[dropcap]पु[/dropcap]रुषांसोबत महिलांनाही मशीदीत नमाज अदा करण्याचा अधिकार आहे, असा दावा करणारी याचिका पुण्यातील एका मुस्लिम दांपत्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या संदर्भात पुरोगामी मुस्लिम लेखिका व पुणे सत्यशोधक मुस्लिम मंडळाच्या कार्यकर्त्या तमन्ना इनामदार यांची विरा साथीदार यांनी घेतलेली मुलाखत.

 

विरा साथीदार: पुण्याच्या एका मुस्लिम दांपत्याकडून विशेषतः मुस्लिम महिलेने पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्तीचं म्हणणं आहे की महिलांना नमाज पढण्याचा समान अधिकार इस्लाम देतो व भारताचे संविधानही देते. त्यामुळे तिला पुरुषांबरोबर मशीदीत नमाज पढण्याचा अधिकार मान्य करण्यात यावा. तुमचा इस्लामबाबतचा अभ्यास आहे व मुस्लिम महिलांच्या उन्नतीसाठीही तुम्ही काम करता. या याचिकेबाबत तुमचे काय मत आहे?   

तमन्ना इनामदार: इस्लाममध्ये एक आयत असते त्याचा अर्थ ‘ईमानवाले मर्द और इमानवाली औरते’, या वाक्यातुन तिथेच ही समानता कुराणामध्ये दिसते. तिथे असे म्हटलेले नाहीय, की इमानवाले सिर्फ मर्द, किंवा त्यांनी असे सांगितले नाही की इमानवाली सिर्फ औरते. कुराणमध्ये बोलत असताना आणि अल्लाहने बोलत असताना किंवा हुकूम देत असताना इमानवाले मर्द आणि इमानवाली औरते असे समानतेचे संबोधन करून नंतरच ती आयत उतरली गेली किंवा नंतर ते हुकूम दिले गेलेत. त्यामुळे इस्लाममध्ये इथूनच स्त्री-पुरुष समानता दिसते. मुलींच्या संदर्भात पाहिले तर जेव्हा मुलींना जन्मल्यानंतर त्यांना मारले जायचे किंवा त्यांना एक ओझे समजले जायचे तेव्हा मोहम्मद पैगंबरांनी यासाठी सुद्धा कार्य केले. आणि कुराणमध्ये सुद्धा अल्लाहने सांगितले की, जो मुलींचा व्यवस्थित सांभाळ करेल त्याला जन्नतमध्ये जागा आहे. म्हणजे एवढा मोठा सन्मान महिलांना देवून सुद्धा महिलांसाठी असा विचार केला जातो, की हे महिलांसाठी नाही, ते महिलांसाठी नाही. आधी हा विचार व्हावा की हे ठरवलं कुणी? इस्लामचा आधार जर कुराण असेल आणि कुराणमध्ये जर समानतेचे स्पष्ट आदेश आहेत, तर पुढे जावून असे का होते याचा विचार करायची गरज आहे. इथून पुढे आपण विचार करायला हवा, की जे काही सामाजिक बदल होत गेले, किंवा पुरुषवादी संस्कृतीने त्यावर काही बंधने स्त्रियांवर लादत नेली. त्या लादण्याला किंवा पुरुषांनी ठरवलेल्या त्या नियमांना चौकट बेस असे लिखित स्वरुपात काही दिसत नाही. कुराणामधील समानतेकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल किंवा पुढे ते तुमच्या वर्तणुकीत येत नसेल तर इस्लाममध्ये सांगितलेल्या गोष्टीकडे तुमचे पूर्ण दुर्लक्ष होते.

विरा साथीदार: याचिकाकर्तीने पुण्यातील जामा मशीदीच्या इमामांना पत्र दिले होते, की त्यांना नमाज अदा करू दिली जावी. तेव्हा याचिकाकर्तीला असे संगितले गेले, की इस्लामचा अभ्यास असलेल्या मंडळांचे आम्ही मत घेऊ आणि तुम्हाला नमाज अदा करू दिली जावी की नाही हे त्यानंतर ठरवू. इमामांचा इस्लामबाबत निश्चितच अभ्यास असेल तरी त्यांनी असे का म्हटले असावे?

तमन्ना इनामदार: धर्म वाचणे आणि धर्म अंमलात आणणे, या दोन बाबींमध्ये फरक असतो. धर्मामध्ये सांगितले तसे प्रत्येक व्यक्ती वागतोच असे नाही. इस्लाममध्ये सांगितले आहे, की शराब हराम आहे. मग खरेच शराब हराम आहे का? धर्मात लिहिले आहे म्हणून सर्वांनी सोडले का? तलाकबाबत काय संगितले आहे कुराणमध्ये! तुम्ही जर दोन्ही बायकांना समानतेने न्याय देवू शकत असाल तरच तुम्ही दुसरीचा विचार करा, अन्यथा आहे त्या एक महिलेला तुम्ही व्यवस्थित सन्मानाने वागवा. तसं होत आहे का? त्या बाईचा काही विचार न करता तलाक होतातच ना! म्हणजे धर्मामध्ये काय सांगितले आहे आणि वर्तनामध्ये काय होत आहे?

आधी हे बघू या, की आधी ही परवानगी नाकारली कुणी? ही सुरुवात कुठून झाली? ही सुरुवात फार पूर्वीपासून झालेली आहे. हजरत मोहम्मद पैगंबरांच्या नंतर जे खलिफा आले व त्यांनी जे काही नियम लागू केले, पुढे जसा समाज बदलत गेला किंवा खलिफा बदलत गेले, तसतसे ते नियम बदलत गेले व त्याच्यावर स्त्रियांना अधिकाधिक आंत टाकले गेले. पैगंबरांच्या हदीसमध्ये उदाहरणासह आहे, की त्यांची मुलगी हजरत जैनबने जेव्हा तिच्या पतीला घरात आसरा दिला, ती पहाटे उठून नमाजला गेली त्यावेळेस तिने सर्वांना सांगितले, की मी माझ्या पतीला सहारा दिलेला आहे. हे पैगंबरांच्या जीवन चरित्रात उदाहरणासह आहे. आताचे जे मौलाना आहेत, त्यांनी मनात जरी विचार केला की, महिलांना अधिकार आहे, पण त्यांनी एकट्याने बदलून उपयोग नाही. कारण त्यांच्या मागे असणारे असंख्य लोक त्यांना प्रश्न विचारतील, की ‘तुम्ही कशी काय त्यांना परवानगी दिली? हे तर असं नाहीच आहे!’ मग त्यांना ते वाटणारच ना! साहजिकच आहे की एक माणूस निर्णय घेवू शकत नाही. ते म्हणतील की मी इस्लामचा अभ्यास करणार्‍या लोकांना विचारतो, त्यांची मते मागवतो! आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते सांगितलं.

विरा साथीदार: जेव्हा त्यांनी ही याचिका दाखल केली आणि नोटिसा काढल्या, तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणते की शबरीमला प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर आम्हाला ही याचिका दाखल करून घ्यावी असे वाटते. समजा शबरीमला प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महिलांच्या बाजूने निकाल दिला नसता तर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी काय भूमिका घेतली असती? तुम्हाला काय वाटते?

तमन्ना इनामदार: तो आमचा संवैधानिक अधिकार आहे. आज नाही तर उद्या कोणी तरी ती याचिका दाखल केलीच असती. दर्गा प्रकरणामध्ये महिलांनी न्यायालयीन लढा दिलाच. मग मशीद प्रकरणातही तेच झालं असतं. मी असं म्हणेन की शबरीमला प्रकरणात न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, त्याच्या प्रकाशात ह्यांना सुद्धा असं वाटलं असावं की ठीक आहे, त्यांना मिळू शकते तर हा आमचा सुद्धा संवैधानिक अधिकार आहे. समाजात बदल होतच असतात, जागृती येतच असते आणि ती यायलाच हवी. शबरीमला प्रकरण घडलं नसतं तरी कधी ना कधी हे प्रकरण वर आलंच असतं. त्याला कितपत न्याय मिळेल, त्याकडे कसं पाहिलं जाईल, किती संघर्ष करावा लागेल, या सर्व नंतरच्या गोष्टी! पण आपल्या हक्कासाठी तर महिला पुढे येतीलच आणि आल्याच असत्या.

विरा साथीदार: पण शबरीमला प्रकरणी आपला अनुभव असा आहे, की सुप्रीम कोर्टाने निर्णय जरी दिला आणि राज्य शासनाचा पाठिंबा जरी असला तरी केरळसारख्या पुरोगामी राज्यात जर महिलांच्या अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी संघर्ष करावा लागतो तर येथे कसे शक्य होईल? येथे तर प्रतिगामी शक्ती काबीज आहेत?

तमन्ना इनामदार: तुम्ही म्हणता ते खरं आहे, ही सहजासहजी घडणारी गोष्ट नाही. पण मंदिरामध्ये प्रवेशाचं असू दे, किंवा दर्ग्यामध्ये, मशीदीमध्ये प्रवेशाचं असू दे, धार्मिकदृष्ट्या जर पाहिलं तर त्या देवालाही काही फरक पडत नसतो, त्या मशीदीला फरक पडणार नाही, त्या दर्ग्यालाही फरक पडणार नाही. पण ते नियम लावले कुणी? ते ज्या ट्रस्टींच्या हातांमध्ये आहे, त्यांनी ते नियम लावलेले आहेत. विरोध हा होणारच, कारण महिलांना स्वातंत्र्य द्यायचं म्हणजे काय? ती बरोबरीनं आली, तिनं तिचा हक्क जर मागितला तर संघर्ष होईलच.

विरा साथीदार: पण आपल्या महिला संघटना किंवा आपले राजकीय पक्ष अशा संघर्षासाठी कितपत तयार आहेत?

तमन्ना इनामदार: महिला ह्या प्रकरणाकडे कसं पाहतात हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, असं मला वाटते. जर महिलांना वाटलं की मशीदीमध्ये प्रवेशनिषिद्ध करणे एवढे महत्वाचे का वाटते?

 

 

मशीदीत महिलांना प्रवेश का मिळत नाही? मशीद म्हणजे काय? प्रार्थनेसाठी असणारी जागा. तिथे शांती आहे, पावित्र्य आहे, श्रद्धा आहे. मग त्या मशीदीत स्त्री जरी गेली तर नमाजच पढणार आहे किंवा सजदा करणार आहे. ती दुसरं काहीच करणार नाही. इस्लामनुसार संपूर्ण पृथ्वीवर कुठेही सजदा करण्याचे आदेश आहेत. कुठेही सजदा केला तरी तो अल्लाहला पोहचतो, असं म्हटलं जातं. मग मशीदीत जर फक्त प्रार्थना करणार असाल, फक्त नमाज पढणार असाल तर पुरूषांनी त्यावर हरकत घेण्याची गरजच काय?

 

 

पुरुषांची मानसिकता आजकाल घडलेली नाही, त्यालाही कैक शेकडो वर्षांचा इतिहास आहे आणि ती मानसिकता बदलत बदलत आता कुठे त्याला धक्के बसतायत. ते बदलणं थोडसं जड जाणणार आहे. मक्केमध्ये स्त्री आणि पुरुष एकत्रच नमाज पढतात. थोडी जागा वेगळी असते त्यांची, पण एकत्रच नमाज पढतात, तवाफ एकत्र करतात. मध्यंतरी दर्ग्याचा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा मी महाराष्ट्रातल्या बर्‍याच भागात फिरले. मुंबईसारख्या हाजी अली दर्ग्यात तो प्रश्न निर्माण झाला, की दर्ग्यामध्ये स्त्रियांनी येऊ नये. ती जी समाधी किंवा जी मजार असते तिला ते चालत नाही, ते पर्दा करतात वगैरे, पण खेडेगावात जे दर्गे असतात ना, तिथे महिला सर्रास आतपर्यंत जातात, मग तिथे ते का होत नाही? आणि इथे ह्या ट्रस्टचं म्हणणं आहे की इथे येऊ नका. आणि तिथे (खेडेगावात) ट्रस्टच नाही म्हणून तिथे तो नियम आहे का?

हजरत पैगंबरांच्या जमान्यात महिला नमाज पढत होत्या. आता सुद्धा हजमध्ये महिला नमाज पढतात. आता सुद्धा काही मशीदी अशा आहेत, आता मी एक पुस्तक लिहिताना लिहिलं की मुस्लिमांमध्ये जो मिसगर समाज आहे त्यांच्या बायका पुरुषांच्या बरोबरीनं नमाज पढतात. ते असं काहीच मानत नाहीत. फार काळ नाही झाला, अगदी अलिकडे केरळमध्ये मुस्लिम महिलांसाठी एक मशीद बांधली गेली. पण हा संघर्ष आम्ही आणि ते असं करायचं आहे का? पुरुष आणि स्त्रिया असं करायचं आहे का? ‘आपण’ असं होऊ शकणार नाही का ते? नमाजच पढायची आहे ना! दर्ग्यात मजार तरी असते, मशीदीत तर मजारही नसते, फक्त एक मोकळी जागा असते तिथे नमाज होऊ शकते. मग त्याला रोखण्याचं काय कारण आहे? हा अडियलपणा का करायचा? त्यामुळे पुरुषांनी पण यावर विचार करणं, थोडसं त्यांना जड जाणार आहे ते. कारण पारंपरिक पद्धतीने हे पाहिलंय की महिलांनी मशीदीत यायचं नाही. पण बदल कुठे तरी व्हायलाच पाहिजे ना!

 

 

इथे पुरुषांशी भांडण नाहीच आहे, धर्माशी भांडण नाहीच आहे. अधिकारांचं भांडण आहे. अधिकार पण कशाला? तर संवैधानिक अधिकार आम्हाला आहेत, इस्लाम पण अधिकार देतोय. तुम्ही तिथे नमाजच पढणार आहात, आम्ही सुद्धा तिथे नमाजच पढणार आहोत, आणखी काय करणार आहोत? आणि आम्हाला इबादत करायची असेल तर त्या देवाच्या किंवा अल्लाच्या आणि आमच्या मध्ये तुम्ही यायचं किंवा अडथळा करण्याचं काहीच कारण नाही.

 

 

विरा साथीदार: महिलांनी या प्रश्नाकडे अधिकाराच्या दृष्टीकोणातून पहावं की धार्मिक दृष्टीकोणातून?

तमन्ना इनामदार: कुठल्या दृष्टीकोणातून पहावं म्हटलं ना की इथे मुद्यांची लढाई येते. मशीदमध्ये जात असताना आम्ही कुठला मुद्दा घेऊन गेलो तर आम्हाला संवैधानिक अधिकार आहे. आम्ही मशीद मध्ये जाऊ शकतो, दर्ग्यामध्ये जाऊ शकतो, शबरीमलामध्ये जाऊ शकतो. तिथे आम्ही जाऊन नमाज पढतो की नाही किंवा तिथे जाऊन आम्ही… आता शनि शिंगणपुरचं भयंकर झालं. बघा जाऊन तुम्ही, किती बायका वर जाताहेत. पण तो अधिकार आम्ही मिळवला. जायचं की नाही ते आम्ही ठरवू. आम्हाला सवयी घरात नमाज पढायच्या आहेत. पाच वेळा उठून बायका नमाजसाठी मशीदीत जाऊ शकत नाहीत. पुरुष जातात पण बायकांना अनेक व्याप असतात, त्यामुळे त्या पाच वेळा जातीलच असं नाही. पण हा आमचा हक्क आहे, तो सन्मानाने आम्हाला द्या. आम्हाला तो हवाय. इस्लाम आम्हाला देतो, आमचे संवैधानिक अधिकार आहेत, आम्हाला तो का मिळू नये? मग आम्ही नमाज पढायला जाऊ किंवा नाही जाऊ. आणि हल्ली आता तुम्ही दरग्यांमध्ये गेलात ना, त्या दरग्यांमध्ये नमाजसाठी एक मशीद असते पुरुषांसाठी. आणि तिथेच बाजूला महिलांसाठी नमाजची व्यवस्था केलेलीच असते, मग मशीदमध्ये काय हरकत आहे? बदलणार कधी मग? बदल व्हायला हवेत ना! कुणी तरी त्याविषयी बोललंच पाहिजे ना! यास्मिन जर बोलत असेल, तर हा यास्मिनचा तिचा एकटीचा आवाज नाही आहे, सगळ्या महिलांची ती गरज आहे, तो अधिकार आहे.

विरा साथीदार: एका मुस्लिम मित्राने या प्रश्नावर मुस्लिम महिलांच्या संवैधानिक अधिकारावर फार काही न बोलता शंका व्यक्त केली की ती महिला नक्की कोण आहे, ते पाहिलं पाहिजे. देश तोडणार्‍या शक्ति तिला खेळवत असतील कदाचित? तुम्हाला या बाबत नक्की काय वाटते?

तमन्ना इनामदार: आज कालची परिस्थिति बघता ‘येस’ किंवा ‘नो’ असं म्हणता येणार नाही. काहीही गोंधळ होताना आपण बघतोच आहोत. पण जर तो मुस्लिम पुरुष असेल आणि त्याच्या समाजाची एक बाई जर उठून हे बोलत असेल तर त्याने तिच्याकडे जाऊन, तिची भूमिका समजून घेऊन, तिला का असं वाटते, हे समजून घेण्याऐवजी जर तो इतर शक्तींकडे बोट दाखवत असेल तर माझ्या मते ही पळवाट आहे. त्याने जाऊन आपल्या समाजातल्या महिलेशी बोललं पाहिजे. तिच्याशी चर्चा केली पाहिजे, संवाद साधला पाहिजे की नक्की तुला हे असं का वाटतं? त्याच्या मागचं कारण काय? आणि जर त्या बाबत सत्यता असेल, तर त्याच्या विषयी विचार करायला काय हरकत आहे? मध्यंतरी केरळचा एक व्हिडिओ फिरत होता, त्यात एक बाई नमाज पढवते आहे आणि तिच्या मागे पुरुष नमाज पढत आहेत असं दाखवलं होतं. मोठा गदारोळ उठला त्यामुळं. त्या वेळेस तिच्या नमाज पढण्याला किंवा मशीदमध्ये किंवा कुठेही तिच्या नमाज पढण्याला विरोध नव्हता. तिच्या मागे पुरुषांनी का नमाज पढावी, हा प्रश्न होता. पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत काय होते, की पुरुष इमाम असतो आणि त्याच्या मागे इतर पुरुष नमाज पढतात. महिलाही पढू शकतात. पण आता त्या बाईनं इमामत का करायची? तर याला उत्तर असं येईल की मार्च २०१५ मध्ये व्हर्जिनिया विद्यापीठाच्या प्रोफेसर आहेत अमिना वदूद, त्यांनी नमाज पढवला होता ५० पुरुष आणि ४० स्त्रियांना घेऊन. त्या वेळेस प्रचंड गदारोळ झाला. त्यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, त्यांनाही सांगितलं की बॉम्ब स्फोटाने उडवू तुला, ती मशीद उडवू असा बराच गदारोळ झाला. या सगळ्या बाबी पचवणं थोडसं कठीण जाते. मी माझ्या पुन्हा त्याच वाक्याला रिपीट करते की, आम्ही आणि ते हा असा लढा नकोय, तुम्ही संवाद साधला पाहिजे, बोललं पाहिजे. कारण जो काही समाज आहे किंवा जे कुटुंब आहे, त्याची पुर्णपणे तितकीच, मी तर म्हणेन ५०-५० टक्के महिला सुद्धा तेवढीच जबाबदार असते. महिलांना वंचित ठेवून, महिलांना मागं ढकलून, महिलांच्या अधिकाराचं हनन करून तुम्ही जर देशाची प्रगति होईल, उन्नती होईल असा विचार करत असाल तर अशाने कोणत्याही देशाचा कधीच विकास होत नाही. त्यामुळे महिलांना सोबत घेऊन. त्या महिलेला जर कुठल्याही शक्तींनी, ज्यांच्याकडे त्यांना संशय आहे, असं होत असेल तर चर्चा करा ना, की त्या बाईला तिथे का जावं लागलं किंवा त्यांचं ऐकावं का लागलं. आधी हा विचार करा ना, तिच्याशी संवाद करा.

विरा साथीदार: अलिकडे शिखांमध्ये महिला जत्थेदार दिसतात किंवा बौद्धांमध्ये अनेक धार्मिक उपक्रम महिलाही पार पाडतात. तर हिंदूंमध्ये, मुस्लिमांमध्ये तसं का होऊ नये?                            

तमन्ना इनामदार: समाजामध्ये वर वर जे दिसत असतं ना, ज्या चळवळी होत असतात किंवा विचारवंत जे काम करत असतात त्याचा काही प्रमाणात तरी फायदा होतो. आणि समाजाची सुप्त अशी शक्ति असते जी आतमधला प्रवाह नियंत्रित करीत असते. ते बदल होत जातात. मुस्लिमांमध्ये मुलींना शिकवण्याविषयी किती विचार केले जात होते? पण आज मुलांपेक्षा मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढतोय. का वाढतोय? कारण पालकांनी तसं ठरवलं. त्या मुलींनीही जिद्द केली की शिक्षणाशिवाय आम्हाला तरणोपाय नाही आहे. हे समाजात बदल होतच गेले ना! मग ते बौद्ध समाज असेल, शीख समाज असेल किंवा इतर हिंदू समाज असतील. मुस्लिम समाजामध्ये सुद्धा आता तुम्ही पाहिलं असेल की मुंबईच्या महिला आंदोलनाच्या महिलांनी पुरोहिती करणार्‍या बायकांना प्रशिक्षण दिलं आणि त्या महिला लग्नासाठी पुरोहितगिरी करताहेत. चांगले सकारात्मक बदल होत असतील तर करायला काय हरकत आहे? ठीक आहे, याच्यातून सुद्धा असं म्हणता येईल की पुरुष जसं शंभर टक्के एखाद्या कामाला वाहून घेतात किंवा त्यांची संख्या दिसते तशी बायकांची दिसणार नाही निश्चितच. कारण त्यांच्या मागे घर असतं, परिवार असतो, मुलं असतात. त्या सर्व गोष्टी सांभाळून, व्याप सांभाळून किती वेळ देऊ शकतील हे माहीत  नाही. पण येत आहेत तर त्यांचं स्वागत करायला पाहिजे ना! त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. वाईट बदल झाले की तुम्ही विरोध करता तसे सकारात्मक बदल झाले की त्याला सपोर्ट तर केलाच पाहिजे.

 

 

 

[लेखिका मुस्लिम महिला प्रश्नावर कार्य करतात. वर्तमानपत्रात सातत्याने लेखन प्रसिद्ध. त्यांची अनेक पुस्तके विशेषतः मुस्लिम बलुतेदारांवरील पुस्तक हमखास वाचावे असे आहे. त्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत.]

Leave a Comment