान, अमानुष क्रूर कायद्याने देशातील कोट्यावधी जनतेवर जो हल्ला केला होता त्याच्याचविरोधात भारतातील क्रांतीकारक पक्ष‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी’कडून केंद्रीय विधी मंडळाच्या सभा दालनात बाँब टाकून गोऱ्या राजवटीला इशारा देण्याच्या विषयावर आग्रा मुख्यालयात बैठक सुरू होती. असेंब्लीत बाँबटाकून आत्मसमर्पण करावे आणि नंतर खटला सुरू असताना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहून भारतीय क्रांतिकारक पक्षाच्यावतीने क्रांतिकारकांचे विचार व उद्दिष्टांचे दिग्दर्शन करण्याकरिता एक सविस्तर असे राजकीय वक्तव्य द्यावे,अशी  समजदारी भगतसिंगांच्या बुद्धीतून आली होती. पण हे अमलात आणणार कोण? अर्थात केंद्रीय विधिमंडळात  बाँबटाकण्यासारखे जोखमीचे कार्य करणार कोण? हे कार्य तडीस नेण्याचा सरळ व स्पष्ट अर्थ होता- मृत्यू! कितीही सावधगिरी बाळगली तरी विधिमंडळ भवनाच्या तळ जमिनीवर बाँबफुटताच एखाद्याचा मृत्यू होण्याची शक्यता स्पष्ट होती आणि त्यानंतर तेथे तैनात सुरक्षा पोलीस सार्जंटकडून बाँबटाकणार्‍यास लागलीचमारणे जवळजवळ निश्चित होते.एवढे असूनही आम्ही सारे क्रांतिकारक देश स्वतंत्र करण्यासाठी बलिदानी भावनांनी प्रेरित होऊन, प्रिय जनांशी संबंध तोडून, कोणत्याही क्षणी मृत्यू कवटाळण्याचा निर्धार करून, डोक्याला कफन बांधून गृहत्यागी बनून निघालो होतो. तरीही बैठकीत बसून आपआपल्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून इतर सहकार्‍यांना निश्चित मृत्युचे फर्मान सुनावणे कोणालाही शक्य नव्हते. असा कोणताही व्यवहार एखाद्याच्या मनात शंका निर्माण करू शकत होता.सरदारने पुढाकार घेऊन मोठ्या आनंदाने मृत्यूशी खेळण्याचा विडा उचलला. सोबत मीसुद्धा. बरेच वर्षांपूर्वी कानपूरात गंगेच्या काठावर बसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी दोघेही एकत्रच बलिदान करू,अशा अपेक्षित दिवसांची कल्पना आम्ही सतत करीत असू,  ते प्रत्यक्ष अंमलात आणण्याची वेळ येऊन ठेपली होती….

सरदार आणि मी, आम्ही दोघेही आग्रा येथून दिल्लीस पोहोचलो. सुमारे महिनाभर दिल्लीत तळ ठोकला. मी हाफ पॅन्ट, सदरा आणि जोडा घालत असे आणि सरदार फ्लॅट हॅट घालू लागला होता. दररोज सायंकाळी वृत्तपत्राने झाकलेला बाँबकोटाच्या खालच्या भागातील खिशात ठेवून आम्ही एकत्रच असेंब्लीभवनातजात असू, तेथील परिस्थितीचे निरीक्षण करत असू, पहारेकऱ्यांच्या हालचाली पाहून आपला उद्देश कशा तऱ्हेने साध्य करता येईल याचा अंदाज बांधत असू. अशातच एके दिवशी सरदारने छायाचित्र काढण्याचा प्रस्ताव ठेवला. बराच वेळ मी टाळाटाळ करीत राहिलो परंतु सरदार जिद्दीला पेटले तेव्हा मला माघार घ्यावी लागली आणि तेच एकमेव छायाचित्र आमचे दोघांचे अखेरचे स्मृतिचिन्ह बनून राहिले.

मग तो दिवस उजाडला,ज्यासाठी आम्ही आग्र्याहून दिल्लीला आलो होतो आणि सतत महिनाभर कोणताही खंड न पडू देता असेंब्ली भवनाच्या भोवताल प्रदक्षिणा घालत राहिलो होतो. अर्थातच ८एप्रिल १९२८!

 

तो भयंकर आवाज

 

दिवसाचे अकरा वाजलेले. ज्याला आता संसद भवन म्हटले जाते तोकेंद्रीय असेंबली हॉल. व्यापार विवादविधेयक आणि जन सुरक्षा विधेयकावर जनमत जाणून घेण्याचा ठराव पारित झालेला. अध्यक्षाच्याआसनावर सरदार वल्लभाई पटेल विराजमान झालेले.  ट्रेझरी बाकांवर सर जेम्स क्रेरर व सर जॉर्ज शुस्टर. अति महत्त्वाची व्यक्ती म्हणून व्हॉइसरायच्या खुर्चीवर दर्शक सज्जात सर जॉन सायमन. सरकारी बाकांच्या पुढे विरोधी बाकांवर पं.मोतीलाल नेहरू, पं. मदन मोहन मालवीय व डॉ. मुंजे इत्यादी. बॉम्ब आम्हा दोघांच्याही खिशात होते. मागच्या भागातील रिकाम्या बाकांना लक्ष करून आम्ही बाँबटाकले. जोराचा स्फोटझाला. परंतु कुणालाही मारण्याचा हेतू नसल्याने जोराचा आवाज होण्याव्यतिरिक्त अन्य दुसरा कोणताही भयंकर, घातक व मारक परिणाम त्यापासून होऊ नये,असेच कमी शक्तीचे बाँबबनवले होते. ‘इन्कलाब जिंदाबाद’तसेच‘साम्राज्यवादी राज्यकर्त्यांची बधिर कर्णपटले उघडण्यासाठी जोरदार आवाजाची गरज आहे’, अशा घोषणा आणि फुटलेल्या बाँबच्या धुरांनी सभागृह भरले आणि पळापळ सुरू झाली. भीतीपोटी सर जेम्स क्रेरर बाकाखाली लपले. बाँबसोबतच फेकलेली लाल पत्रके धुराच्या थरावर इकडेतिकडे तरंगत होती. गोऱ्या राजवटीचे डोळे उघडण्याकरिता भारतीय क्रांतिकारी पक्षाच्या उद्देशाचा स्पष्ट संदर्भ यातदिला होता- दोन नगण्य एककांना (भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांना-सं.) चिरडल्याने देश दडपला जाणार नाही. जन सुरक्षा व व्यापार विवाद विधेयक आणि लाला लजपत राय यांच्या निर्गुण हत्येविरुद्ध सामान्य जनतेचा विरोध व्यक्त करण्याव्यतिरिक्त आम्ही इतिहासाला देखील हा दाखला देऊ इच्छितो की, व्यक्तींना चिरडणे सोपे आहे परंतु  विचारांना दडपता येत नाही, ही बाब सरकारने ध्यानात घेतली पाहिजे. विशाल साम्राज्येलयास जातात परंतु विचारधारा लयास जात नाही. बोर्बोन आणि झार यांचा शेवट झाला परंतु क्रांतिकारक पुढेच आगेकूच करीत राहिले… ज्यांना मानवी जीवनाविषयी प्रेम आहे आणि जे एका महान गौरवशाली भविष्याची कल्पना करतात, त्या आम्हाला माणसाच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी नाईलाजास्तव मानवी रक्त वहावे लागत आहे. हे आवश्यक आहे. कारण माणुसकीकरिता जे कुर्बान होतात त्यांच्या त्यागाने क्रांतीचे अग्निकुंड तयार होते, ज्याद्वारे माणसाकडून माणसाचे होणारे शोषण संपुष्टात येऊ शकेल- इन्कलाब जिंदाबाद! (अपूर्ण)

The Leaflet