The Leaflet

| @theleaflet_in | July 14,2019

फिराकगोरखपूरी या नावाने लेखन करणारे रघुवीर सहाय लोकांना माहीत आहेत ते एक शायर म्हणून. त्यांनी जेवढे लेखन पद्यात केले आहे तेवढेच गद्यातही केले आहे. परंतु त्यांचे गद्यात्मक लेखन पाहिजे तसे लोकांपुढे आलेले नाही. १९४७ सालातील ताणतणाव पाहता त्यांनी प्रस्तुत दीर्घ लेख लिहिला होता. आज देशात पुन्हा तेच वातावरण निर्माण करण्यात आले असल्याने त्यांचा ह्याप्रासंगिक लेखाचा मराठी अनुवाद वाचकांसाठी लेखमालेच्या स्वरुपात  प्रस्तुत करत आहोत.

 

४. काश्मिरची लोकसंख्या शंभरामागे पंचाऐंशी मुसलमान आहे. काश्मिरचा प्रश्न गुंतून गुंतून खूप नाजुक बनला आहे. जर आपण मुसलमानांना नीच,अधम,आपल्याहून वेगळे,आपल्याहून वाईट आणि आपला शत्रू समजू तर काश्मिर भारताचे अंग बनावे हे कोणत्या तोंडाने म्हणू शकू. आज काश्मिरात जे युद्ध सुरू आहे आणि ज्यात हिंदू,शीख व मुसलमान एक होऊन काश्मिरवर हल्ला करणार्‍यांनाचा सामना करत आहेत,ते युद्ध आपण कसे लढू शकतो? जर मुसलमानांना शत्रू मानू,तर आपण त्यावर विजय कसा प्राप्त करू शकतो?आज आपल्या काश्मिरची व भारताची जी सेवा शेख अब्दुल्ला करीत आहेत ती व तशी सेवा कुणी हिंदू किंवा शीख करत नाही आहे. आणि सोबतच हेही ऐकून घ्या की,तीन चार लक्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त रुपये दर रोज काश्मिरमध्ये खर्च होत आहेत. जर भारत व पाकिस्तान या दोघांमध्ये युद्ध पेटले तर जगातली सरकारं या युद्धाला आणखी दहा वर्षे पुढे खेचतील. जगातली सरकारं तर या आगीत तेल ओतत राहतील, जेणेकरून हिंदू आणि मुसलमान जळावेत. हिंदू आणि मुसलमानांचे भांडण म्हणजे दोन माणसातील कुस्ती नव्हे,व दोन पक्षाच्या माणसांचा साधारण खटलाही नव्हे की ज्याचा निकाल लवकर लागेल. हे भांडण आपल्याकरिता मृत्युचा संदेश असेल ज्यामुळे हिंदू आणि शीख समाजाचं नाव,आपला सुधारलेपणा,आपला धर्म आणि आपल्या संस्कृतीचं नाव जगातून नेहमीकरिता पुसलं जाईल.

५. हिंदू संघातील चार कोटी मुसलमान पाकीस्थानात पळून जावेत अथवा देशभरातील नऊ कोटी मुसलमान पळून आणखी कुठे तरी जावेत, अन्यथा राहायचं असेल तर हिंदू आणि शिखांचे गुलाम बनून रहावेत,असेच जर हिंदू आणि शिखांना वाटत असेल तर यापेक्षा अधिक नीच कल्पना दुसरी कोणतीही असू शकत नाही. ही कल्पना, ही उठाठेव,हेषडयंत्र आणि अशा भांडणामुळे मुसलमानांचे नुकसान होण्याऐवजी हिंदू आणि शिखांना संपवेल. युरोपियन समाजाने दक्षिण आफ्रिकेचा शोध लावला,त्यावर विजय मिळवला,तेथे वसले आणि वसवले. आज दक्षिण आफ्रिका आणि मलायामध्ये लक्षावधी हिंदू आणि मुसलमान राहतात, परंतु ते स्वतंत्र नाहीत. दक्षिण आफ्रिका आणि मलायातून हिंदू आणि मुसलमानांनी पळून जावं किंवा यूरोपातील समाजांपेक्षा त्यांचे अधिकार,त्यांचा मान आणि त्यांची प्रतिष्ठा कसंही करून कमी रहावी हे यूरोपियन समाजांचं म्हणणं आपल्याला मान्य नाहीय. तेथील सरकारांकडून आपल्याला आपला पूर्ण वाटा पाहिजे आहे. तेथील जीवनात आपला पूर्णच्या पूर्ण वाटा पाहिजे आहे. धर्म, जीवन पद्धती,संस्कृती आणि भाषेतील दुरावा हिंदू व मुस्लिमांना  वंश,चेहर्‍याची ठेवण आणि वर्ण यावरुन युरोपियनांनी कशाही तर्‍हेनं कमी समजावं हे आपल्याला मान्य नाही. खरं तर दक्षीण आफ्रिका आणि मलायाचा शोध लावणारे,त्या देशांना घडवणारे व वसवणारे युरोपातीलच राहिलेले आहेत. जर आपण भारतात एक हजार वर्षांपासून राहत असलेल्या मुसलमानांचा अधिकार अमान्य केला आणि त्यांना देशातून पिटाळून लावण्याचा निश्चय केला तर दक्षिण आफ्रिका आणि मलायामधील भारतीयांना एक तर संपवले जाईल किंवा त्यांना मारझोड करून पिटाळून तरी लावले जाईल आणि आपण काही बोलूही शकणार नाही. हिंदू-मुसलमानांचा प्रश्न संपूर्ण जगात जीवनाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. हा प्रश्न भारतापुरताच मर्यादित ठेवता येत नाही.

६. रशियात ७० कोटींपेक्षा जास्त असे लोक राहतात जे मुसलमान नाहीत आणि मुसलमानांची लोकसंख्या एक कोटीपेक्षा कमी आहे. चीनमध्ये मुसलमानांची लोकसंख्या शंभरामागे पाच-सहा म्हणजे सुमारे दोन कोटी आहे,परंतु तेथे कोणतेही फुटीरवादी भांडण झाले नाही. तेथील राष्ट्रीय जीवनात,तेथील प्रगती आणि सौख्यात मुसलमान इतरांसोबत तेवढेच सहभागी होत आहेत. रशिया आणि चीनमध्ये मुसलमानांचा धर्म,संस्कृती,भाषा आणि जीवन पद्धतीला संपूर्ण संरक्षण दिले जाते. जर आपण मुसलमानांना इथे राहू दिले नाही व फुलू दिले नाही तर आपल्याला अभिमान आहे ती भारताची कित्येक हजार वर्षे प्राचीन संस्कृती जगाच्या नजरेत किती खालच्या पातळीची व कलंकित समजली जाईल?आपल्या तुलनेत रशिया आणि चीनने असे करून दाखवले तर हिंदू संस्कृतीला आरशात आपले भयानक रूप पाहून लाज वाटेल आणि गर्वाने आपली मान उंचावू शकणार नाही.

७. समजा,की भारताच्या बाहेर जगाच्या कोणत्याही भागात तीन चार कोटी हिंदू व शीख काही कारणांनी जाऊन वसले आणि जसे भारताच्या संपूर्ण लोकसंख्येत मुसलमान शंभरातून वीस-पंचेवीस आहेत तसे त्या देशाच्या लोकसंख्येत हिंदू आणि शीख शंभरातून वीस-पंचेवीस झाले तर तशा परिस्थितीत आपण काय करू?जर त्या देशातील लोक तेथे शंभरात वीस-पंचेवीस हिंदू आणि शिखांना विदेशी,नीच,अधम आणि शत्रू मानून त्यांना पिटाळू पाहत असतील किंवा त्यांच्यावर बळजबरीने आपली भाषा,आपली संस्कृती लादू पाहत असतील तर आपण त्या देशातील नागरिकांचं रक्त प्यावं असं आपल्याला वाटणार नाही का?आपण त्यांना प्रगत व सभ्य समाज समजू का?किंवा जग त्यांना प्रगतिशील व सुसंस्कृत समजेल?जर न्याय व माणुसकीच्या नात्याने हिंदू आणि शीख यांनी दुसर्‍या देशात जाऊन प्रतिष्ठित जीवन जगावे असे आपल्याला वाटत असेल तर आपण भारतातून मुसलमानांना देशाबाहेर हाकलण्याचा किंवा भारतात मुसलमानांचा विनाश अशी इच्छा कशी बाळगू शकतो?

८. भारतातील हिंदू आणि मुसलमान मानव जातीचेच अंग आहेत. किमान उर्वरित जगातील माणसांपेक्षा भारतात राहणारे हिंदू आणि मुसलमान नीच आहेत, असं तरी मानू नये. मिस्र (इजिप्त-सं.) हा मुसलमानांचा देश आहे. तेथे एका मोठ्या भागात मोठ्या संख्येने ख्रिश्चन राहतात. इंग्रजांनी तेथील मुसलमान आणि ख्रिश्चनांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला परंतु मिस्रमधील ख्रिश्चन नीच,अधम आणि देशद्रोही असल्याचे तेथील मुसलमानांनी  मानले नाही. तेथील ख्रिश्चनांना आपल्या मुसलमान भावांचा अभिमान आहे आणि दोघेही खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे मिस्रच्या प्रगति व स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. जपानमध्ये लाखोंच्या संख्येने मुसलमान आहेत आणि त्यांची देशभक्ती व देशप्रेम कुणापेक्षाही कमी नाही. आता हिंदू संस्कृतीचं पारडं जड राहील की इतर संस्कृतींचं? मिस्रमधील मुसलमानांनी ख्रिश्चनांना आपल्या बरोबरीचं स्थान दिलेलं आहे. रशिया,चीन आणि जपानमधील मुस्लिमेतरांनी आपल्या समाजात मुसलमानांना बरोबरीचं स्थान दिलं आहे आणि एक आपण आहोत की हिंदू आणि शीख समाजात मुसलमानांना माणुसकीचं स्थान द्यायची इच्छा नाहीय व त्यांना भयंकर समजतो. थोडी जगावर नजर टाका,तेव्हा हिंदू-मुस्लिम प्रश्नावर बर्‍यापैकी प्रकाश पडेल. आपण दूर कशाला जायचं,आपल्या शेजारी भारतानंतर स्वतंत्र झालेला ब्रम्हदेश आहे. आपल्या देशाला लागून लंका (श्रीलंका-सं) आहे. लंका सुद्धा भारतानंतर स्वतंत्र झाला. ब्रम्हदेश आणि लंका या दोन्ही देशात शंभरात चार-पाच मुसलमान आहेत. लंकेच्या मुसलमानांची मातृभाषा अरबी आहे परंतु ब्रम्हदेश आणि लंकेच्या लोकांनी मुसलमानांना त्यांच्या देशात बरोबरीचे स्थान दिले आहे.

९. जर तुम्ही म्हणाल की इतर देशांत काहीही असो,इतर देशातील मुसलमान कितीही सज्जन असोत,परंतु ‘भारताचे मुसलमान’केवळ नीच आणि अधम आहेत तर असं समजणं ही भारत मातेला आणि हिंदू संस्कृतीला किती मोठी शिवी आहे. दुसर्‍या देशांचे जीवन आणि संस्कृती एवढी पवित्र आहे की तेथील मुसलमान सज्जन बनून जातात आणि आपल्या देशाची माती आणि संस्कृती एवढी नीच व सडलेली आहे की ती मुसलमानांना अधम बनवून टाकते. भारताच्या मातीत आणि संस्कृतीत तर अशी किमया असायला पाहिजे होती, जिने जगाला मोहिनी घालावी. आपण या देशात शंभरात ऐंशी आहोत. येथील शंभरातील वीस लोकसंख्येला जर आपण शत्रू बनवून ठेवले किंवा त्यांना रानटी समजतो तर यामुळे आपल्याच संस्कृतीचे तोंड काळे होते. महान भारत जर या देशात जन्मलेल्या मुसलमानांची मैत्री व प्रेम मिळवू शकला नाही तर तो हिंदूंचाच दोष मानला जाईल आणि याकरिता हिंदू संस्कृतीला दोषी ठरवलं जाईल. (अपूर्ण)

Leave a Comment