Avatar

| @ | June 9,2019

[dropcap]त्यां[/dropcap]नी ठरवली

तिची बुद्धीमत्ता, तिचं ईमान

आणि हक्क तिच्या जगण्याचा

तिच्या जन्मावरुन,

केलंय हे मी पण….

जेव्हा मिळवली

तीने जागा स्वतःची, त्यांच्या जगात

तेव्हा धुसफुसले ते मुरडंत नाकं आणि

फोडला टाहो त्यांनी गुणवत्तेच्या हत्येचा

केलंय हे मी पण….

ते बोलले तिला

‘कोणाला वेळ आहे इथे जातपात

अस्पृश्यता वगैरे पाळायला?

आजच्या बाजारात

आम्हाला हवी फक्त गुणवत्ता

पण असं आहे की

ती भरलीय ठासून फक्त आमच्यातच’

बोललोय हे मी पण….

बोलले ते पोटतिडकीनं

सात्विक संतापून

‘आरक्षण तिला मिळालेलं

गिळून टाकेल अख्ख्या समाजाला

आणि संपवून टाकेल देश

चला निघा इथून

काहीच उरलं नाहीए इथं आपलं’

बोललोय हे मी पण….

ते बोलले तिला

‘काय नशीबवान आहे

यार जन्म तुझा!

जन्मतःच आरक्षित

असणार तुझी जागा जगात आमच्या

देव करो मिळो

आम्हालाही जन्म असा’

बोललोय हे मी पण….

हलक्या फुलक्या टवाळीत

दररोज हिणवलं झिडकारलं

नाकारलं तिचं माणूसपण त्यांनी

केलंय हे मी पण….

कोणाला तरी दिसली असणार

तिची फरफट वेदना तिच्या

करूणेनं झालंच असेल जड

त्याचंही अंतःकरण

पण गप्प राहिले ते

त्यांच्या शिष्टाचाराला साजेसा

हुंदका गिळून

गप्प राहीलो मी पण….

त्यांच्या सभ्य टोमण्यांनी

त्यांच्या सात्विक छळानी

आणि अजिबात जातीयवादी

नसलेल्या त्यांच्या दमनानी

त्यांनी जीव घेतला तिचा

आणि तिचा जीव घेतलाय मी पण….

पायल तडवीच्या आत्महत्येबद्दल वाचलं, तेव्हा मला खूप निराशा वाटली. पण माझी अस्वस्थता वाढत गेली, जसं जसं हे उलगडू लागलं की आरोपी असलेल्या तीन वरिष्ठ डॉक्टर्सनी तिचा कसा सतत जातीवरून अपमान आणि छळ केला होता. या घटनेनं समाजात असलेली जातीय आरक्षणाबद्दलची कटुता आणि विद्यार्थ्यांचा निर्धास्तपणे होणारा छळ परत एकदा समोर आला. जातीमुळे बळी गेलेली पायल एकटीच उच्च शिक्षित, विद्यार्थी नाहीए. जेव्हा रोहित  वेमूलाची संस्थानिक हत्या झाली, तेव्हा पण खूप चीड आलेली, त्या घटनेला जबाबदार असलेल्या व्यवस्थेची आणि आपल्या समाजातल्या उदासीनतेची. पण पायलबरोबर झालेल्या अन्यायाने अशा घटनांकडे बघायचा सगळा दृष्टीकोनच बदलला. याचं कारण म्हणजे इथं आरोपी हे कोणी उच्च पदाधिकारी नसून, तिच्याबरोबरचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यावर जशी जातीयवादी वर्तणूक आणि आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप आहे, त्या गोष्टी कमी अधिक प्रमाणात मीही विद्यार्थी असताना केल्यात.

एक हिंदू ब्राह्मण म्हणून मला अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात ‘ओपन’ श्रेणीतून प्रवेश मिळाला. प्रवेश प्रक्रिया खुपच त्रासदायक आणि लांबली होती, जी तशी नेहमीच असते. पण माझ्या मित्र आणि परिवाराप्रमाणे मी त्या सगळया मनस्तापाचं खापर जातीय आरक्षणावर फोडलं. त्यानंतर बरीच वर्षे मी सुद्धा ही खदखद मनात दाबून होतो. हे विष मग उफाळून यायचं बाहेर, कधी ‘ओपन’मधल्या हुशार विद्यार्थ्यांना डावलणाऱ्या अकार्यक्षम व्यवस्थेवरच्या सात्विक संतापातून, तर कधी आरक्षणासाठी जात बदलण्याच्या कुचक्या विनोदातून, तर कधी देश कसा जातीय आरक्षणामुळे बरबाद होत चाललाय या भाबड्या चिंतेतून. ‘तुला तर आरक्षण देऊन ठेवलंय, तुला कसली काळजी?” यांसारखी हिणवणारी वाक्यं पण इतकी सर्वमान्य होती आणि आहेत की तेव्हा मी बेदरकारपणे असं काहीही बरळून जायचो. आरक्षित जातीतल्या माझ्या मित्र-मैत्रिणींना हे कदाचित खटकत असणार, पण मला कधीच कोणी हटकलं नाही. हा जातीय आरक्षणाचा कडवटपणा इतका खोलवर गेला होता की काही शिक्षकसुद्धा याला अपवाद नव्हते. मला लक्षात आहे, प्रा. कांबळे जे अतिशय चांगले आणि प्रोत्साहीत करणारे शिक्षक होते, त्यांना आम्ही कसा सतत त्रास द्यायचो. दुसऱ्या प्रा कांबळेंची त्यांच्या पाठीमागे त्यांच्या बोलण्यावरून थट्टा करायचो. विद्यार्थी दशेचा गुणधर्म असलेला उद्दामपणा जरी याला कारणीभूत असला तरी बाकी शिक्षकांना इतका विरोध नाही सहन करावा लागायचा. आता विचार केला तर वरवर निष्पक्ष वाटणाऱ्या त्या थट्टेत, जास्त शिक्षक हे आरक्षित जातीतलेच होते.

तसं बघायला गेलं तर ह्या दंभाची आणि बहुजन वर्गाबद्दलच्या टोकाच्या बेफिकीरीची मूळं शोधायला जरा मागं जावं लागेल. मी शहरातल्या सवर्ण भागात सवर्ण मित्र आणि परिवारांमधे वाढलो. राहत्या घरांपासून ते शाळा महाविद्यालयांच्या निवडीपर्यंत सगळेच निर्णय ‘आपली माणसं’ कुठं आहेत यावर ठरत असल्यामुळे इतर जातींशी असलेला संपर्क प्रयत्नपूर्वक मर्यादित होता. उदाहरणार्थ, मला कळत असल्यापासून ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी घराबाहेर पडेपर्यंत माझे मित्र भरपूर सारे कुळकर्णी, देवल, दात्ये, वाटवे, जोशी, अष्टेकर…. (आणि बरेच सारे ….कर) होते. कधी कधी सलगर, कांबळे, स्वामी, माळी वगैरे पण असायचे. पण मी त्यांच्यासोबत जास्त नसे. कारणं तेव्हा स्पष्ट होती, दुसऱ्या गटातला क्वचितच कोणी हुशार, लोकप्रिय वगैरे म्हणून ओळखला जायचा आणि त्यात काही तर वाया गेल्याबद्दल सुद्धा कुप्रसिद्ध असायचे. हा परकेपणा वाढत असतानाच घरी, शाळेत आणि प्रसिद्धी माध्यमातून चाललेल्या सवर्ण दृष्टिकोनातल्या परंपरांच्या आणि इतिहासाच्या पूजनामुळे एक खोटा दंभ माझ्यात भरायला लागला. यात खुप मोठा प्रभाव रा.स्व.संघाच्या शाखेचा होता. शाखेत दाखवलेल्या वैभवशाली सवर्ण भूतकाळाच्या दैदिप्यमान भपक्यात, ज्या जातीवादाच्या दमनावर तो इतिहास उभा होता, त्याकडे कधी लक्षच गेलं नाही. जातीवादाच्या इतिहासाबद्दल आणि आजच्या वर्तमानाबद्दल अनेकांसारखं मलाही  जाणीवपूर्वक अंधारात ठेवलं गेलं. आता ना जात दिसत होती ना त्यामुळे झालेले आणि होणारे अन्याय.

माझ्यासाठी निर्णायक टप्पा तो होता, जेव्हा मला जाणीव झाली की जातीय आरक्षण हे आपल्या परंपरागत विषम आणि अन्यायकारक असलेल्या समाजात थोडी फार समता आणण्यास मदत करतंय. भारत स्वतंत्र होताना, आरक्षण हे ना सवर्णांसाठी त्यांच्या पापाचं प्रायश्चित्त होतं, ना ते वंचितांना दिलेलं दान होतं. आरक्षण ही भारत एक आधुनिक राष्ट्र होण्यासाठीची एक सर्वांत महत्वाची अट होती. आधुनिक राष्ट्र, जे त्याच्या व्याख्येतच सगळ्या नागरिकांना (किमान तात्विक तरी) समानतेचा अधिकार देतं. १९४७ सालची परिस्थिती पाहता हा देश आरक्षणाविना एक वसाहतवादी देश बनला असता, जिथं इंग्रजांऐवजी सवर्णांनी सगळी साधनं स्वतःकडे ठेऊन, बहुजनांचं शोषण केलं असतं. तेव्हा आरक्षण हे सवर्ण वर्गाची मक्तेदारी कमी करण्यासाठीचं एक आर्थिक-सामाजिक पाऊल होतं. पायल आणि रोहित सोबत काय झालं हे आठवलं तर हे स्पष्ट होईल की आजही आरक्षणाची किती गरज आहे. हे सगळं समजलं तरी मला माझ्या अज्ञानाची आणि माझ्याकडून घडलेल्या गुन्ह्यांची पूर्ण जाणीव झालीय, असं मानणं मूर्खपणाचं ठरेल. पण आता गप्प राहणं हा पर्याय नाही. किती तरी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी दररोज, पायलवर झाले तशा अत्याचारांना बळी पडतायत. माझ्यासारख्या लोकांनी हे मान्य करायला हवं की त्यांनी आरक्षणाला बदनाम करून पायल तडवी आणि रोहित वेमुलाच्या संस्थानिक हत्येत अनावधानाने मदत केली आहे. अशी कबुली हे यांसारख्या अमानुष घटनांना थांबवण्यासाठीचं महत्वाचं पाऊल असेल.

 

[लेखक अमेरिकेतील एका कंपनीत यांत्रिकी अभियंते असून त्यांना लेख व कविता लिहायला आवडते.]

Leave a Comment