The Leaflet

| @theleaflet_in | August 11,2019

१९८१ साली प्रकाशित ‘दलित साहित्य: आजचे क्रांति विज्ञान’या ग्रंथातील हे प्रकरण. दलित पँथरच्या झंझावाताचे निखारे धुमसत होते व दलित साहित्याचा सूर्य मध्यान्ही तळपत होता,त्या काळातील हे विचारमंथन. या विचार मंथनाला आंबेडकरी विचारधारेसोबतच जोड होती ती मार्क्सवादी दृष्टीकोणाची. जातीय व वर्गीय शोषणाला कथा-कादंबर्‍यांतून नागडे करण्याचे काम बाबुराव बागुलांनी केले. भारतीय फॅसिझमसोप्या शब्दात समजावून सांगण्याचे काम त्यांनी या लेखाच्या माध्यमातून केले आहे.

अगदी चार शब्दात फॅसिझमचे वर्णन करायचे झाले तर हिंसक अहंकार आणि इतरांविषयी तिरस्कार, असे करता येईल. याअहंकाराचा आणि तिरस्काराचा साक्षात प्रत्यय भारतात हजारो वर्षांपासून हजारो लोकांना येतो आहे. अस्पृश्यता म्हणजे या अहंकाराचे आणि तिरस्काराचेचएक भयंकर रूप आहे. फॅसिझम म्हणजे भारतीयांच्या वर्णवादाची नवी आवृत्ती; आणि फॅसिझमचे तत्त्वज्ञान म्हणजे वर्णवादाचा पुरस्कार करणारे नव्या परिभाषेतले हिंदू तत्त्वज्ञान(अर्थात ब्राम्हणी तत्वज्ञान- सं.). परमेश्वर आणि त्याचे सर्व श्रेष्ठत्व मान्य केले की पुरुषोत्तम, प्रेषित, अवतारी पुरुष, अवतार, परमेश्वराची प्रियत्वव प्रतिनिधित्व प्राप्त झालेले महाभाग मान्य करावे लागतात; आणि असे मान्य केले की ज्येष्ठ आणि कनिष्ठ, उच्च आणि नीच हेही मान्य करावे लागते. तसेच हीन,  पापी, आत्मा मान्य करावा लागतो. म्हणजेच श्रेष्ठ व पुण्यात्माहीमान्य करावा लागतो. पाप- पुण्य, ज्येष्ठ-कनिष्ठ, उच्च-नीच ही विषमता मान्य करावी लागते.

 

अहंकार आणि तुच्छता हा पाया

 

विषमतेचा पुरस्कार करण्यासाठी वर्णवादी हिंदू (ब्राम्हणी-सं.) तत्त्वज्ञानाने कर्म, पुनर्जन्म, पूर्वकर्म, पूर्व-पाप, पूर्वपुण्य इत्यादी संकल्पनांचा शोध लावला. ईश्वरी न्यायबुद्धीच्या अनुसार माणसाला जन्म मिळतो. त्या जन्मात मिळणारे सुख, सन्मान, समृद्धी, श्रेष्ठत्व हे  पूर्व-जन्माच्या पुण्याचे फळ असते. ज्यांनी पूर्वजन्मी पुण्याच्या राशी निर्माण करून ठेवल्या आहेत त्या पुण्यवंतांनाच पवित्र कुळात, मोठ्या कुळात जन्म मिळतो, आणि तोच पूर्वपुण्याईवर, ईश्वरी कृपेच्या जोरावर सर्व सुखे भोगण्याचा अधिकारी असतो. परंतु ज्याने पूर्वजन्मी पापाच्या राशी रचल्या आहेत त्यांना  दुःख, दैन्य, दास्य व अस्पृश्यत्व मिळाले आहे. अस्पृश्यता चिरंजीव राहण्याचे कारण हे तत्वज्ञान आहे. या तत्त्वज्ञानानातूनच भारतीय संस्कृती आणि भारतीय मने तयार झालेली आहेत.अहंकार, तुच्छता, मत्सर, द्वेष, दुःख, दैन्याबद्दल, दुःखी, कष्टी लोकांबद्दल उपेक्षा ही भारतीय मनाची व संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. यामुळेच अस्पृश्यतेविरुद्ध आदिवासींच्या पशुतुल्य जीवनासंबंधी एकही आवाजभारतीय धार्मिक व ललित साहित्यात उठलेला दिसत नाही! अनेक संत, महंत आणि महात्मे आले, पण कोणीही सामाजिक दुःखाविरुद्ध, सामाजिक विषमतेविरुद्ध, वैचारिक अथवा सशस्त्र लढा केलेला नाही. सेवाभावनेने कोणीही दलित,उपेक्षित, वंचित, स्त्री व शूद्र यांच्यासाठी संस्था अथवा संघटना केलेल्या नाहीत. हजारो वर्षांतअगणित संत, महात्मे, बुद्धिवंत पंडित, महापंडित कवी, महाकवी आले; पण कोणीही या तत्त्वज्ञानाच्या एखाद्या संकल्पनेविरुद्ध आवाज उठवला नाही.  कुणाच्याही बुद्धीला एकाही संकल्पनेची व्यर्थता जाणवली नाही.

म्हणजे सर्वजण हे विषमतेचा पुरस्कार करीत होते, हे सर्वच निष्ठुर मुलतानी सत्तेचे सेवक होते असे म्हणता येत नाही, तरीही त्यांनी स्त्री- शूद्र, अतिशूद्रांची दुःस्थिती मान्य केलेली होती. कारण त्यांचे मन तसे घडलेले होते. एके काळी सोशालिस्ट-कम्युनिस्ट तत्त्वज्ञान मान्य करणारा जर्मन माणूस फॅसिस्ट होऊनवंशवादी कसा झाला याचे उत्तर इथे आहे.

 

तात्विक बैठक फॅसिझमला सोयीची

 

मानवेंद्रनाथ रॉय यांनी आपल्या पुस्तकात ठिकाणी केलेल्या भाषणांत भारतीय तत्त्वज्ञानाची फॅसिझम बद्दलची अनुकूलता स्पष्ट केलेली आहे.त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या वर्णवादी, विषमतावादी तत्त्वज्ञानाचा, त्यातून निर्माण झालेल्या समाजव्यवस्थेचा आणि अर्थव्यवस्थेचा सतत निषेध केलेला आहे. तरीही वर्णव्यवस्था व वर्णव्यवस्था मान्य करणारे मन, समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था अजूनही अस्तित्वात आहे.

भारतामध्ये फॅसिझम हा जर्मनीप्रमाणे भांडवलशाहीच्या गरजेतून येईल असे वाटत नाही. परंतु फॅसिझमआलाच तर तो वर्णव्यवस्था आणि तिचा इतिहास मानणाऱ्या वर्गाकडून येण्याची शक्यता आहे. या वर्गाने राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा हा सामाजिक क्रांतीचा लढा होऊ दिला नाही. या वर्गाने सर्व लढे वेगवेगळ्या परिघामध्ये ढकलून दिले आणि देशाला सामर्थ्यशाली व अभिनव करू बघणारे विचार व कार्य एकाकी पाडले.त्यामुळे स्वातंत्र्याचा लढा लढत असताना जे महामंथन होणार होते आणि त्यातून स्त्री-शूद्र यांना केंद्र करून येणारे स्वातंत्र्य, त्यांनी हजारो वर्षांपासून सत्तासंपत्ती आणि श्रेष्ठत्वाचे स्वामी होते त्याच वर्गाच्या आणि वर्णाच्या स्वाधीन केले.  

 

धर्म-संस्कृतीत फॅसिझमची बीजे 

 

हजारो वर्षांपासून अस्पृश्य आहेत, आदिवासी आहे, आणि स्त्री बद्दलचा तुच्छतावाद आहे; याचा अर्थ असा आहे की, फॅसिझमची मनोभूमिका इथे धर्म, संस्कृतीने तयार करून ठेवलेली आहे. म्हणून लोकशाही वर्णव्यवस्था आणि मनुस्मृती या परस्परविरोधी सत्ता, विचार आणि आचारपद्धती अस्तित्वात आहेत.  विजय कोणाचा व्हावा याचा विचार दलित जनता जसा करील त्याचाच विजय होणार आहे.  समाजवाद, लोकशाही यांचा पुरस्कार दलितांचे अग्रदलअसलेल्या आंबेडकरी चळवळीने केलेला आहे. लोकशाही समाजवादाचे महान पुरस्कर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या विचारांतून, ‘स्टेट्स अँड मॉयनारिटीज’या पुस्तकातून लोकशाही समाजवादाची मूलभूत तत्वे हिरिरीने मांडली आहेत. अस्पृश्यतेच्या उच्चाटनाचा लढा करणे याचाच अर्थ सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक,राजकीय व मानसिक परिवर्तनाचा लढा करणे होय.

बाबासाहेबांनी या सम्यक क्रांतीचा आरंभ करून ठेवलेला आहे. एवढेच नव्हे तर भारतीय लोकशाहीला वर्णव्यवस्थेचीबैठक मिळू नये, आणि जातिभेदातून वाटणारी व जातिभेद टिकवणारी लोकशाही राहू नये म्हणून त्यांनी लोकशाहीला वर्णवादाविरुद्ध असलेली अनात्मवादी, अनीश्वरवादी, बुद्धीप्रामाण्यवादीपरंपरा देण्यासाठी बौद्ध धर्माची पुनःस्थापना केली.  लोकशाही समाजवादाची राखणदारी करण्याची जबाबदारी अशा तऱ्हेने दलित जनतेच्या शिरावर बाबासाहेबांनी टाकलेली आहे, या जबाबदारीचा अंगीकार दलित जनतेशी संबंध असलेल्या दलित साहित्याने केलेला आहे.

साहित्य कधी दलित नसते आणि साहित्याचा नायक होणारा माणूसही दलित नसतो. हे ठाऊक असूनही दलित- साहित्य हे नाव घेतले गेले आहे.ज्याकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतःला अस्पृश्य-दलित म्हणवून घेत होते, अथवा याकरिता भगवान बुद्धांचे मत प्रतिपादित होते आणि ज्याकरिता अनेक क्रांतिकारक धर्मसत्तेच्या  व दंडसत्तेच्या विरोधात देशोदेशी उभे ठाकले होते. त्याचकरिता दलित साहित्य हे नाव धारण केले आहे आणि आपली प्रतिबद्धता व वामत्व सिद्ध केले आहे. आता एक लघुतमकथा सांगून हा लेख संपवत आहोत:

महाराष्ट्र शासनाने अस्पृश्य अनुसूचित नोकरदारांच्या संदर्भात एक जी.आर. अलीकडेच प्रकाशित केला आहे. तो जी.आर.वाचून एका सरकारी कचेरीतील कारकून मंडळींनी आणि अधिकाऱ्यांनी छळ करून एका मागासवर्गीय तरुणाला आत्महत्या करण्यास भाग पाडले.

‘या आंबेडकर,’ ‘या जगजीवनराम!’

‘साले आमचे नशीब गांडू, म्हणून आम्ही महार झालो नाही!’

‘झालो असतो तर मॅट्रिक पास झाल्याबरोबर नोकरी आणि दुसऱ्या वर्षी ऑफिसर’

अशा अनेक कथा, अनेक संवाद अनेक ऑफिसांतून रोज घडत आहेत आणि केवळ इथे जन्म घेतला म्हणून अवमानाचे, उपेक्षेचे, दुय्यम दर्जाचे नागरिकत्व दलितांना सहन करावे लागते आहे. संहार तेव्हाही होता, आताही होतो आहे. आता हत्यारे फक्त दिसत नाहीत, पण ती बाहेर येणार नाहीत याची शाश्वती देण्याएवढी लोकशाही व समाजवाद समर्थ आहेत असे वाटत नाही. लोकशाही समाजवादाचे मानसीकरण, संस्कृतीकरण झाले तरच ही स्थिती पालटू शकेल.

Leave a Comment