[dropcap]२[/dropcap]०१९ च्या लोकसभा निवडणुकांचे  निकाल नुकतेच जाहीर झालेले आहेत. देशात पुन्हा एकदा ब्राह्मण्यवादी अतिरेकी शक्ती सत्तेवर आल्या आहेत. अलिकडच्या सभेत तुम्ही पहिले असेल की नरेंद्र मोदी व अमित शहा यांना कम्युनिस्ट विचारांचे प्राबल्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये २०१४ च्या २ जागांवरून वरुन यावेळी १८ जागा मिळाल्याचा सर्वांत जास्त आनंद होता. कम्युनिस्ट सतत तीस वर्षे सत्तेत असताना तेथे या ब्राह्मण्यवादी पक्षाला एक जागाही मिळत नव्हती तेथे १८ जागा मिळाल्यामुळे उकळ्या फुटत आहेत. डाव्यांनाही २०१४ मध्ये २०% मते होती ती आता केवळ ८% वर आली आहेत. ममता बॅनर्जी व डाव्यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणूकीसाठी युती केल्यास भाजपचा तेथे सुपडा साफ होणे अजिबात अवघड नाही. केरळ या कम्युनिष्टाच्या दुसऱ्या बालेकिल्ल्यात अद्याप एक जागाही भाजपला  मिळालेली नाही.

उत्तर प्रदेशात सपा-बसपच्या महायुतीलाही अपेक्षेनुसार जागा मिळाल्या नाहीत. याचे एक कारण स्वतंत्रपणे  लढलेली कॉंग्रेस हेही आहे (कदाचित रॉबर्ट वाड्रावर कारवाई न करण्यासाठी हे डील गांधी कुटुंबीय व नरेंद्र मोदी यांच्यात झाले असावे) देशभरात अनेक ठिकाणी असे स्वतंत्र लढून कॉंग्रेसने केवळ स्वत:चा माजच दाखवला नाही तर ती कशी बीजेपीची छूपी बी टीम आहे हेही दाखवून दिले आहे.

महाराष्ट्रात सेना भाजपला ४१ जागा मिळल्याचे मोठे श्रेय वंचित बहुजन आघाडीलाच आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा माज हेही कारण आहेच परंतु राजकारणात लवचिकता दाखविणे गरजेचे असते. ती न दाखवता ताठर भूमिका घेऊन सर्व ४८ जागा लढविण्यापेक्षा मोजक्या ४-५ जागा लढवून तेथील उमेदवार कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने निवडून आणले असते तर खरे उपद्रवमुल्य तयार झाले असते. केवळ औरंगाबादमध्ये वंचितचा एक उमेदवार एआयएमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आलेत. त्याचे मोठे श्रेय अपक्ष म्हणून उभे राहून मोठी मते खाणारे हर्षवर्धन जाधव यांना जाते. जाधवांसाठी त्यांचे दानवेंनीही मदत केली अशी चर्चा आहे.

जम्मू काश्मिरमध्येही आता पीडीपी नॅशनल कॉन्फरन्स यांनी खऱ्या अतिरेकी शक्तींचा पराभव करण्यासाठी सतत एकत्र रहावे, तरच खोऱ्यातील सरकार पुरस्कृत निष्पापांच्या राजरोस होणाऱ्या हत्या कमी होतील. आंध्र प्रदेश मध्ये जगमोहन रेड्डीला सर्वाधिक जागा मिळाल्यात तरी ते वडिलांच्या हेलिकॉप्टरचे स्क्रू ढीले करणाऱ्यांबरोबर जाताहेत. तामिळनाडूत कम्युनिस्टांच्या भाकप व भाकप (मार्क्सवादी) या दोन पक्षांना प्रत्येकी २ व ३ जागा मिळाल्यात तरी अजून या दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण होईना. परंतु सेक्युलर डीएमकेने यंदा तेथे बाजी मारली आहे.

घृणा, कट्टरता, दहशतवाद, पाकिस्तान, मंदिर-मस्जिद, गाय-गोमूत्र, हिंदू-मुस्लीम हे मुद्दे जिंकले आहेत व शिक्षण, रोजगार, पाणी, पर्यावरण, समता, स्वातंत्र्य, बंधुता, वैज्ञानिक दृष्टिकोण यांचा राजकीय पराभव झाला आहे. भाजप खरोखरीच कॉंग्रेसमुक्त भारत करायचे असेल तर सर्व सेक्युलर लोकशाहीवादी शक्तींना आनंदच होईल. परंतु ते असे कधीच करणार नाहीत. कारण कॉंग्रेसच्या काळातच इतकी वर्षे संघ परिवाराचे विष शांतताप्रिय भारतीय समाजात मंद विषाप्रमाणे पसरले आहे व पसरत आहे. परंतु ही विषवल्ली ठेचून काढण्यासाठी कॉंग्रेसने कधीच मोठी पावले उचलली नाहीत. तसेच हेमंत करकरेंच्या रुपाने प्रचंड मोठी संधी त्यांच्यासमोर चालून आलेली असतानाही त्यांची हत्या झाल्यावरही कॉंग्रेसच्या काळात २००९ ते २०१४ पर्यंत मालेगाव व इतर असंख्य बॉम्बस्फोट प्रकरणात ब्राह्मण्यवादी अतिरेकी शक्तींविरुद्ध प्रामाणिक आयपीएस अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ठोस धडक कारवाई हाती घेतली नाही. तसेच मालेगाव प्रकरणाची सुनावणीही सुरु करू शकले नाहीत.

 

“इतने कम लोग कैसे मरे? गाडी भीड मे क्यो नही लगाई”, असे मालेगाव बॉम्बस्फोटांनंतर म्हणणाऱ्या साध्वीचे संभाषण आपण २००८ मध्ये टीव्हीवर पाहिले असेल. आज हेच अतिरेकी निवडून आलेत व कन्हैय्या कुमार सारखा या अतिरेकी शक्तींना पुरुन उरणारा तरुण नेता पराभूत झाला आहे.

 

बहुजन विचारधारेशी द्रोह केलेले नीतीशकुमार, रामविलास पासवान, रामदास आठवले असे अनेक लोकही या  उजव्या अतिरेकी शक्तींना बळ देत आहेत. जे बेरोजगारी, स्वस्त घरे, वीज, पाणी, भ्रष्टाचार, राफेल व इतर घोटाळे, आरबीआय, सीबीआय, ईडी, युजीसी, निवडणूक आयोग व इतर संस्थात्मक लोकशाही संस्था मोडून काढणे, मिडिया-न्यायपालिका-प्रशासनात ब्राह्मण्यवादी अधिकारी घुसविणे, नोटबंदी घोटाळा, जीएसटीने लावलेली छोट्या उद्योगधंद्यांची व अर्थव्यवस्थेची वाट, पेट्रोल व डिझेलचे वाढलेले दर, जमावाने केलेल्या निष्पाप दलित व मुस्लिमांच्या हत्या अशा र्व आघाड्यांवरील अपयश झाकण्यासाठी आयबी व मिडियातील अतिरेकी शक्तींच्या मदतीने खोटे अतिरेकी हल्ले घडवून पाकिस्तान विरोधात हल्ल्याचे वातावरण देशात निर्माण केले व निष्पाप सैनिकांच्या हत्यांवर आपली राजकीय पोळी भाजली. त्यांना “जशी प्रजा तसा राजा” प्रमाणेच एक विकृत नेता मिळाला आहे, जो येत्या काळात उरल्यासुरल्या संस्थाही उद्धस्त केल्याशिवाय राहणार नाही.

केजरीवाल यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपविरोधात सर्वांनी एकच उमेदवार द्यायला हवा तसेच केजी टू पीजीपर्यंत  समान व मोफत, सरकारी सार्वत्रिक शिक्षण, मोफत सरकारी व दर्जेदार आरोग्य सुविधा, सर्वांना रोजगार, खासगीकरणाच्या देशद्रोही धोरणाला विरोध, सर्वांना स्वस्त व दर्जेदार घरे, राष्ट्रीय पाणी धोरण, कर दहशतवाद कमी करुन सर्व वस्तुंवर जास्तीत जास्त ५% कर अशा किमान समान कार्यक्रमावर एकत्र यायला हवे. तरच भारताला खऱ्या विकासाच्या वाटेवर नेता येईल व फुले-शाहू-आंबेडकर-सावित्री-शिवाजींच्या विचारांचा भारत घडवता येईल. ‘संघर्ष हेच जीवनाचे दुसरे नाव आहे’, त्यामुळे आपण सर्व देश वाचविण्यासाठी संघर्ष करत राहू यात.

 

(लेखातील मते लेखकाची स्वतःची आहेत. त्या मतांशी सहमत असणे आमच्यावर बंधनकारक नाही.-संपादक)

Leave a Comment