मैं वो एक  मुश्ते गुबार हूं … ! भाग ३ 

Published on

भगतसिंगांचे लाडके बटुकेश्वर दत्त समाजवादी समाजव्यवस्थेच्या स्थापनेसाठी जीवनाचे बलिदान करणारे उच्च दर्जाचे क्रांतिकारक आणि आणि तेवढेच संवेदनशील विचारवंतही होते, हे त्यांनी लिहिलेल्या या प्रस्तुत लेखावरून दिसून येते. भगतसिंगांसोबत जवळीक, अगदी कमी वयातही क्रांतीबद्दलची त्यांची निष्ठा, स्पष्टता आणि संपूर्ण जीवनात भोगाव्या लागणाऱ्या परिस्थितीशी  मुकाबला करण्याची दुर्मिळ जिद्द यांचे उत्तम उदाहरण आहे.

बाँबगोळा:  इंग्रजी राज्यसत्तेवर

मार्शल  लॉलागू होऊ नये किंवा बाँबटाकण्याच्या गुन्ह्यात निर्दोष व्यक्तींना अटक होऊ नये म्हणून आधीच त्या योजनेनुसार आम्ही दोघांनीही स्वतःला अटक करवून घेतली होती. तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड इरविन यांना घटनेचे मर्म चांगल्या प्रकारे समजले आणि बाँबस्फोटानंतर लगेच विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनात भाषण करताना त्यांनी सांगितले की, हा हल्ला एका व्यक्तीवर नसून एका संस्थेवर(इंग्रजी राज्य सत्तेवर) करण्यात आला आहे.

आम्हा दोघांना दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. खटला सुरू झाल्यानंतर आमची रवानगी दिल्ली कारागृहात करण्यात आली, जेथे लागून असलेल्या दोन वेगवेगळ्या कोठड्यांमध्ये आम्हाला ठेवण्यात आले. मधात एक अभेद्य भिंत. नियाज अली आमचा तुरुंगाधिकारी होता, ज्याला अनेक दिवस पावेतो आम्ही हाड-मास नसलेला दगडी माणूस समजत होतो. एकत्रपणे न्यायालयात नेले जात असतानाचे दोन-चार दिवस सोडले तर मला व भगतसिंगाला त्याने एकत्र येऊ दिले नाही, कधी एकमेकांचा चेहराही पाहू दिला नाही, मग स्पर्शाची अनुभूती तर दूरच. या विशेष न्यायालयात न्यायाधीशापुढे हजर होत असताना आम्ही आपल्या हातापायातील बेड्यांच्या खणखणाटासोबतच'क्रांती चिरायू होवो'चीघोषणा देत असू. संपुर्ण न्यायालय दुमदुमून जाई आणि तेव्हापासून ही घोषणा राष्ट्रीय जीवनात पसरली. बाँबस्फोटानंतर पहिल्यांदाच भगतसिंगाच्या तोंडून बाहेर पडलेल्या या घोषणेने जणु संपुर्ण राष्ट्रीय जनजीवनच व्यापून टाकले.

खटला सुरू असताना न्यायाधीश महोदयांनी सरदारला 'क्रांती' शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यास सांगितले,तेव्हा सरदारने सांगितले, 'क्रांती किंवा बंडम्हणजे रक्तपाताचा मार्ग नव्हे किंवा त्यात वैयक्तिक सूडाला कोणतेही स्थान नाही. बाँबआणि पिस्तुल हीच क्रांतीची कार्यपद्धती असली पाहिजे असे नाही. स्पष्टपणे अन्याय व अत्याचारावर आधारित वर्तमान समाजव्यवस्था व शासनव्यवस्था बदलली पाहिजे, ज्यात सर्वसामान्यांच्या सत्तेची स्थापना  होईल अशी व्यवस्था संपुर्ण परिवर्तनाद्वारे आणली पाहिजे. क्रांतीचा हाच अर्थ आम्हाला अभिप्रेत आहे.'

सरदारचे ते पत्र

आसिफ अली साहेबांनी आमच्यावतीने वकीली केली आणि साक्षीदार बनले होते डॉ.मुंजे व पं.मदन मोहन मालवीय. न्यायालयाने आम्हा दोघांनाही आजीवन काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली. १९३० मध्ये लाहोर कट खटल्याच्याशेवटी मला सरदारपासून नेहमीकरिता दूर सारून माझी मुलतान कारागृहात रवानगी करण्यात आली,तेव्हा सरदारने माझ्या बहिणीस पत्र लिहिले होते. ते पत्र आजही माझ्या जीवनाचा अमूल्य ठेवा आहे. १७ जुलै १९३० रोजी लाहोर केंद्रीय कारागृहातून लिहिलेले ते पत्र सरदारच्या व्यथित हृदयाची अभिव्यक्ती आहे. 'बटूकचा   वियोग आज मला असह्य होत आहे.या वियोगामुळे मी अतिशय स्तंभित झाल्यासारखाआहे…. प्रत्येक क्षण माझ्याकरिता असह्य ओझे बनले आहे. खरोखरच,आपले सख्खे भाऊ आणि कुटुंबियांपेक्षाही त्या प्रिय मित्रापासून  दुरावला जाणे आज मला भयंकर कठीण जात आहे… आम्ही सर्व काही हिंमतीने सहन केले पाहिजे आणि तुम्हालाही धैर्याने परिस्थितीचा सामना करण्याचा आग्रह करेन.'

लाहोर कट खटल्यात जेव्हा सरदारला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा त्याने एका पत्रात मला लिहिले-

'प्रिय बटुक,

'दीर्घ काळपावेतो आपल्याविषयी विचारनाट्य सुरू राहिल्यानंतर त्यावर पडदा पडला. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावल्या आहेत आणि त्या शिक्षांविषयी आम्हाला सुचित केले आहे.  मला फाशीची शिक्षा झाली आहे.'

'जेथे काही दिवसापूर्वी तुमाझ्यासोबत होतास, लाहोर कारागृहातील त्याच कोठडीत मी आहे, हे तुला माहीत आहे. या फाशीच्या कोठड्यांमध्ये मृत्युदंड घोषित झालेले एकूण ४५बंदी आहेत, जे  प्रत्येकक्षण आपल्या अंतिम घटकेची वाट पाहत आहेत. ते दुर्दैवी बंदी फाशीच्या पाशातून सुटका करून घेण्यासाठी रात्रंदिवस ईश्वराची करुणा भाकत आहेत. या दुर्दैवी बंद्यांमध्ये मीच एक असा व्यक्ती आहे,ज्याचा ईश्वराऐवजी आपल्या ध्येयावर दृढ विश्वास आहे वज्या विश्वासापोटी मी मृत्युला अलिंगन देण्यास जात आहे. या बाबतीत मी समाधानी आहे. तुझे माझ्यापासून दूर होणे भयंकर वेदनादायक आहे, परंतु यामुळे काही ठराविक उद्दिष्टांची पूर्ती होईल. मी फाशीच्या फळीवर प्राणाचात्याग करून जगाला हे दाखवून देईल की, क्रांतिकारक आपल्या ध्येयासाठी आनंदाने आपले बलिदान देऊ शकतात. मी तर मरून जाईल परंतु तु आजीवन कैदेची शिक्षा भोगण्यासाठी जिवंत असशील आणि माझ्या ठाम विश्वास आहे की, क्रांतिकारक आपल्या ध्येयासाठी आजीवनअसह्य यातनाही सहन करू शकतात हे तु दाखवून देशील. मृत्युदंडापासून तु बचावला आहेस आणि ज्याच्या आलिंगनाकरिता मी तयार होऊन बसलो आहे, तो फाशीचा पाश यातनांपासून सुटका करून घेण्याचा एक उपाय नव्हे, दिल्या जाणाऱ्या यातना सहन करीत जिवंत राहूनही आयुष्यभर संकटांचा सामना करण्यास क्रांतिकारक ठाम असतात हे तु दाखवून देऊ शकशील.' – तुझा, भगतसिंग

ध्येयाकरिता जीवनाची आहुती

सरदार त्यांच्या विचार व व्यवहारातकधीच ताठर नव्हते. मस्तकावर शीख धर्माचे द्योतक असलेले लांब केस,  कंगवा, पगडी, आणि कडे घेऊन ते कानपूरात आले होते, परंतु नंतरच्या काळातील परिस्थितीनुसार त्यांनी स्वतःला दुसऱ्या रूपात परिवर्तित केले. लांब लांब केस कापून खालून वरपर्यंत सूट आणि हॅटने सिद्ध होऊन त्यांनी इंग्रज साहेबाचे रूप धारण केले. हिंसा आणि अहिंसेच्या विचारांबाबत गुंतागुंत नव्हती आणि त्यांच्या मनात कधी कोणाविषयी हिंसा किंवा द्वेषही जोपासला गेला नाही. राजकीय कैद्यांना युद्धबंदी म्हणून मान्यता मिळावी व त्यानुरूप व्यवहार करण्यात यावा या मागणीवरबंद्यांद्वारे सामूहिक उपोषणाच्या संघर्षाची सुरुवात आणि त्या संघर्षातून देशाच्या कोमेजलेल्या जाणिवेत पुन्हा श्वास ओतण्याची कल्पना सरदारचीच होती. त्याच संघर्षाचा परिणाम म्हणुन संपुर्ण देशात एक अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली व नंतर त्यामुळे १९३०च्या जनआंदोलनाला प्रेरणा मिळेल मिळाली. खुद्द सरकारने कारागृहात १४ जून १९२९ च्या  प्रारंभापासून तर सतत १२७ दिवसपावेतो भुकेच्या अनंत ज्वालांमध्ये जळतानाच्या मृत्युची प्रतीक्षा केली होती.

गंभीर चिंतनशीलता, राजकीय दूरदृष्टी व आत्मबळावर अभेद्य विश्वास हे सरदारचे आणखी इतर गुण होते. दुसऱ्या देशातील क्रांतिकारक आंदोलनांशीपराधीन भारताच्या राजकीय परिस्थितीचा तुलनात्मक विचार हा सरदारच्या चिंतनाचा आणखी एक पैलू होता. बळकट हातांमध्ये पिस्तुल घेऊन लक्ष्यभेद करण्यात ते जसे निपुण होते तशीच त्यांची सुंदर बोटे लेखणी चालवण्यात निपुण होती. 'प्रताप'मध्ये काम करीत असताना डॅन ब्रीन लिखित 'माय फाईट फॉर आयरिश फ्रीडम'चे अतिशय सुंदर भाषांतर त्यांनी केलेहोते. दिल्लीच्या साप्ताहिक 'अर्जुन'च्या संपादकीयातही ते लेखणी चालवत राहिले.त्याच काळात पंजाबचे विद्रोही शेतकरी आंदोलन, कूका विद्रोह आणि बब्बर अकाली आंदोलंनांवरील त्यांची हस्तलिखिते मी मी वाचली होती. आपल्यासोबतच फाशीची शिक्षा मिळालेल्या इतर सहकाऱ्यांना फासावर लटकवण्याऐवजी युद्ध कैद्यांप्रमाणे गोळ्या घातल्या जाव्यात म्हणुन फाशी जाण्यापूर्वी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला जे निवेदन पाठवले होते, त्याची शैली आणि तर्क दोन्ही तशा प्रकारची एकमेव बाब होती. म्हणजे सरदार केवळ क्रांतिकारकच नव्हते तर यासोबतच एक दूरदृष्टी लाभलेले राजकीय नेते, यशस्वी अनुवादक, पत्रकार आणि विचारवंत यांचे अद्भुत मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. संपूर्ण काळ ते आपल्यादेशाकरिताजीवनाची आहुती देण्याच्या प्रबळ प्रेरणेने वआकांक्षेनेच प्रेरित राहिले आणि निश्चित मृत्युला सामोरे गेले. अनासक्त हृदयाची कोणतीही व्यक्तीच अशाप्रकारे जगातीलस्थूल तृष्णेपासून मुक्त होऊन मृत्युला आनंदाने कवटाळू शकते. सरदारच्यासंदर्भात स्वामी विवेकानंदांचे वचन मला नेहमीचआठवत असते,'जर तुमचे मन अनासक्त असेल तर तुमची भक्तीहीअमर्याद असते. जगातील कोणतीही शक्ती तुमची गती रोखू शकत नाही.'

आणि संपूर्ण काळात इंग्रज राज्यकर्त्यांची विशाल राक्षसी शक्तीही सरदारच्या जीवनगतीला रोखण्यात नेहमीच अपयशी ठरली यात शंका नाही. ७ऑक्टोबर १९३०रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि २३ मार्च १९३१च्या संध्याकाळी त्यांना फाशी देण्यात आली.'मातृभूमिकरिता बलिदानाच्या अग्निकुंडात कोण आधी जाईल व कोण नंतर, हे माहीत नाही. परंतु जो कोणी आधी जाईल त्याच्याकरिता आम्ही आसवे गाळणार नाही,उलट त्याचे अपुरे कार्य पुर्ण करण्याचा प्रयत्न करू. आपलंबलिदान व्यर्थ जाणार नाही, बटुक! फलित पाहण्यासाठी आपण तेव्हा या जगात नसू ही बाब अलाहिदा….' असे ते नेहमी म्हणत असत.

खरेच, सरदार स्वातंत्र्य पाहण्याकरिता राहिले नाहीत, परंतु त्यांचे बलिदानही व्यर्थ गेले नाही. आज विचार करतो तेव्हा वाटते, की त्यांच्या नजरेत येऊ घातलेला काळ अतिशय स्पष्ट बनवून सामावला होता-'बलिदानानंतर कितीही दिवस लोटले तरी देश स्वतंत्र होईल आणि निश्चितच होईल.'(समाप्त)

(प्रस्तुत लेख सुधीर विद्यार्थी यांच्या हाती लागला व संपादित स्वरूपात 'कथादेश'मासिकाच्या ऑक्टोबर २००७ च्या अंकात प्रकाशित करण्यात आलाहोता.)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
The Leaflet
theleaflet.in