टीपू सुलतानः नायक की खलनायक?

अलीकडेच कर्नाटकात पक्षांतर आणि आमदारांच्या खरेदी-विक्रीचा उघड-उघड खेळ पार पडला. परिणामी काँग्रेस-जेडीएस सरकार पडले आणि भाजपने सत्ता मिळवली. सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारने जो सर्वात पहिला निर्णय घेतला, तो होता राज्यात टीपू सुलतानच्या जयंतीवर सरकारी आयोजन बंद करण्यात येतील. हेही ठरवण्यात आले की टीपू सुलतानची जयंती १०नोव्हेंबर ‘काळा दिवस’पाळण्यात येईल. आणि या दिवशी मध्ययुगातील या शासकाच्या विरोधात मोर्चे काढले जातील. मध्ययुगीन इतिहासाच्या वेगवेगळ्या व्याख्या करण्यात येतात आणि अनेक प्रकरणी, एकच व्यक्ती काही समूहांसाठी नायक तर काहींसाठी खलनायक होतो.  टीपूच्या बाबतीत परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची आहे. आधी हिंदू राष्ट्रवादी सुद्धा टीपूला नायकाच्या रूपाने पहात असत. १९७०च्या दशकातआर.एस.एस.ने प्रकाशित केलेल्या पुस्तिकांची मालिका ‘भारत भारती’मध्ये  टीपूच्या महिमेचे गुणगान करण्यात आले होते.२०१० साली आयोजित एका जनसभेत काही भाजप नेते टीपूच्या वेशात आपल्या हातात तलवार घेऊन मंचावर विराजमान होते.

आर.एस.एस.च्या भट्टीतभाजून तयार झालेले आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काही वर्षांपूर्वीच टीपू सुलतानच्या साहसाची प्रशंसा करीत म्हटले होते की, टीपूने त्याकाळात क्षेपणास्त्राचा प्रयोग केला होता. आता कर्नाटकात जमातवादाचे मूळ खोलवर घट्ट रुजले असताना टीपूला हिंदुविरोधी क्रूर शासकाच्या रूपात सादर केले जात आहे. मागील काही काळापासून काँग्रेस पक्ष टीपूचा उपयोग मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याकरिता करत आहे,तर भाजप हिंदूंची मते मिळवण्याकरिता टीपूचे दैत्यीकरण करण्यात लागलेली आहे. या राजाचे व्यक्तिमत्व आणि कार्य यांच्याविषयी खोलात जाऊन आणि तटस्थपणे शोध घेतल्यावर हे स्पष्ट होते की,खरे पाहता ते इंग्रजांच्या इतिहासाच्या जमातवादी व्याख्येवर आधारित ‘फूट पाडा आणि राज्य करा’ धोरणाचे बळी ठरलेत. जमातवादी शक्ती मध्ययुगीन इतिहासातील निवडक घटनांना अनावश्यक महत्व देऊन धर्माच्या आधारावर या काळातील राजांनानायक आणि खलनायक सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे खरे आहे की,  सर्व राजे केवळ आपले साम्राज्य सुरक्षित राखण्यात आणि त्याचा विस्तार करण्यात प्रयत्नशील होते. आणि याच उद्देशाने त्यांच्यापैकी काहींनी मंदिरं तोडलीत तर काहींनी मंदिरांना संरक्षण दिले.

टीपू सुलतान, मोगल साम्राज्य कमकुवत झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या वाढत्या प्रभावाने चिंतित होते. मुगलांच्या कमकुवत होण्याने ईस्ट इंडिया कंपनीचा मार्ग सोपा झाला आहे,याची टीपूलाजाणीव होती. त्यांनी मराठे, रघुनाथराव पटवर्धन आणि निजामाला विनंती केली की त्यांनी इंग्रजांना साथ देऊ नये. त्यांना एका परदेशी शक्तीने देशात मूळधरण्याच्या धोक्याची जाणीव होती. मराठे व टीपू आणि निजाम व टीपू हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. हे तिघेही आपल्या राज्याचा विस्तार करू पाहत होते. पटवर्धनांच्या सैन्याने १७९१ सालात म्हैसूरवर हल्ला केला आणि श्रृंगेरी मठ लुटला. हे मजेशीर आहे की,टीपूने मूल्यवान भेट पाठवून या मठाचा पुनरुद्धार केला. ते श्रृंगेरी मठाचे मुख्य विश्वस्त होते आणि या मठाच्या स्वामीला जगद्गुरू म्हणून संबोधित करत असत. आपल्या सैन्य मोहिमेच्या आधी ते मठाच्या स्वामीचा आशीर्वाद घेत असत.

यासोबतच हेही सत्य आहे की त्यांनी वराह मंदिरावर हल्ला केला होता. याचे कारण स्पष्ट होते. मंदिराचे प्रतीक वराह (रानटी डुक्कर) होते,  जे म्हैसूर राजवंशाचे प्रतीक सुद्धा होते. याच राजवंशाला सत्ताच्यूत करून ते म्हैसूरचे राजे बनले होते. तर अशाप्रकारे टीपूसुलतानने श्रृंगेरी मठाचे संरक्षण केले तर वराह मंदिरावर हल्ला केला. हे उघड आहे की, वराह मंदिरावरील हल्ल्याला ते हिंदुविरोधी असण्याचा पुरावा सांगितला जाऊ शकतो. परंतु त्यांचे ध्येय हिंदू धर्म नव्हते तर ज्याला त्यांनी युद्धात पराभूत केले होते तो राजवंश होता. अशाच प्रकारे श्रृंगेरी मठ मराठ्यांनी यासाठी लुटला नव्हता की ते हिंदू धर्माच्या विरोधात होते, उलट त्यांचे लक्ष्य टीपू सुलतान होते.

हेही म्हटले जाते की,टीपूने फारसीला आपल्या दरबारात भाषेचा दर्जा दिला आणि कानडीकडे दुर्लक्ष केले. वस्तुस्थिती ही आहेकी त्या काळात भारतीय उपखंडातील बहुतांश शासकांच्या दरबाराची भाषा फारसीहोती. शिवाजीने हैदर अलीला आपल्या हेरगिरी विभागाचा मंत्री यासाठी नियुक्त केले होते की,जेणेकरून ते अन्य राज्यांशी फारसीमध्ये संवाद साधू शकतील. हा सुद्धा आरोप लावला जातो की टीपूने शेकडो ब्राम्हणांची कत्तल यासाठी केली होती,कारण त्यांनी मुसलमान बनण्यास नकार दिला होता. हे पूर्णपणे चूक आहे. यासंदर्भात आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे की टीपूचे मुख्यसल्लागार पूर्णय्या हे एक ब्राह्मण होते. हा सर्व खोटारडेपणा इंग्रजांनी पसरवला होता कारण टीपू भारतात त्यांच्या राज्य विस्ताराच्या मार्गात  मोठा धोंडा बनून उभे ठाकले होते. हा सुद्धा आरोप लावला जातो की टीपूने काही हिंदू आणि ख्रिश्चन समूहांचा छळ केला. हे अंशतः खरे आहे. त्यांनी त्या समूहांना यासाठी लक्ष केले होते की, ते इंग्रजांना सहाय्य करत होते, जे म्हैसूर राज्याच्या हिताच्या विरुद्धहोते. त्यांनी मुस्लिम महादवियांना सुद्धा लक्ष्य बनवले,कारण ते ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात घोडेस्वार पथकात  दाखल होत होते. वास्तविक पाहता हा सर्व सत्तेचा खेळ होता,ज्याचा धर्माशी काहीही संबंध नव्हता.

जमातवादी शक्ती, इतिहासाचा उपयोग आपले विभाजनकारी राजकारण पुढे नेण्यासाठी करत आली आहे.  महाराष्ट्रातील एक शोध अध्ययनकर्ते सरफराज शेख यांनी आपले पुस्तक ‘सुलतान-ए-खुदाद’मध्ये टीपू सुलतानचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यात टीपू जाहीर करतात की ते धर्माच्या आधारावर आपल्या प्रजेशी भेदभाव करणार नाहीत आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या राज्याचे संरक्षण करतील. आणि त्यांनी हेच केले. इंग्रजांशी तडजोड करण्याऐवजी त्यांनी त्यांच्याशी लढता-लढता आपले बलिदान दिले.ते १७९९ च्या चौथ्या आंग्ल-म्हैसूर युद्धात कामी आले.

रंगमंचाच्या विश्वातील महान व्यक्तिमत्व गिरीश कर्नाड यांनी म्हटले होते की, जर टीपूसुलतान हिंदू असते तर त्यांना शिवाजीमहाराजांना महाराष्ट्रात आहे तसा टीपूसुलतानला कर्नाटकात सन्मान आणि गौरव मिळाला असता. आजही म्हैसूरच्या गावांमध्ये टीपूच्या शौर्याचे वर्णन करणारे लोकगीत प्रचलित आहेत.

आपण धर्माच्या आधारावर नायकांना विभाजित करण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे. उलट मी तर हे मानतो की,आपले बहुतेक नायक स्वातंत्र्य युद्धाचे नेते असावेत ज्यांनी भारताला घडवले. आपण जमातवादी इतिहास लेखनाच्या जाळ्यात अडकू नये. (अनुवादीत)

लेखक मुंबई आय.आय.टी.चे निवृत्त प्राध्यापक असून निर्भीकपणे धर्मनिरपेक्षतेचा प्रचार करणारे व जमातवादाला प्रखरपणे विरोध करणारे कार्यकर्ते आहेत. या विषयांवरील त्यांचे विपुल प्रकाशित लेखन अनेक भाषेत उपलब्ध आहे.