'अखंड भारत' हिंदू, शीख आणि सर्व मुसलमानांच्या आपसातील प्रेम व मर्जीनेच निर्माण होऊ शकतो. मुसलमानांना शत्रू समजल्याने अथवा शत्रू बनवल्याने कधीही 'अखंड भारत'निर्माण केला जाऊ शकत नाही – 'फिराक' गोरखपूरी
लोकांना 'फिराक'गोरखपूरी माहीत आहेत ते एक शायर म्हणून. त्यांनी जेवढे लेखन पद्यात केले आहे तेवढेच गद्यातही केले आहे. परंतु त्यांचे गद्यात्मक लेखन पाहिजे तसे लोकांपुढे आलेले नाही. १९४७ सालातील ताणतणाव पाहता त्यांनी प्रस्तुत दीर्घ लेख लिहिला होता. आज देशात पुन्हा तेच वातावरण निर्माण करण्यात आले असल्याने त्यांचा हा लेख मराठी वाचकांसाठी लेखमालेच्या स्वरुपात प्रस्तुत करत आहोत.
आपला देश या धरित्रीवरील एक फार मोठा देश आहे. येथे तीस कोटी हिंदू,नऊ कोटी मुसलमान आणि दीड कोटीच्या जवळपास इतर धर्माचे नागरिक आहेत. जरा विचार करा की,या देशाचे मोठेपण कशात आहे?या प्रश्नाचे उत्तर हे आहे की,येथे राहणारा कोणताही पुरुष,महिला किंवा बालक,म्हातारे मग ते हिंदू असोत वा मुसलमान किंवा इतर कोणत्याही धर्माचे अनुयायी असोत,दुःखी नसावेत;खाणे,पिणे,परिधान करणे,राहणे-शिकणे,लिहिणे, कमावणे आणि प्रगति करणे या बाबत त्याला कोणताही अडथळा असू नये. या देशाचा मोठेपणा या गोष्टीत कधीच नाही की येथील नागरिकांमध्ये एका विशिष्ट जाती किंवा धर्माचे अनुयायी सुखा-समाधानाने रहावेत आणि आणि इतर जात व धर्माचे अनुयायी दुःखी व प्रतिष्ठा गमावून रहावेत. जे सुख किंवा धन कुणाला दुःखी बनवून अथवा निर्धन करुन अथवा लुबाडून अन्यायातून मिळवले जाईल अथवा जो मोठेपणा कुणाला अपमानित करुन अथवा तुच्छ समजून मिळवला जाईल,ते सुख खरे सुख नसेल अथवा तो मोठेपणा खरा मोठेपणा नसेल. असे सुख किंवा असा मोठेपणा मिळवण्याची कल्पना आपला सर्वात मोठा शत्रू आहे.
या देशात तीस कोटी हिंदू राहतात. कधी कधी आणि कुठे कुठे मुसलमानांनी हिंदू आणि शीख लोकसंख्येच्या एका विभागासोबत मारामार्या व शत्रुत्व केले तसेच नऊ कोटी मुसलमानांच्या एका विभागासोबत हिंदू आणि शिखांनी लुटालूट व अन्याय केला यात शंका नाही. जय-पराजय कुणाचाही झाला नाही. संकट व विनाश दोहोंवर आले. आता पहायचं हे आहे की,हिंदूंचे सर्वात मोठे शत्रू मुसलमान आहेत का?मुसलमानांचे सर्वात मोठे शत्रू हिंदू आणि शीख,आणि शिखांचा सर्वात मोठा शत्रू मुसलमान आहे?परतू ही बाब निश्चितपणे सिद्ध झाली आहे की आपसातील हे शत्रुत्व कुण्या जातीला अथवा धर्माला लाभ पोहचवू शकत नाही. संकट आणि विनाश हिंदू,मुसलमान,शीख या तिघांवरही आलेले आहे. विजय कुणाचाच झाला नाही,पराभव सर्वांचा झाला आहे.
एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. हिंदू,मुसलमान आणि शीख यांना निश्चितपणे बहकवले जाऊ शकते आणि त्यांच्या मनात कण टाकून काही काळाकरिता त्यांच्यात शत्रुत्व आणि लुटालूट करवली जाऊ शकते. परंतु जगात लाखो आणि कोट्यावधीच्या संख्येतील कोणत्याही धर्माचे अनुयायी नीच असू शकत नाहीत,हे शक्य नाही की मुसलमान हे मुसलमान असल्याने भले व सज्जन होतील आणि हिंदू व शीख सारेच्या सारे अथवा जास्तीत जास्त संख्येने त्यांच्या धर्मामुळे भली माणसं होतील,सारेच्या सारे अथवा जास्तीत जास्त संख्येने मुसलमान केवळ इस्लामवर श्रद्धा ठेवण्यामुळे अधम, नीच व रानटी बनतील, ह्या दोन्ही बाबी शक्य नाहीत. हिंदू आणि शिखांचा धर्म दुसर्या धर्माच्या अनुयायांना अधम आणि नीच समजणे मोठे पाप मानतो. मुसलमानांचा मजहब सुद्धा याला मोठे पाप समजतो की इतर धर्मियांना अधम आणि नीच समजावे. जर आपण माणसाचा आदर करू शकत नाही आणि जर आपण माणसाच्या माणुसकीवर विश्वास करू शकत नाही तर आपण आपल्याच धर्माच्या माणसांचाही आदर करू शकत नाही,ना त्यांच्या माणुसकीवर विश्वास ठेऊ शकत. जर आपण हिंदू असू किंवा जर आपण शीख असू तर मुसलमान नीच व अकारण आपले शत्रू आहेत,ही आपली समजूत आपला सर्वात मोठा शत्रू असेल. जर आपण मुसलमान असू तर हिंदू आणि शीख अधम व नीच आहेत आणि ते सर्व मुसलमानांचे शत्रू आहेत ही समजूत आपला सर्वात मोठा शत्रू असेल.
काही वेळाकरिता हिंदू आणि शीख या नात्याने विचार करा
आज जर हा गोंधळ माजला नसता तर आपले सरकार व आपल्या देशाजवळ अब्जावधी रुपये असते,ज्यातून शेती-वाडी, कारखाने, शिक्षण व सर्वांना लाभ होईल व भारत मोठा देश बनेल अशी विकासाची शेकडो कामे करता आली असती. याद राखा! जो गोंधळ माजला आहे त्याचा परिणाम असा झाला आहे की पुढील पाव शतक आपला विकास थांबला आहे. जर असा गोंधळ पुन्हा माजला तर आपल्या सरकारचा जीव निघून जाईल आणि मुसलमानांची जी काही गत होईल ती होईल,किमान हिंदू आणि शीख शंभर वर्षे स्थिरस्थावर होऊ शकणार नाहीत. मारामारीच्या भावनांमुळे मनात उत्साह निर्माण होण्याचा आनंद आपल्याला मिळू शकतो परंतु हा उत्साह आणि आनंद फार काळपर्यंत कायम राहू शकत नाही आणि या उत्साहाचे व आनंदाचे रूपांतर लवकरच असह्य संकट,विनाश आणि घसरणीत होईल. ही अनुचित भावना व उत्साह आपले सर्वात मोठे शत्रू आहेत.