श्रद्धा, अंधश्रद्धा आणि शास्त्रीय दृष्टिकोण

Published on

भारतीय राजकारणात भाजपच्या विकासास समांतर अशी देशात शिक्षणाच्या पतनाची प्रक्रिया सुरू आहे.  देशाच्या नव्या शैक्षणिक धोरणाचे अंतिम स्वरूप काय असेल हे अजून स्पष्ट व्हावयाचे आहे. परंतु भाजप अभ्यासक्रम आणि संशोधनाला कोणती दिशा देऊ पाहत आहे, हे त्याच्या नेत्यांची वक्तव्ये आणि भाषणांवरून  स्पष्ट आहे. संस्कृत ही जगातील सर्वात शास्त्रीय भाषा आहे आणि देशातील श्रेष्ठ शैक्षणिक संस्थांनी यावर अधिक कार्य करण्याची गरज आहे, असे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी  अलीकडेच शिक्षणतज्ञांच्या एका बैठकीत सांगितले. त्यांच्यामते येणाऱ्या काळात संस्कृत ही कॉम्प्युटरची भाषा असेल. याव्यतिरिक्त त्यांच्या ज्ञानाची खोली आणि व्यापकता उघड करणारी अनेक रहस्ये मंत्री महोदयांनी  उलगडलीत. एका कार्यक्रमात त्यांनी अणु आणि परमाणु  यांच्या  शोधाचे श्रेय चरक यांना दिले तर दुसऱ्या प्रसंगी प्रणव ऋषीला. त्यांच्या मतेनारद ऋषींनी सर्वात आधी अणु आणि परमाणु यासंबंधीचे प्रयोग केले होते.  ज्योतिष शास्त्र हे विज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री असताना म्हटले होते. त्यांच्या मते गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतांची चर्चा प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये आहे  व न्यूटनच्याही फार पुर्वी आपल्या ऋषी-मुनींना गुरुत्वाकर्षणशक्तीबद्दल माहिती होती.

अशा प्रकारचे दावे करणारे पोखरियाल हे एकमेव नाहीत. वरिष्ठ भाजप नेते मुरली मनोहर जोशी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री असताना त्यांनी ज्योतिष्य विद्या आणि पुरोहिती-कर्मकांड यांसारख्या विषयांचा समावेश अभ्यासक्रमात केला होता. त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाचे जमातवादीकरण करण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता. यालाच पुढे शिक्षणाचे भगवीकरण असे नाव दिले गेले होते. मोदी सत्तेत आल्यानंतर तर प्राचीन भारतासंबंधात आश्चर्यचकित करणारे दावे करण्यात येत आहेत. प्राचीन भारतात प्लास्टिक सर्जरी होत असे याचा पुरावा भगवान गणेश आहेत असेमोदी यांनीमुंबईत एका इस्पितळाचे उद्घाटन करताना म्हटले होते. संघ परिवाराच्या नेत्यांनी आपल्या ज्ञानात जी भर घातली आहे त्याच्या आधारे आपण असे म्हणू शकतोकी प्राचीन भारतात विमाने, क्षेपणास्त्रे,  इंटरनेट, टेलिव्हिजन आणि जेनेटिक इंजीनियरिंग ही सामान्यबाब होती. विज्ञान विज्ञानाच्या प्रगतीकरिता वेदांचे अध्ययन आवश्यक आहे,असे संघ परिवाराचे प्रमुख मोहन भागवत यांनी आधीच म्हटलेले आहे.

गाईने राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासोबतच प्राचीन ज्ञानाचा उदो-उदो करण्याचा एक अध्याय उघडला आहे. गायींमध्ये तेहत्तीस कोटी देवी-देवता वास करतातआणि गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट दैवी व चमत्कारिक गुणांनी परिपूर्ण असल्याचे सांगितले जाते. 'पंचगव्या'वर (गोमूत्र,शेण,दुध, दही आणि तूप यांचे मिश्रण)संशोधन करण्यासाठी सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. रामायण आणि महाभारतातील कथांची शास्त्रशुद्धता सिद्ध करण्यासाठी धनराशी उपलब्ध करून दिली जात आहे.

आस्था आणि श्रद्धा  हे ज्ञानाचे पर्याय बनतील असेच एकूण प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्न तर हा सुद्धा आहे की,पाश्चिमात्त्य राष्ट्रांनी अलीकडील शंभर दीडशे वर्षात जे साध्य केले ते शास्त्रीय महत्कार्य प्राचीन भारताने हजारो वर्षांपूर्वी संपादन केले होतेअशा एका आधुनिक जगाच्या स्वरूपात प्रस्तुत करण्यात यावे. हे दावे हिंदू राष्ट्रवादाला बळकट करण्याच्या प्रकल्पाचा भाग आहेत. आपल्या पूर्वजांनी माकडांपासून मनुष्य बनतांना पाहिले नसल्याने डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत खरा नाही, असे माजी केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग यांनी म्हटले होते. विज्ञानाला खोटे सिद्ध करण्याचे दावे केवळ हिंदू धर्मानुयायीच करत आले आहेत, असे नव्हे. ख्रिश्चन पुराणमतवाद्यांनी डार्विनच्या सिद्धांताच्या उत्तरादाखल विश्वाची निर्मिती ईश्वराने केली असल्याचा सिद्धांत प्रतिपादित केला होता. विजेची कमतरता दूर करण्यासाठी पिशाच्चांच्या अमर्याद शक्तीचा उपयोग केला पाहिजे असा प्रस्ताव जिया-उल-हक  यांच्या राजवटीत पाकिस्तानात मांडण्यात आला होता.

वास्तविक पाहता जगात जवळपास सर्वच ठिकाणी तर्कशुद्ध  दृष्टीकोणाला नेहमीच विरोध होत आला आहे. भारतात जेव्हा वेद ही दैवी निर्मिती असल्याचे चार्वाकांनीअमान्य केले तेव्हा त्यांचा छळ करण्यात आला आणि स्वतंत्र विचार करण्यास प्रोत्साहन दिले जाई अशा लोकायत परंपरेचे दानवीकरण करण्यात आले. युरोपात गॅलिलिओ आणि इतर अनेक शास्त्रज्ञांना चर्चने कशी वागणूक दिली, हे आपण सारे जाणतो. सरंजामदार असोत की पुरोहित असोत, तर्कनिष्ठ दृष्टिकोण हा समाजातील सर्व  शक्तिशाली वर्गांना आपले वर्चस्व आणि सत्ता यांच्याविरोधात आव्हान असल्याचे वाटते.

भारतात भारतीय राष्ट्रवादाच्या उदयासोबतच आंबेडकर, भगतसिंग आणि नेहरू यांसारख्या नेत्यांनी तर्कनिष्ठ  दृष्टिकोणाला प्रोत्साहन दिले. जे लोक समताधिष्ठित आधुनिक लोकशाहीवादी भारताच्या निर्मितीविरुद्ध होते, ज्या लोकांनी कधी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला नाही, जे जमीनदार राजेरजवाडे आणि पुरोहित वर्गाचे दलाल होते, तेच तर्कनिष्ठ दृष्टिकोणाच्या विरुद्ध होते. देशात ज्या प्रकारचे सामाजिक परिवर्तन होत आहे त्यामुळे भारताच्या गौरवशाली भुतकाळाची प्रतिमा पुर्णपणे खंडित होईल, असे त्या वैचारिक समूहाला वाटले. शास्त्रीय दृष्टिकोण हाच भावी काळातील आधुनिक भारताचा पाया असू शकतो, असे नेहरू यांचे मत होते. याच कारणामुळे शास्त्रीय दृष्टिकोणाला प्रोत्साहन देण्याची बाब राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगितली गेली आहे. आणि या दृष्टिकोणानुसार भारतीय तंत्रज्ञान संस्था, विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि भाभा अणुसंशोधन केंद्र यांसारख्या संस्था स्थापन करण्यात आल्या.

मागील काही दशकांमध्ये हिंदू-राष्ट्रवादी राजकारणाच्या उदयासोबतच नेहरूंच्या धोरणांना चुकीचे ठरवले जात आहे आणि तर्कनिष्ठ दृष्टिकोणाला 'परदेशी संकल्पना' सांगितले जात आहे. आस्था आणि श्रद्धेला शास्त्रीय आणि तर्कनिष्ठेपेक्षा श्रेष्ठ दर्जा दिला जात आहे. याच कारणामुळे अंधश्रद्धेच्या विरोधात लढणाऱ्यांना गोळ्या घातल्या जात आहेत. तर्कनिष्ठा आणि शास्त्रीय दृष्टिकोणाची बाजु घेत असल्याने डॉ.नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांना आपले प्राण गमवावे लागले. याउलट मोदींपासून तर निशंक यांचे पर्यंत हिंदू-राष्ट्रवादी नेते एकीकडे तर्कनिष्ठेच्या विरोधात आहेत तर दुसरीकडे जन्मावर आधारित विषमतेचे समर्थक आहेत. हिंदू-राष्ट्रवाद हा आस्थाआणि श्रद्धेला विज्ञानाच्या रूपात प्रस्तुत करून भारताचे गौरवीकरण करत आहेत. त्यायुगातील उच्च-नीचतेवर आधारित समाजाची पुनर्स्थापना हे त्याचे अंतिम ध्येय आहे.

लेखक मुंबई आय.आय.टी.चे निवृत्त प्राध्यापक असून इहवादाचा प्रचार व जमातवादाला प्रखरपणे विरोध करणारे सक्रिय कार्यकर्ते आहेत. या विषयांवरील त्यांचे विपुल लेखन अनेक भाषेत उपलब्ध आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
The Leaflet
theleaflet.in