Avatar

| @ | August 4,2019

आपले काही सगा बांधव तथाकथित बुद्धिजीवी इर्षेतून या शब्दांची चुकीची व्याख्या करतात तेव्हा ते या शब्दांच्या मूळ भावार्थाच्या विपरीत तथ्यहीन आणि आधारहीन गोष्टींना व्यक्त करीत असतात. त्यांचा प्रयत्न हे सांगण्याचा सुद्धा असतो की, गोंडी मूळ हे जगातले प्रथम वांशिक मूळ आहे आणि ते संपुर्ण गोंडवाना लँडमध्ये व्याप्त आहे. ही संपुर्ण मिथकीय (पुराणकथात्मक) संकल्पना एक प्रकारे स्वतःच्या जातिच्या महात्म्याचे प्रदर्शन करणारी सरंजामी मनोवृत्ती आहे. उदाहरणार्थ indigenous या शब्दाविषयी त्यांचे म्हणणे असे आहे की, indignus आणि indigenous हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. त्यांच्या मतानुसार indignus हा शब्द बरोबर आहे, ज्याचा मूळ अर्थ आहे Indus + genus  (मूळ + वंश) = मूळ वंश.

Indignus हा शब्द बरोबर आहे व indigenous हा शब्द चुकीचा आहे, कारण genous शब्दाला काही अर्थ नाही, जेव्हाकी genus शब्दाचा अर्थ वंश असा आहे.  पुढे त्यांचे म्हणणे आहे की, ‘इंडस व्हॅली’ चा अर्थ सिंधु खोरे असा नसून तो मुल वंशीय खोरे असा आहे. या सर्व अतिशयोक्तिचा एकच अर्थ निघतो की, आमच्याशिवाय इतर कोणत्याही जीवाचे अस्तित्व नव्हते. जेव्हाकी indignus चा कोणताही अर्थ होत नाही आणि कोणत्याही शब्दकोषात याचे अस्तित्व दिसून येत नाही. इंडस, इंडीज  किंवा इंडिया यांचे जे सह-अस्तित्व आहे ते सिकंदरने भारतात सिंधुच्या खोर्‍यात प्रवेश केल्यानंतरच दिसून येते, जेव्हा ग्रीकांनी सारे जग पादाक्रांत करत इसवी सन पूर्व चौथ्या-तिसऱ्या शतकात सिंधुच्या खोऱ्यात प्रवेश केला तेव्हा प्रवाहित सिंधु नदीला ग्रीकांनी इंडीज नदीचे नाव दिले. कारण त्यांना या भूभागाची माहिती नव्हती. तेव्हापासून इंडीजचा अपभ्रंश इंडिया झाला आहे. परंतु सिंधुच्या खोऱ्यातील संस्कृती इसवी सनाच्या दोन-अडीच हजार वर्षे पूर्वी राहिली आहे आणि प्राचीन साहित्यात ही संस्कृती सिंधु संस्कृती म्हणूनच ओळखली जाते. मग या संस्कृतीला शब्दजाळात अडकवून भ्रम पसरवण्यामागे काय उद्देश आहे. भ्रम पसरवणे हे तर प्रतिक्रांतिकारकांचे काम असते. सरंजामी मनोवृत्ती म्हणतात ते यालाच.

 

Aboriginal शब्दाचे ऐतिहासिक वास्तव

 

आपण त्यांची तात्विक मते समजून घेऊ. aboriginal शब्दाचे हिंदी व मराठी भाषांतर आदिवासी असे होते. परंतु आपल्या सगा मित्रांच्या मतानुसार aboriginal चा अर्थ म्हणजे जे aboriginal नाही, अर्थात वास्तविक नाही.  ऑक्सफोर्ड शब्दकोषानुसार इंग्रजी भाषावलीत १८६५ पूर्वी aboriginal हा शब्द नव्हता, तो नंतर घालण्यात आला. त्यांचे म्हणणे आहे की, aboriginal हा शब्द इंग्रजांनी दोन शब्द ab आणि original असे मिळून  बनवला आहे, ज्याचा हिंदी व मराठीतील अर्थ आहे- नाही+वास्तव = वास्तव नाही. याचा अर्थ aboriginal (आदिवासी) शब्द अर्थहीन आहे. या मित्रांनी ज्याप्रकारे विश्लेषण  केले आहे आणि त्यांच्या विवेकानुरुप अर्थ काढला आहे तो चुकीचा आहे व त्यांनी या शब्दाची मुद्दाम मोडतोड केलेली आहे. या शब्दाला अर्थहीन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांचा यामागील हेतू या शब्दाला कुप्रसिद्ध बनवणे, त्याला एवढे बदनाम करणे जेणेकरुन लोक या शब्दाबाबत घृणा बाळगू लागतील आणि नेहमीकरता त्या शब्दाचा त्याग करतील. हे कार्य तर वनवासीकरणाला प्रोत्साहन देणारे आहे. आपण त्याच्या ऐतिहासिक बाबींना समजून घेण्याचा प्रयत्न करू. उदाहरणार्थ सगा मित्राने aboriginal या शब्दाचा अर्थ ‘वास्तविक नाही’ अर्थात ‘आदिवासी नाही’ असा घेतलेला आहे. हा अतिशय चुकीचा अर्थ आहे. कारण यात  दोन गोष्टींची तुलना करण्यात आलेली आहे, ज्याचा अर्थ होतो वास्तविकतेपासून वेगळा. जसाकी normal, आता याला ab उपसर्ग जोडला तर तो होतो abnormal, ज्याचा अर्थ होतो असामान्य अर्थात सामान्यापेक्षा वेगळा. दोन व्यक्तींमध्ये आपण अशी तुलना करू शकतो की, एक व्यक्ती दुसर्‍याहून भिन्न आहे. अशाच प्रकारे ab प्रत्यय original ला लावल्यावर aboriginal होतो. ही तुलना दोन समुदायांमधील आहे, एक समुदाय ओरिजिनल अर्थात असा समुदाय जो मुख्य प्रवाहात आहे आणि दुसरा जो मुख्य प्रवाहापासून तुटलेला व परिघाबाहेर फेकलेला आहे, ज्याचा सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक आणि भाषिक बाबीचा मुख्य प्रवाहाच्या जीवन पद्धतीशी कोणताही संबंध नाही, अशा वर्गाची ओळख करण्यासाठी aboriginal हे एक सामान्य नाम देण्यात आलेले आहे. इतिहासात अशा जनांकरिता अनेक सामान्य नाम वापरलेले आहेत. मौर्यकाळात आटविक, देशज, वनात राहणारे इत्यादी. मुळात सरंजामशाहीच्या काळात मुख्य प्रवाहापासून तुटलेल्या, वनात निवास करणाऱ्या समुदायाच्या अस्मितेबाबत कधी विचारच करण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांच्यापुढे कधी अस्मितेचा आणि ओळखीचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. आणि सरंजामशहांना वनात राहणार्‍या समुदायाकडून कधी गंभीर आव्हान मिळाले नव्हते. त्यामुळेच तत्कालीन राजेरजवाड्यांनी वनात राहणार्‍या समुदायांकडे कधी लक्ष दिले नाही आणि त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून दिले.

 

वसाहतिक काळात परिभाषित आदिवासी

 

खरी समस्या वसाहतीक काळात निर्माण होते आणि ती जगभर दिसून येते. कारण युरोपियनांनी जगात आपल्या  वसाहतिक साम्राज्याची स्थापना केली होती, ज्याच्या प्रतिक्रियेच्या स्वरुपात मोठा प्रतिरोध झाला. सरतेशेवटी मूळनिवासी पराभूत झालेत, गुलाम झालेत. मूळ निवासींचे संपूर्ण क्षेत्र आणि प्रदेश साम्राज्यवाद्यांच्या ताब्यात आलेत. इंग्रजांनी काही धोरणे आखलीत, जेणेकरून जनजातींना गोलबंद केले जाऊ शकेल. परंतु या मूळ निवासींना चिन्हांकित करण्यात समस्या  येत असल्याने त्यांची ओळख aboriginal च्या रूपात केली गेली. या शब्दाचा सर्वप्रथम उपयोग ऑस्ट्रेलियातील मूळनिवासींकरिता १७८९ साली करण्यात आला. परंतु यापूर्वी सोळाव्या शतकात aboriginal शब्दाला first inhabitant च्या स्वरूपात परिभाषित करण्यात आले, जे आजच्या प्रचलित indigenous च्या समांतर आहे. भारतात सुद्धा भारत सरकार अधिनियम १९१९ आणि १९३५ च्या अनुच्छेद १३(५) मध्ये aboriginal शब्द विधीमान्य आहे. १९४३ मध्ये एल्विनने सुद्धा आदिवासी या शब्दाची शिफारस केली होती. नेहरूंनी सुद्धा १९५५ मध्ये म्हटले आहेकी,जर आपण आदिवासी शब्दाचा स्वीकार केला तर आपणास जनजाती ह्या देशाचे मूळनिवासी आहेत,हे कबूल करावे लागेल. सरदार पटेलांनी सुध्दा संविधान सभेत आदिवासी शब्दाला  विरोध केला होता,हे जग जाहीर आहे. aboriginal या शब्दाचा सरळ साधा अर्थ होतो-इतरांपेक्षा वेगळा, ज्याची सामान्य ओळख आदिवासींच्या रूपाने झाली. अमेरिकेत native अर्थात first या रुपात प्रचलित आहे, हा शब्दसुद्धा aboriginal किंवा indigenous च्या समांतर आहे. उदाहरणार्थ- ‘in the united state the term native American is in common usage to describe aboriginal peoples. Same in Canada the term aboriginal or indigenous is generally prefered to Native.’ अशाच प्रकारे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मूळनिवासीबाबत विचार करणाऱ्या स्थायी समितीने या शब्दांमध्ये थोडाही भेद केलेला नाही. समितीच्या मतानुसार native, aboriginal आणि indigenous हे एकाच अर्थाने स्वीकारण्यात आले आहेत.

‘In may 2016 Fifteenth session of the United Nation’s permanent forum on indigenous issues affirmed that indigenous people (also termed aboriginal people, native people, autochthonous people) are distinctive groups protected in international or national legislation.’ म्हणून indigenous शब्द aboriginal किंवा native पासून भिन्न असल्याचा भेद या शब्दांमध्ये करणे चुकीचे ठरेल. जर ही समिती ह्या शब्दांची व्याख्या समान अर्थाने करते तर आपली चर्चा निरर्थक नाही काय?

 

aboriginal आणि indigenous ची सैद्धांतिक बाजू   

 

आता आपण indigenous आणि aboriginal यांची दुसरी बाजू सुद्धा पाहू, जी भाषाशास्त्रज्ञांनी चर्चिली आहे. aborigine ची उत्पत्ती लॅटिनमधून आहे  जो ab-original पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ होतो from the beginning अर्थात मूळ निवासी. हा शब्द इंग्रजी भाषेत जवळपास सोळाव्या शतकात आला आहे. याचा अर्थ सुद्धा from the beginning अर्थात सुरुवातीपासून राहणारे अथवा मूळनिवासी होतो, जो आजच्या  प्रचलित indigenous च्या समांतर आहे. aboriginal प्रमाणेच indigenous हा शब्द सुद्धा लॅटिनमधून आलेला आहे, जो indigna शब्दातून निर्माण झाला, ज्याचे मूळ gen या धातूवर आधारित आहे. अशाच प्रकारे origine शब्दाला ab हा उपसर्ग जोडून aboriginal शब्द तयार झालेला आहे. त्याच प्रकारे indigna शब्दाला in हा उपसर्ग जोडून indigenous हा शब्द तयार झाला, ज्याचा अर्थ सुद्धा मूळ किंवा प्रथम असा होतो. Indigenous शब्द विसाव्या शतकापर्यंत केवळ पशु आणि वनस्पतीसाठीच उपयोगात आणला जात असे. भाषा शास्त्रज्ञांच्या मतानुसार विशिष्ट पक्षी आणि वनस्पतींचे उत्पत्ती स्थान वातावरणावर अवलंबून असते, म्हणून ते त्याच भौगोलिक क्षेत्रात आढळतात. कांगारू ऑस्ट्रेलियात, सफरचंद शिमला आणि काश्मीरमध्ये, अॅनाकोंडा अमेरिकेच्या ॲमेझॉन वर्षावनात. अशाप्रकारे तेथील इंडिजिनस जीवजंतू आहेत. परंतु विसाव्या शतकात सुमारे १८९२ साली विशिष्ट भौगोलिक क्षेत्र आणि प्रदेशांमध्ये निवास करणाऱ्या आदिम जनांना कायदेशीररित्या परिभाषित करण्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थायी समितीने कायदेशीररित्या अशा लोकांना इंडिजिनसच्या रूपात परिभाषित केले. ज्यात विशिष्ट भौगोलिक  क्षेत्र व प्रदेशात राहणारे, विशिष्ट प्रकारची बोली-भाषा, संकुचित स्वरूपाची उपार्जन पद्धती व यासोबत आदिम प्रकारच्या चाली-रिती व प्रथा पाळणाऱ्या समुदायांना इंडिजिनसच्या श्रेणीत ठेवण्यात आले आणि आम जनतेत तो शब्द प्रचलित झाला. आपल्या देशात मनुवादी मानसिकतेच्या सत्ताधारी वर्गाने सुरुवातीपासूनच यांना आदिवासी आणि मूळनिवासींच्या रूपात स्वीकारले नाही व तो स्वीकारू शकत नाही, ही गोष्ट वेगळी आहे.

म्हणूनच आपले अस्तित्व आणि अस्मितेसाठी आपला संघर्ष अनिवार्य आहे.

जय बिरसा!

 

 

लेखक आदिवासी समाजातील विवेकी चिंतक असून त्यांची आदिवासी समाजावरील अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

Leave a Comment