The Leaflet

| @theleaflet_in | June 2,2019

रूकैया  सखावत हुसैन

 

“प्रिय मुलींनो, या कादंबर्‍या वाचू नका, हात सुद्धा लावू नका. तुमचे जीवन बरबाद होईल. तुम्हाला रोग आणि व्याधी विळखा घालतील. ईश्वराने तुम्हाला कशासाठी जन्मास घातले आहे- एवढ्या लहान वयात पथभ्रष्ट होण्यासाठी? आजारी पडण्यासाठी? तुमचे भाऊ, नातेवाईक आणि जवळच्या लोकांमध्ये घृणेस पात्र ठरण्यासाठी?  नाही, नाही. तुम्हाला आई व्हायचे आहे,  तुम्हाला चांगले जीवन हवे आहे. हाच तुमचा दैवी उद्देश आहे. तुम्ही हा उदात्त उद्देश पूर्ण करण्यासाठी जन्म घेतला आहे, तुम्ही या कथा-कादंबर्‍यांपायी वेडे होऊन तुमचे जीवन बरबाद करायचे आहे का?” ही एक पितृसत्तात्मक प्रतिक्रिया आहे प्रस्तुत कथेविषयी तमिळ भाषेत १९२७ साली प्रकाशित झालेल्या लेखात. यावरुन अशी कथा लिहिण्याचे धाडस करणे त्या काळी किती जोखिमयुक्त होते याची कल्पना  येते.

एका सायंकाळी आपल्या खोलीत आराम खुर्चीवर पसरून मी सहजच भारतीय स्त्रियांच्या परिस्थितीविषयी विचार करत होते. मला झोप लागली होती की नाही हे आठवत नाही, परंतु मला हे नक्की आठवते की मी जागे होते. मी तार्‍यांनी भरलेले आकाश पाहिले, हिर्‍यांसारखे हजारो चमकणारे तारे.

अकस्मात एक स्त्री माझ्यापुढे उभी ठाकली. ती आत कशी आली, हे मला माहीत नाही. मी तिला माझी मैत्रीण, सिस्टर सारा समजले.

“गुड मॉर्निंग”, सिस्टर सारा म्हणाली. मी हळूच हसले कारण मला माहीत होते की आता सकाळ नाही, तार्‍यांनी भरलेली रात्र आहे. मी तिच्या अभिवादनास प्रतिसाद दिला. “तु कशी आहेस?”

“धन्यवाद, मी बरी आहे. तु बाहेर येऊन माझी बाग पाहू शकतेस का?”

उघड्या खिडकीतून मी पुन्हा एकदा चंद्राकडे पाहिले आणि विचार केला की एवढ्या रात्री बाहेर पडण्यात काही नुकसान नाही. त्या वेळेला सर्व पुरुष नोकर गाढ झोपेत होते व मी आरामात सिस्टर सारासोबत फिरायला जाऊ शकत होते.

आम्ही दार्जिलिंगमध्ये असताना बरेचदा मी सिस्टर सारासोबत फिरायला जात असे. तेव्हा आम्ही बहुधा हातात हात घालून वनस्पतीशास्त्रविषयक उद्यानात फिरत मोकळ्या मनाने गप्पा करत असू. मी कल्पना केली की सिस्टर सारा कदाचित अशाच एखाद्या बागेत मला फिरायला घेऊन जाण्यासाठी आली असावी. मी झटपट तयारी केली व तिच्यासोबत बाहेर पडले.

फिरत असताना मला हे पाहून आश्चर्य वाटले की येथे तर पुर्णपणे सकाळ उगवली आहे. शहर जागे झाले होते व रस्त्यांवर लोकांची गर्दी लोटत होता. मी भर दुपारी रस्त्यावरून चालत होते हा विचार करताच मला लाज वाटू लागली, जेव्हाकी तेथे एकही पुरुष नजरेस पडत नव्हता.

फिरत असताना काही लोकांनी माझ्यावर शेरेबाजी केली. मी त्यांची भाषा समजू शकले नसले तरी त्या माझी थट्टा उडवित आहेत हे मी समजून चुकले होते. मी माझ्या मैत्रीणीला विचारले, ‘ह्या काय म्हणतायत?’

‘बाया म्हणतायत की तू फार पुरुषासारखी दिसत आहेस.’

“पुरुषासारखी?” मी म्हणाले, “त्यांना काय म्हणायचे आहे?”

“त्यांना म्हणावयाचे आहे की तू पुरुषांसारखी लाजाळू व घाबरट आहेस.”

“पुरुषांसारखी लाजाळू व घाबरट?” ही शुद्ध थट्टा होती. माझी मैत्री सारा नसून ही कुणी अनोळखी स्त्री आहे हे लक्षात येताच मी फार घाबरले. अरेरे, मी किती मूर्ख आहे की या अनोळख्या महिलेला सिस्टर सारा समजले.

आम्ही दोघीही हातात हात घेऊन चालत होतो. तिला माझ्या हाताचा कंप जाणवला.

“लाडके, काय झालं?” तिने आपुलकीने विचारले. “मला कसंसं वाटते.” मी काहीशा क्षमायाचक स्वरात म्हटले. “मी पडद्यात राहणारी स्त्री आहे व पडद्याशिवाय बाहेर पडण्याची मला सवय नाहीये.”

“येथे कुणी पुरुष येईल असं समजून घाबरण्याची तुला येथे गरज नाही. पाप आणि धोक्यांपासून मुक्त असा हा स्त्रियांचा देश आहे.”

मी सावकाशपणे देखाव्यांचा आनंद घेऊ लागले. निश्चितच ते अतिशय भव्य होते. मी गवताच्या एका पट्टीला शनीलचा गालीचा समजले. त्यावर चालताना असा भास व्हायचा की जशी काही मी रेशमाच्या गालीच्यावरच चालते आहे. मी जेव्हा खाली पाहिले तेव्हा त्या रस्त्यावर खुप शेवाळ आणि गवत घट्ट झाले असल्याचे माझ्या लक्षात आले.

“हे किती चांगले आहे,” मी म्हटले.

“तुला हे आवडले?” सिस्टर सारा ने विचारले. (मी तिला सारा संबोधत राहिले व ती मला माझ्या नावाने बोलावत राहिली.)

“होय, अतिशय. परंतु मी नाजुक आणि सुंदर फुलांना तुडवू इच्छित नाही.”

“काळजी करू नकोस लाडके सुलताना, ही जंगली फुलं आहेत. तुझ्या चालण्याने कुस्करणार नाहीत.”

मी स्तुती करत म्हटले, “ही संपूर्ण जागा एखाद्या उद्यानासारखी वाटत आहे. तू एकेका रोपट्याला किती सुंदरपणे जोपासले आहेस.”

“तुझ्या देशातील लोकांची इच्छा असेल तर तुझ्या कलकत्त्याला सुद्धा यापेक्षा चांगले उद्यान बनवले जाऊ शकते.”

“त्यांना करण्यासाठी एवढी कामे असतात की माळीकामावर एवढे लक्ष देणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे, असं त्यांना वाटेल.”

“यापेक्षा चांगला बहाणा त्यांना सापडणार नाही,” तिने स्मित करीत म्हटले.

सगळेच्या सगळे पुरुष गेले कुठे, हे जाणून घेण्याची मला उत्कट इच्छा होऊ लागली. फिरत असताना माझी शंभरेक स्त्रियांशी भेट झाली होती परंतु एकही पुरुष नजरेस पडला नाही.

“सगळे पुरुष कुठे गेले?” मी तिला विचारले.

“त्यांच्या योग्य त्या ठिकाणी, जेथे ते असायला पाहिजेत.”

“कृपा करून मला हे सांग की, ‘त्यांच्या योग्य त्या ठिकाणी’ याचा तुझ्या लेखी अर्थ काय?”

“ओह, आता माझी चुक मला कळली, तुला आमच्या चालीरीती माहीत नाहीत, तू तर पहिल्यांदा येथे आली आहेस. आम्ही आपल्या पुरूषांना आत मध्ये बंद करून ठेवतो.”

“अगदी तसंच, जसं आम्ही आपल्या स्त्रियांना जनानखान्यात बंद करून ठेवतो? किती मजेशीर गोष्ट आहे.” मी खळाळून हसले. सिस्टर सारालाही हसू फुटले.

“परंतु लाडके सुलताना, या निष्पाप स्त्रियांना बंद करून ठेवणे आणि पुरूषांना मोकळं सोडणे, हा किती अन्याय आहे.”

“का? आम्ही नैसर्गिकरित्याच कमकुवत असल्यामुळे जनानखान्याच्या बाहेर असणे आम्हाला सुरक्षितपणाचे नाहीये.”

“होय, पुरुष तेथे असतात तोवर रस्त्यावर असणे सुरक्षितपणाचे नाही. कुणी रानटी जनावर ऐन बाजारात शिरावं, हे तसंच काहीसं नाहीय का.”

“मुळीच नाही.”

“विचार कर, वेड्यांच्या एखाद्या इस्पितळातून एखादा वेडा बाहेर पडला आणि पुरुष, घोडे आणि इतर जनावरांसोबत तो नको तसं वागू लागला तर तुझ्या देशातील लोक त्याचं काय करतील?”

“ते त्याला पकडून पुन्हा परत वेड्यांच्या इस्पितळात पाठवून देतील.”

“धन्यवाद! आणि तु याचा विचार करत नाहीयेस की शहाण्या माणसांना आत मध्ये ठेवण्यात आणि वेड्या माणसांना बाहेर ठेवण्यातच शहाणपणा आहे?”

“मुळीच नाही.” मी हळूच हसले.

“तुझ्या देशात तर पुरुष अशा प्रकारची कामं करीतच असतात. अशा तर्‍हेची कामं करीतच असतात, किंवा त्यांच्यात अशा कुरापती करण्याची शक्ति असते ते पुरुष मोकळे फिरत असतात. जेव्हाकी स्त्रिया आत मध्ये बंद असतात! घराबाहेर असताना अशा तर्‍हेच्या बेजबाबदार पुरुषांवर तु विश्वास कसा ठेवू शकतेस?”

“सामाजिक प्रश्नांमध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप नाही. भारतात पुरुष हे देव आणि मालक असतात. त्यांनी आपल्याकडे सर्व सत्ता व विशेषाधिकार राखून ठेवले आहेत आणि स्त्रियांना जनानखान्यात बंद केले आहे!”

“तुम्ही स्वतःला जनानखान्यात बंद कसे होऊ दिले?”

“कारण यापासून वाचता येत नाही. पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त ताकदवान आहेत.”

“सिंह माणसापेक्षा जास्त बलवान असतो, तरीही माणुस त्याला आपल्यापेक्षा वरचढ होऊ देत नाही. तुम्ही तुमच्या अधिकारांबाबत फार बेपर्वाई केली आहे. आपल्या हितांकडे डोळेझाक करून आपले नैसर्गिक अधिकारही गमावले आहेत.”

“परंतु सिस्टर सारा, आम्ही आपली सर्व कामं जर स्वतःच केलीत तर मग पुरुष काय करतील?”

“त्यांनी काहीही करू नये. माफ कर, ते काही करण्यास लायक नाहीत. त्यांना पकडा आणि जनानखान्यात बंद करून टाका.”

“परंतु त्यांना पकडून चार भिंतीच्या आत कैद करणं काय सोपं असेल?” मी म्हणाले. “आणि जर का आम्ही हे करण्यात यशस्वी झालो तरी त्यांचे राजकीय आणि इतर कामंही त्यांच्याबरोबर जनानखान्यात जाणार नाहीत का?”

सिस्टर साराने कोणतेही उत्तर दिले नाही. तिने केवळ मंद स्मित केले. माझ्यासारख्या विहीरीतील बेडकाशी वाद घालण्यात काही लाभ नाही, असे कदाचित तिला वाटले असावे.

तोपर्यंत आम्ही सिस्टर साराच्या घरी पोहचलो होतो. ते हृदयाच्या आकाराच्या एका बागेत बनलेले होते. नालीदार छत असलेला तो एक बंगला होता. आमच्या चांगल्यात चांगल्या इमारतीपेक्षा जास्त थंड व चांगला होता. तो किती नीटनेटका होता याचे वर्णन मी करू शकत नाही. सुंदर फर्निचर आणि सुरेख सजावटीबद्दल तर सांगायलाच नको.

आम्ही कोपर्‍यातच बसलो. दिवाणखान्यातून ती कलाकुसरीचा एक तुकडा घेऊन आली व त्यावर एक नवीन कलाकृती तयार करू लागली.

“तुला विणकाम आणि कलाकुसरीचे काम येते का?”

“होय, जनानखान्यात याशिवाय आम्हाला दुसरे कोणते कामच नसते.”

“परंतु आम्ही कलाकुसरीच्या कामासाठी जनानखान्यातील पुरुषांवर भरवसा करीत नाही. त्यांना तर सुत सुद्धा सुईत टाकता येत नाही!” ती हसत म्हणाली.

“हे सर्व तु स्वतःच केले आहेस का?” मी स्टूलावरील कलाकुसर केलेल्या तुकड्याकडे इशारा करत विचारले.

“होय.”

“हे सारं करण्यासाठी तू वेळ कसा काढतेस? तुला कार्यालयीन काम सुद्धा करावं लागते की नाही?”

“अरे मी संपुर्ण दिवस प्रयोगशाळेत चिकटून नसते. मी माझे काम दोन तासात आटोपते.”

“केवळ दोन तासात! तू कशी करतेस? आमच्या देशात अधिकारी, मजिस्ट्रेट यांसारखे लोक सात तास काम करतात.”

“मी त्यांना काम करताना पाहिले आहे. तुला वाटते काय की ते पूर्ण सात तास काम करतात?”

“होय, नक्कीच!”

“नाही लाडके सुलताना, ते नाही करत. ते त्यांचा वेळ सिगारेट ओढण्यात वाया घालवतात. काही तर कार्यालयीन वेळेत दोन ते तीन पाकीट सिगारेट ओढतात. ते त्यांच्या कामाच्या बाबतीत गप्पा जास्त व काम कमी करतात. समज, एक सिगारेट ओढण्यास अर्धा तास लागतो आणि एक माणूस दिवसभरात बारा सिगारेटी ओढतो. तर तूच पहा की, दिवसभरात तो सहा तास सिगारेटी ओढण्यात वाया घालवतो.”

वेगवेगळ्या मुद्यांवर झालेल्या आमच्या गप्पागोष्टीत माझ्या हे लक्षात आले की त्यांना महामारी होत नाही की आम्हाला चावतात तसे त्यांना डांसही चावत नाहीत. मला हे पाहून आश्चर्य वाटले की स्त्रियांच्या देशात एखाद्या अपघाताशिवाय कुणीही तारुण्यात मृत्यूच पावत नाही.

“तुला माझे स्वयंपाकघर पहायला आवडेल का?” तिने मला विचारले.

“आनंदाने,” मी म्हणाले आणि मग आम्ही स्वयंपाकाची खोली पहायला निघालो. मी ते पहायला जात होतो तेव्हा कदाचित पुरूषांना ते स्वच्छ करायला सांगितले गेले होते. स्वयंपाकघर एका सुंदर परसबागेत होते. प्रत्येक वेल, प्रत्येक टमाटर जणू एक दागिना भासत होता. स्वयंपाकघरात कोणतेही धुरकांडे दिसले नाही. ते स्वच्छ आणि लख्ख उजेडयुक्त होते. त्याच्या खिडकीवर सुंदर फुलं लागलेली होती. कोळसा आणि धुराचे कोणतेही चिन्ह नव्हते.

“तुम्ही लोकं स्वयंपाक कसा करता?” मी विचारले.

“सूर्याच्या उष्णतेने.” हे सांगत असताना तिने एक नळकांडे दाखवले ज्यातून सूर्याचा दाट प्रकाश व उष्णता येत होती. मग तिने मला पद्धत समजावून सांगण्यासाठी एक पदार्थ शिजवून दाखवला.

“तुम्ही सूर्यप्रकाश गोळा कसा करता व साठवून कसा ठेवता?” आश्चर्यचकित होऊन मी विचारले.

“मला आपल्या लोकांचा इतिहास थोडक्यात सांगू दे. आमच्या प्रिय महाराणीला वयाच्या तेराव्या वर्षीच राज्याची गादी मिळाली. ती केवळ दाखवण्यापुरती राणी होती. देशाची खरी सत्ता तर पंतप्रधानाकडे होती.

आमच्या प्रिय राणीला विज्ञानाची फार आवड होती. त्यांनी हुकूम काढला की त्यांच्या देशातील सर्व मुलींना शिक्षण देण्यात यावे. अशाप्रकारे मुलींसाठी सरकारने खूप शाळा काढल्या. स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार झाला. कमी वयात होणार्‍या विवाहांना आळा बसला. एकेवीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या विवाहांवर पुर्णपणे बंदी आली. मला हे सांगायचे आहे की या परिवर्तनाआधी आम्हाला पडद्यात ठेवले जाई.”

“पण हे कसे केले गेले?” मी हसत विचारले.

“परंतु अंतर अजूनही तेवढंच आहे.” ती म्हणाली. “काही वर्षांत मुलींसाठी वेगळी विश्वविद्यालये असतील ज्यात पुरूषांना प्रवेश दिला जाणार नाही.”

“राजधानीत. आमच्या महाराणी राहतात तिथे, दोन विश्वविद्यालये आहेत. या विश्वविद्यालयांपैकी एकाने निराळ्या फुग्यात कित्येक नळकांडे लावले आहेत आणि या बंद फुग्याला ढगांच्या वर तरंगत ठेवण्यात त्यांना यश मिळाले आहे. तिथे गरजेनुसार वातावरणातून पाणी गोळा केले जाते. आता विश्वविद्यालय पाणी एकत्र करत असल्याने ढग तयार होत नव्हते. अशा प्रकारे महिला प्राचार्यांनी पाऊस आणि वादळ थांबवले.”

“खरंच! आता मला कळले की येथे मातीच्या झोपड्या का नाहीत ते.” मी म्हटले. परंतु मला हे अजूनही समजलेले नाही की नळकांड्यांमध्ये पाणी कसे जमा केले जाऊ शकते. तिने मला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतु माझ्या डोक्यात काहीच शिरले नाही, कारण मला विज्ञानाबाबत जराही ज्ञान नव्हते… असू दे, तिने आपली गोष्ट सुरू ठेवली. “जेव्हा इतर विश्वविद्यालयांना ही बाब कळली तर त्यांना असूया निर्माण झाली व त्यांनी यापेक्षाही वेगळे काही तरी करण्याचे ठरवले. त्यांनी एक असे यंत्र तयार केले, ज्याच्या सहाय्याने ते सूर्याची उष्णता पाहिजे तेवढी जमा करू शकत होते. ते ती उष्णता साठवून ठेवत व जेव्हा ज्याला जेवढी गरज असेल त्याला तेवढी देत असत.

“स्त्रिया जेव्हा वैज्ञानिक संशोधनात गुंतलेल्या असत तेव्हा या देशातील पुरुष सैन्याला बळकट करण्यात व्यस्त होते. महिला विश्वविद्यालय हे वातावरणातून पाणी व सूर्याची उष्णता एकत्र करण्यात यशस्वी झाल्याचे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी विश्वविद्यालय सदस्यांची टिंगल केली आणि या संपूर्ण कार्याला ‘एक भयानक भावनात्मक दुःस्वप्न’ अशी नावे ठेवली!”

“खरंच, तुम्ही जे काही मिळवलं ते आश्चर्यकारक आहे! परतू मला एक सांग की या देशातील पुरूषांना जनानखान्यात ठेवण्यात तुम्हाला यश कसं मिळालं. तुम्ही लोकांनी आधी त्यांना…

“नाही”

“असं तर होऊ शकत नाही की आपणच स्वच्छंद आणि मुक्त हवेतील जीवन सोडून जनानखान्याच्या चार भिंतीत स्वतःला कैद केलं असेल! त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला असेल.”

“होय, करण्यात आला!”

“कुणी केला? महिला सैनिकांनी?”

“नाही, शस्त्रांच्या बळावर नव्हे”

“होय, हे शक्य नव्हते. पुरुषांच्या मनगटात स्त्रियांपेक्षा जास्त ताकद असते. मग?”

“बुद्धीने.”

“खरे तर त्यांची बुद्धी स्त्रियांच्या बुद्धीपेक्षा मोठी व चलाख असते. असं नाही का?”

“पण त्यानं काय होतं? हत्तीचा मेंदू सुद्धा पुरुषांच्या मेंदूपेक्षा जास्त मोठा व चलाख असतो. परंतु तरीही पुरुष हत्तींना साखळदंडांनी कैद करून त्याला आपल्याला पाहिजे तशी कामे करवून घेऊ शकतो.”

“अगदी बरोबर, परंतु मला हे सांग की प्रत्यक्षात हे सारं घडलं कसं? मी जाणून घेण्यास उतावीळ होते आहे!”

“स्त्रियांचा मेंदू पुरुषांच्या मेंदूच्या तुलनेत अधिक वेगाने कार्य करतो. दहा वर्षांपूर्वी जेव्हा सैन्याच्या काही अधिकार्‍यांनी आमच्या वैज्ञानिक शोधांची ‘एक भयंकर भावनात्मक दुःस्वप्न’ म्हणत थट्टा उडवली, तेव्हा आमच्या काही तरुण महिला त्यांना प्रत्युत्तर देऊ पाहत होत्या. परंतु दोन्ही महिला प्राचार्यांनी त्यांना रोखले आणि म्हणाल्या, की प्रत्युत्तरच द्यायचे असेल तर शब्दांनी नव्हे, संधी मिळाली की कार्याने द्या. आणि त्यांना संधीची फार वाट पहावी लागली नाही.”

“व्वा, किती मजेदार!” मी मनापासून टाळी वाजवली. “आणि आता ते गर्विष्ठ सभ्य गृहस्थ स्वतःच भावनात्मक दुःस्वप्न पाहत आहेत.”

“यानंतर काही दिवसांनी शेजारच्या देशातील काही लोक आले आणि येथेच राहिले. त्यांनी कोणता तरी राजकीय गुन्हा केल्यामुळे ते संकटात होते. राजा चांगल्या राज्यकारभारापेक्षा बळाचा वापर करण्यावर अधिक भर देत असे, त्याने आमच्या नाजुक हृदयाच्या राणीला निवेदन केले  की  त्याच्या अधिकार्‍यांना परत करावे. शरणागतांना परत करणे त्यांच्या तत्वांच्या विरुद्ध असल्याने राणीने नकार दिला. या नकारानंतर राजाने आमच्या देशाविरुद्ध युद्धाची घोषणा केली.

“आमच्या सैन्य आधिकार्‍यांनी धडाधड तयारी केली आणि शत्रूशी दोन हात करण्यास ते निघून गेले. खरे तर शत्रु आमच्यापेक्षा किती तरी बलाढ्य होता, तरीही आमचे सैनिक निकराने लढलेत. परंतु त्यांच्या प्रचंड शौर्यानंतरही परदेशी सैन्याने आमच्या देशावर ताबा  मिळवला.

“सर्वच पुरुष युद्धाच्या आघाडीवर गेलेले होते, अगदी सोळा वर्षाचा एक मुलगाही घरात राहिला नव्हता. आमचे बहुतेक योद्धे कामी आले होते. उरलेल्यांना पिटाळून लावले गेले होते आणि शत्रूचे सैन्य राजधानीपासून पंचवीस मैलावर येऊन ठेपले होते.

“देश कसा वाचवला जाऊ शकतो, यावर काही जाणकार महिलांची एक बैठक राणीच्या महालात बोलावण्यात आली होती. काहींनी योद्धयांसारखे लढण्याचा सल्ला दिला तर काहींनी याला विरोध करत म्हटले की स्त्रियांना सैंनिकांसारखं तलवार आणि बंदुकांचं प्रशिक्षण मिळालेलं नाही व त्यांना  शस्त्रांनिशी लढण्याची सवय सुद्धा नाही. इतर काही लोकांनी तर येथपर्यंत म्हटले की त्या तर शारीरिकदृष्ट्या अतिशय कमकुवत आहेत.

“तुम्ही जर शारीरिक बळावर आपल्या देशाला वाचवू शकत नसाल तर आपल्या बुद्धीच्या बळावर त्याला वाचवा.”

“काही क्षण स्मशान शांतता पसरली. राणींनी पुन्हा म्हटले, “जर माझी मातृभूमि आणि माझी प्रतिष्ठा धुळीस मिळाली तर मी जीव देईन.”

“तेव्हा संपुर्ण चर्चा शांतपणे ऐकत असलेल्या एका विश्वविद्यालयाच्या महिला प्राचार्यांनी (ज्यांनी सूर्याची उष्णता साठवली होती) म्हटले, की राज्य हातातून गेले आहे व आपण कोणतीही आशा बाळगू नये. खरे तर एक योजना अजून होती जिला त्या शेवटचा उपाय म्हणून अमलात आणू पाहत होत्या. जर त्या यात अयशस्वी राहिल्या तर आत्महत्येशिवाय कोणताही मार्ग शिल्लक उरला नसता. तेथे असलेल्या लोकांनी निश्चय केला की काहीही झाले तरी ते स्वतःला गुलाम होऊ देणार नाहीत.

“राणीने त्यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले आणि महिला प्राचार्यांना त्यांची योजना अमलात आणण्यास सांगितले. महिला प्राचार्या पुन्हा उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, “आम्ही बाहेर जाण्याआधी पुरुषांनी जनानखान्यात आले पाहिजे. गुप्ततेसाठी मी ही  विनंती करेन.”

“होय, नक्कीच”, राणीने समर्थन केले.

“दुसर्‍या दिवशी राणीने प्रतिष्ठा व स्वातंत्र्यासाठी सर्व पुरूषांना जनानखान्यात येण्यास सांगितले. ते एवढे थकलेले व घायाळ होते की त्यांना हा आदेश म्हणजे एक वरदान वाटला! त्यांनी खाली माना घातल्या आणि विरोधात ब्र सुद्धा न उच्चारता जनानखान्यात प्रवेश केला. त्यांना पूर्ण खात्री होती की आता देशाचं काहीही होणे शक्य नाही.

“त्यानंतर महिला प्राचार्या आपल्या दोन हजार विद्यार्थिंनींना सोबत घेऊन युद्धभूमीकडे निघाल्या आणि त्या तेथे पोहचताच सूर्याचा संघटीत प्रकाश आणि उष्णता शत्रूकडे वळवली.

“एवढी प्रखर उष्णता आणि प्रकाश शत्रूला सहन करण्यापलिकडे होता. ते अतिशय घाबरून पळून गेले. या भाजणार्‍या उष्णतेचा सामना कसा करावा हे त्यांना सुचेना. ते त्यांच्या बंदुका आणि गोळा-बारुद टाकून पळाले तेव्हा आम्ही ते सारेच सूर्याच्या उष्णतेने जाळून टाकले. तेव्हापासून कुणीही आमच्या देशावर हल्ला करण्याची हिंमत केली नाही.”

“आणि तेव्हापासून तुमच्या देशातील पुरुषांनी जनानखान्याच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला नाही?”

“हं, त्यांना मुक्त व्हायचे आहे. काही पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांनी पत्रे लिहिली की सैन्य अधिकार्‍यांचे अपयश पाहता ते निश्चितच तुरुंगात जाण्यास पात्र आहेत, परंतु त्यांनी कधीही त्यांच्या कर्तव्यात कसूर केली नसल्यामुळे त्यांना शिक्षा करण्यात येऊ नये आणि त्यांच्या विनंतीनुसार त्यांना त्यांचे विभाग सोपवण्यात यावेत.

“महाराणीने त्यांना एक पत्र पाठवले. त्यात म्हटले होते की भविष्यात त्यांच्या सेवेची गरज भासली तर त्यांची सेवा घेतली जाईल. तोपर्यंत त्यांना ठेवले तेथेच त्यांनी रहावे. आणि पडदा पद्धत त्यांच्या अंगवळणी पडली असल्याने आणि त्यांनी एकाकीपणावर असंतोष दाखवणे सोडून दिले असल्याने आम्ही सुद्धा या व्यवस्थेला ‘जनाना’ ऐवजी ‘मर्दाना’ संबोधणे सुरू केले आहे.

“परंतु तुम्हाला हे सारं करणं कसं शक्य होतं?” मी सिस्टर साराला विचारले. “चोरी किंवा खूनाच्या प्रकरणात पोलिस किंवा न्यायाधीशाशिवाय हे कसं होऊ शकतं?”

“जेव्हापासून ‘मर्दाना’ व्यवस्था लागू झाली तेव्हापासून गुन्हे बंद झाले. त्यामुळे आता गुन्हेगारांना शोधण्यासाठी आम्हाला  पोलिसांची गरज उरली नाही. आणि एखाद्या न्यायाधीशाने एखाद्या गुन्हेगारावर खटला चालवावा अशी आमची इच्छाही  नाही.”

“अरे, ही तर फार चांगली गोष्ट आहे. आता एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा करणं सुद्धा फार सोपं झालं असेल, असं मला वाटते. तुम्ही रक्ताचा एक थेंबही न सांडता अंतिम विजय मिळवला, त्यामुळे तुम्ही गुन्हे आणि गुन्हेगारांनाही तेवढ्याच सहजपणे संपवू  शकता!”

“प्रिय सुलताना, तू इथेच बसणार आहेस की माझ्यासोबत पार्लरला चलशील?” तिने विचारले.

“तुझे स्वयंपाकघर तर महारणीच्या श्रुंगार कक्षापेक्षा कमी सुंदर नाहीये!” स्नेहयुक्त स्मित करत मी उत्तर दिले, “परंतु आम्ही आता त्यांना सोडून दिले पाहिजे. मी त्यांना एवढे दिवस स्वयंपाकाच्या कामापासून दूर का ठेवले मी त्यांना एवढे दिवस स्वयंपाकाच्या कामापासून दूर का ठेवले म्हणुन ते मला शिव्या घालत असतील.” आम्ही दोघीही मोठयाने हसलो.

“मी विचार करते आहे की स्त्रियांच्या या दूरवरच्या देशात स्त्रिया सर्व सामाजिक प्रकरणे हाताळतात आणि देशाचा राज्य कारभार चालवतात, जेव्हाकी पुरूषांना मुलांची देखभाल, स्वयंपाक व इतर घरगुती कामांसाठी मर्दानखान्यात ठेवले जाते, हे घरी माझ्या मित्रांना कळेल तेव्हा त्यांना किती आश्चर्य वाटेल! येथील गोष्टी ऐकून त्यांच्या हे लक्षात येईल की स्वयंपाक करणे किती सोपं व आनंददायक सुद्धा असू शकते!”

“होय, तू इथे जे काही पाहिलंस, ते सारं त्यांना सांगायचं.”

“आता मला हे सांग की तुम्ही जमिनीवर शेती कशी करता, त्यांची वाहीजुपी कशी करता? इतर कामं कशी आटोपता?”

“आमच्या शेतीची वाहीजुपी वीजेवर वीजेने होते. विजेच्या सहाय्यानेच आम्ही इतर कामंही पार पाडतो. तिचाच वापर आम्ही आकाशी प्रवासाकरिता सुद्धा करतो. आमच्याकडे कोणतीही रेल्वे किंवा महामार्ग नाहीय.”

“म्हणुनच इथे कोणतीही रेल्वे किवा सडक दुर्घटना होत नाही” मी म्हणाले. “परंतु तुम्हाला कधी पावसाच्या पाण्याची कमतरता भासत नाही?”

“जेव्हापासून ‘पाण्याचे फुगे’ लावले गेले आहेत, तेव्हापासून तरकधीच नाही. तू पाहिले आहेस ना की त्या विशाळ फुग्याला  नळकांडे कशी जोडलेली आहेत ते. त्यांच्या सहाय्याने जेवढ्या पावसाची व पाण्याची गरज असते तेवढे आम्ही घेत असतो. आम्हाला कधीच पूर किंवा वादळाचा सामना करावा लागत नाही. निसर्ग आम्हाला जे कमाल देऊ शकते, त्याचा फायदा आम्ही घेत असतो. आमच्याकडे कुणाशी भांडण करण्यास वेळच नसतो. नेहमी काही ना काही काम असतेच. आमच्या महाराणीला वनस्पती विज्ञानात फार रस आहे. त्यांची मनस्वी इच्छा आहे की या देशाचे रूपांतर एका प्रचंड उद्यानात करावे.”

“हा विचार तर फारच छान आहे. तुमचे मुख्य अन्न काय आहे?”

“फळे”

“उन्हाळ्याच्या दिवसांत तुम्ही तुमच्या देशाला थंड  कसे ठेवता? उन्हाळ्यात तर आम्हाला पाऊस म्हणजे स्वर्गाचा आशीर्वादच वाटतो.”

“उष्णता जेव्हा सहन करण्यापलिकडे जाते, तेव्हा आम्ही स्वतः तयार केलेल्या फवार्‍यांनी जमिनीवर खूप सिंचन करतो. आणि थंडीच्या काळात आम्ही आपल्या खोल्या सूर्याच्या उष्णतेने उबदार ठेवतो.”

तिने मला तिचे स्नानगृह दाखवले ज्याचे छत सरकवले जाऊ शकत होते. तिला वाटेल तेव्हा फक्त छत सरकवून आणि फवार्‍याचा नळ सुरू करून ती फवार्‍याचा आनंद घेऊ शकत होती. (छत एखाद्या पेटीच्या झाकणासारखे होते)

“तुम्ही लोक भाग्यवान आहात!” माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले. “तुम्हाला तर तृष्णाच नाही. मी विचारू शकते का की तुमचा धर्म कोणता आहे?”

“आमचा धर्म प्रेम आणि सत्त्यावर आधारलेला आहे. आम्ही एकमेकांवर प्रेम करावे आणि पूर्ण सत्त्याच्या मार्गावर चालावे, हे आमचे धार्मिक कर्तव्य आहे. जर एखादी व्यक्ति खोटं बोलत असेल तर….”

“मृत्युची शिक्षा?”

“नाही, मृत्युदंड नाही. ईश्वराने जो जीव निर्माण केला आहे, खास करून मनुष्य, त्याला मारण्यात आम्हाला कोणताही आनंद मिळत नाही. गुन्हेगाराला सांगितले जाते की सर्वांच्या भल्याकरिता त्याने नेहमीकरिता हा देश सोडून जावे व पुन्हा कधी परत येऊ नये.”

“कुण्या गुन्हेगाराला कधी क्षमा केली जात नाही का?”

“केली जाते, खरोखरच त्याला पश्चाताप झाला असेल तर.”

“तुमचे नातेवाईक सोडले तर इतर पुरुषांकडे पाहण्याचा तुम्हाला अधिकार नाही का?”

“पवित्र नाते सोडले तर इतर कुणाकडेही नाही.”

“पवित्र नात्यांचे आमचे वर्तुळ फार लहान आहे. एवढेच नव्हे तर सख्ख्या चुलत- मामे भावा बहिणींना सुद्धा पवित्र मानले जात नाहीय.”

“परंतु आमचे वर्तुळ फार मोठे आहे. दूरच्या नात्यातील भाऊ सुद्धा सख्ख्या भावाप्रमाणेच पवित्र मानला जातो.”

“ही तर फार चांगली गोष्ट आहे. मी पाहते आहे की तुमच्या देशात पवित्र्याचाच कारभार आहे. ज्या एवढ्या दूरचा विचार करतात व ज्यांनी हे सारे नियम व कायदे बनवले त्या तुमच्या महाराणीला मला पहायचे आहे.”

सिस्टर सारा म्हणाली, “ठीक आहे.”

मग तिने पेचाने एका पाटीवर खुर्च्या कसल्या. या पाटीला तिने गुळगुळीत व अतिशय चकचकीत केलेले चेंडू जोडले. मी जेव्हा विचारले की हे चेंडू कशासाठी, तर तिने सांगितले की हे हायड्रोजन चेंडू आहेत जे गुरुत्वाकर्षणाचा सामना करतील. वेगवेगळ्या भाराच्या गुरुत्वाकर्षणाविरुद्ध वेगवेगळ्या क्षमता असलेले चेंडू आहेत. मग तिने वायुवर चालणार्‍या मोटारगाडील पंखांसारखी दोन पाती लावली. तिने सांगितले की ती विजेवर चालतील. आम्ही चांगल्या प्रकारे बसल्यावर तिने एक बटन दाबले आणि पाती फिरू लागलीत. ती वेगाने व अधिक वेगाने फिरू लागलीत. आधी तर आमची हवाई मोटारगाडी सहा सात फूट वर उठली आणि मग उडू लागली. मला आठवते, माझ्या मैत्रिणीने यंत्राला विरुद्ध दिशेने फिरवून हवाई मोटारगाडीला खाली आणले. हवाई मोटारगाडी जमिनीला टेकली  तेव्हा यंत्र बंद झाले आणि आम्ही बाहेर आलो.

मी हवाई मोटारगाडीतून बघितले होते की महाराणी त्यांच्या चार वर्षाची मुलगी व खास सेविकांसोबत बागेत फिरत होत्या.

“अरे, तू इथे आहेस!” महाराणीने सिस्टर साराकडे पाहत म्हटले. माझा महाराणींशी परिचय करून देण्यात आला आणि त्यांनी कोणताही बडेजाव न दाखवता माझे स्वागत केले.

महाराणींना आपला परिचय देऊन मी फार खुष होते. बातचीत करताना महाराराणींनी सांगितले, की आपल्या नागरिकांनी इतर देशांशी व्यापार करण्यास त्यांची कोणतीही हरकत नाही. “परंतु”, त्यांनी पुढे म्हटले की जे आपल्या स्त्रियांना जनानखान्यात ठेवतात त्या देशांसोबत कोणत्याही प्रकारचा व्यापार शक्य नव्हता आणि म्हणूनच ते आमच्या सोबत व्यापार करू शकत नाहीत. आम्हाला पुरुष हे नैतिक दृष्ट्या समाधानकारक न वाटल्याने आम्ही त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण करीत नाही. आम्ही इतर कुणाचीही जमीन बळकावत नाही, हिर्‍याच्या एका लहानशा तुकड्यासाठी भांडत नाही मग तो कोहिनूरपेक्षा कितीही महागडा का असेना आणि आम्ही कोणत्याही शासकाची सत्ता उलटवत नाही. आम्ही ज्ञानाच्या खोल सागरात बुडी मारतो आणि ते मूल्यवान हीरे शोधण्याचा प्रयत्न करतो ज्यांना निसर्गाने आपल्या खजिन्यात आमच्यासाठी सांभाळून ठेवले आहेत. निसर्गाच्या देणग्यांचा जेवढा जास्त आनंद लुटता येईल तेवढा आम्ही लुटतो आहोत.”

महाराणींना भेटल्यानंतर मी प्रसिद्ध विश्वविद्यालय पहायला गेले. तेथे मला त्यांनी तयार केलेली उपकरणे, प्रयोग शाळा, आणि वेध शाळा दाखवण्यात आल्या.

आपली आवडती स्थळे पाहिल्यानंतर आम्ही परत हवाई मोटारगाडीत बसलो. परंतु ती सुरू होताच, नकळत मी घसरून पडले व माझी झोपमोड झाली. आपले डोळे उघडल्यावर मी स्वतःला आराम खुर्चीत पहुडलेले पाहिले.

 

 

[‘लेखिकेने पद्मराग कादंबरी व मोतीचूर आणि अवरोधवासिनी हे कथा संग्रह आणि अनेक विचारोत्तेजक साहित्य लिहिले आहे. १९०९ साली भागलपुरात पतीच्या सहाय्याने मुलींसाठी शाळा सुरु केली. पतीच्या मृत्युनंतर त्यांनी १९११ साली कलकत्त्यात मुलींची शाळा काढली. महिला  शिक्षणासाठी त्यांनी अनेक कामे केली. अविभाजित भारताच्या महान ठेवा असलेल्या या लेखिकेचे ९ डिसेंबर १९३२ रोजी निधन झाले. भारत आणि पाकीस्थानाला त्यांचा विसर पडला असला तरी  त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजही बांग्ला देशात ९ डिसेंबर हा रुकैय्या दिन साजरा केला जातो.]

Leave a Comment