संसदेत बाँब,काळे पाणी व खचलेले उपेक्षित जीवन

बटुकेश्वर दत्त हे इतिहासाच्या पुस्तकातून गहाळ केलेल्या पानांपैकी एक पान. इंग्रजांच्या राजवटीत ज्यांच्या वाट्याला आली काळ्या पाण्याची शिक्षा आणि भारतीयांच्या राजवटीत उपेक्षित जीवन. शहीद भगतसिंगांच्या या लाडक्या व कणखर सहकार्‍याला जगाव्या लागलेल्या जीवनाबद्दल फार थोडी माहिती उपलब्ध आहे. हा लेख काही प्रमाणात ती उणीव भरून काढतो. २० जुलै १९६५ रोजी या क्रांतिकारकाचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

बटुकेश्वर दत्त यांचे नाव आठवताच माझ्या मनात ‘इंकलाब’करिता वळलेल्या मुठी व तुरुंगांच्या कोठड्यांमध्ये भयंकर यातना भोगणार्‍या एका राजकीय योध्याचे चित्र आकार घेते. परंतु थोड्याच वेळात ही दोन्ही चित्रे धूसर होऊन मिटतात आणि तिसर्‍या चित्रात तोच मुक्तियोद्धा पाटणा शहरात एका जख्ख जुनाट सायकलीवर आपल्या उर्वरित जीवनाचे ओझे वाहताना दिसू लागतो. मी असह्य वेदनांनी आपले डोळे मिटून घेतो. मग माझ्यापुढे त्या क्रांतिकारकाच्या आठ महीने वेदनाकारी मृत्युचे चित्र उभे ठाकते…

मी संपूर्ण देशाच्या वतीने बटुकेश्वर दत्त यांना क्षमा मागू इच्छितो,पण माझे ओठ हलत नाहीत. शब्द गळ्यात अडकून पडतात व मी स्वतंत्र भारतात त्यांचे खचलेले उपेक्षित जीवन आठवत रडू लागतो.

पाहता पाहता दत्त यांचा मृत्यू होऊन त्रेचाळीस (आता पंचावन्न-सं.) वर्षे लोटलीत. आपण त्यांचे चित्रही विसरलो. आज कानपूर,पाटणा किंवा दिल्लीत एखाद्या चौकात त्यांचा पुतळा नाही. कानपूरमध्ये त्यांचा जन्म झाला,जीवनाचे शेवटचे दिवस पाटणा शहरात घालवले आणि दिल्लीच्या संसदेत तर शहीद सहकारी भगतसिंग यांच्यासोबत ८ एप्रिल १९२९ रोजी ब्रिटीश साम्राज्यवादाच्या जनविरोधी धोरणाविरुद्धबाँब स्फोट केला.

हे वर्ष भगतसिंगांच्या जन्म शताब्दीचे (२००७-सं.) आहे,परंतु भगतसिंग यांच्यासोबत त्यांच्या क्रांतिकारक सहकार्‍याचे योग्यरित्या स्मरण करण्यात व त्यांचे मूल्यमापन करण्यात आपल्याकडून चूक होत राहिली. भगतसिंगांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीय क्रांतिकारक चळवळीला विचारांचे सर्वोच्च शिखर प्रदान केले हे खरे आहे. परंतु क्रांतिकारक आंदोलन ही एक संयुक्त मोहीम होती,हेही तेवढेच खरे आहे. आधी ‘हिंदुस्तान प्रजातांत्रिक संघ’या नावाने ओळखल्या जाणार्‍या देशातील क्रांतिकारक पक्षाला काकोरी प्रकरणी फाशी (१९२७) नंतर नेतृत्वाची धुरा चंद्रशेखर आझाद व भगतसिंगांच्या खांद्यावर आली तेव्हा ‘हिंदुस्तान समाजवादी प्रजातांत्रिक संघ’ असे नाव देण्यात आले. संघाच्या नावासोबत ‘समाजवादी’शब्द जोडण्याचा सर्वानुमते स्विकृत प्रस्ताव भगतसिंग यांचाच होता. त्यावेळी पक्षात भगवतीचरण वोहरा व विजय कुमार सिन्हा यांच्यासारखे बौद्धिक क्रांतिकारक होते. भगवतीचरण यांना क्रांतिकारक आंदोलनाचा मेंदू म्हटले गेले तर दुसरीकडे ‘हिंसप्रसं’ची स्थापना झाल्यावर विजयदा यांचेवर प्रचार आणि अंतरराष्ट्रीय संपर्काची मोलाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ‘हिंसप्रसं’चा जाहीरनामा भगवतीचरण यांनीच लिहीला होता व व्हॉईसरायची गाडी उडवण्याच्या  क्रांतिकारकांच्या प्रयत्नांविरुद्ध जेव्हा गांधीजींनी ‘बाँबची पुजा’लिहिले तेव्हा ‘बाँबचे तत्वज्ञान’लिहून बौद्धिक व तार्किक उत्तर देणारेही भगवती भाईच होते. परंतु भगवती भाई व बाँब परीक्षण करताना त्यांना आलेल्या अजोड हौतात्म्याचे स्मरण करण्यात आपण इतिहासदृष्टी दाखवली नाही. विजयदांना आपण विसरत चाललो आहोत व संसदेतील बाँब प्रकरणांनंतरही तुरुंगात भगतसिंगांसोबत खांद्याला खांदा लावून वाटचाल करणार्‍या बटुकेश्वर दत्त यांनाही आपण समग्रतेत पाहत नाही. तुकड्या तुकड्याने पाहण्याची आपली प्रवृत्ती आहे. आपला दृष्टिकोनही व्यक्तिवादी आहे. आझाद व भगतसिंगांच्या काळातील जे क्रांतिकारक हौतात्म्यातून बचावले व स्वतंत्र भारतात श्वास घेण्यासाठी जीवंत राहिले त्यांना आपण सन्मान दिला नाही व त्यांचे योगदान उजेडात आणण्याचे आवश्यक कार्यही पुर्णत्वास नेले नाही. त्या आकांक्षांना धरित्रीने केव्हा,कोठे व कसे गिळंकृत केले,हेही आपल्याला माहीत नाही. त्यातील बहुतेक अज्ञात अवस्थेतच मरण पावले…

क्रांतिकारक पक्षात येण्याचा भगतसिंगांचा जो काळ होता,जवळ जवळ तोच काळ कानपूरमध्ये जन्माला आलेल्या बटुकेश्वर दत्त यांचाही होता. त्या काळात कानपूर हे क्रांतिकारकांचे केंद्र होते. ‘हिंसप्रसं’च्या अतिशय आवडत्या सदस्यांमध्ये बटुकेश्वर दत्त यांचा समावेश होता. पक्षाने त्यांना भगतसिंगांसोबतबाँब टाकण्यास पाठवण्यामागे त्यांचे व्यक्तिमत्व होते. पकडल्यानंतर न्यायालयात व तुरुंगात लढली जाणारी साम्राज्यवादविरोधी लढाई ते भगतसिंगांसोबत मिळून चांगल्या प्रकारे लढू शकतील,असा पक्षाला विश्वास होता. दत्त त्यांच्या या क्रांतिकारक परीक्षेत यशस्वी ठरले. भगतसिंग व दत्त यांनी संयुक्तपणे ६ जून १९२९ रोजी दिल्लीचे सेशन जज मि. लियोनाय मिडील्टनच्या न्यायालयात त्यांच्या कार्याचे ‘औचित्य’,तत्कालीन केंद्रीय विधिमंडळाचा जनविरोधी स्वभावधर्म यासोबत आमुलाग्र परिवर्तनासाठी क्रांतीची अपरिहार्यता स्पष्ट करणारे ऐतिहासिक वक्तव्य दिले होते. नंतर तुरुंगात त्यांनी राजकीय कैद्यांच्या अधिकारासाठी दीर्घ लढा दिला. होम मेंबर,भारत सरकारच्या नावे २४ जुलै १९२९ चे भगतसिंग व दत्त यांचे संयुक्त पत्र राजकीय बंद्यांच्या अधिकाराच्या संघर्षाचे अद्भुत दस्तऐवज आहे. कैद्यांचे जीवन जगतानाही या दोन्ही क्रांतिकारकांनी साम्राज्यवादविरोधी संयुक्त अभियानाचे आपल्या संपुर्ण शक्तिनिशी निर्भीडपणे व चातुर्याने संचालन केले. ते पुन्हा पुन्हा ‘इंकलाब’चा अर्थ स्पष्ट करीत असत व देशातील जनतेसोबत घट्ट नाते निर्माण करण्यासाठी त्यांनी सर्व तर्‍हेचे बलिदान दिले. भगतसिंगांसोबत बटुकेश्वर दत्त यांच्या  बौद्धिक उंची व जाणिवेस दुर्लक्षित करण्याचे काही एक कारण नाही.

भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांना जेव्हा फाशीची व बटुकेश्वर दत्त यांना आजीवन कैदेची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा गतकाळात आपल्यासोबत दृढतेने उभे राहिलेल्या बटुकेश्वर दत्त यांच्या नावे पत्रात भगतसिंगांनी लिहिले होते-

मला फाशीची शिक्षा झाली आहे व तुला आजीवन कैदेची. तु जीवंत राहशील आणि क्रांतिकारक आपल्या ध्येयासाठी केवळ मरणच पत्करतात असे नव्हे,तर जीवंत राहून प्रत्येक संकटाचा मुकाबलाही करू शकतात,हे तुला जीवंत राहून जगाला दाखवून द्यावयाचे आहे. मृत्यू सांसारिक अडचणींपासून मुक्ति मिळवण्याचे साधन बनू नये,तर क्रांतिकारक केवळ आपल्या ध्येयाकरिता फासावर चढू शकतात असे नव्हे,तर तुरुंगाच्या लहानशा अंधार कोठडीत अति भयंकर अत्याचारही सहन करू शकतात,हे संयोगाने फाशीच्या पाशातून वाचलेल्या क्रांतिकारकांनी जगाला दाखवून द्यावयाचे आहे.

२३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग,राजगुरू व सुखदेव हे लाहोर कारागृहात आपल्या ध्येयासाठी फासावर लटकले तर दुसरीकडे बटुकेश्वर दत्त यांनी काळ्या पाण्याच्या यातना भोगल्या. त्यांनी आपला शहीद सहकारी भगतसिंगांचा विश्वास भंग होऊ दिला नाही. ते खचले नाहीत वा डगमगले नाहीत. अविचल राहून क्रांतिकारक स्वभावधर्माचा आदर्श निर्माण करण्यासाठी त्यांनी स्वतःला तीळ तीळ झिजवले. हे जीवन म्हणजे त्यांच्यासाठी एक कठीण तपस्या होती.

स्वातंत्र्यानंतर ते हजारीबाग कारागृहातून सुटले. नंतर वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांचा विवाह अंजली यांचेशी झाला. त्यांचे वय त्यावेळी पस्तीस-छत्तीस असेल. ते स्वतंत्र भारतात सतरा वर्षे जगले. तेव्हा त्यांची जवळीक भगतसिंगांची आई विद्यावती यांचेशी राहिली,त्या त्यांना आपला दुसरा पुत्र मानत. स्वातंत्र्यानंतर दत्त यांना अतिशय अभावग्रस्त व उपेक्षित जीणे जगावे लागले. आपली गुजराण करण्याकरिता त्यांना रोज विहीर खोदावी लागे व पाणी प्यावे लागे. एका डबल रोटी बनवण्याच्या मशीनवर मैदा देण्याचे काम त्यांना बरेच दिवस करावे लागल्याचे ऐकिवात आहे. २५- ३० वर्षांपूर्वी (आता ४०-४५ वर्षापूर्वी- सं.) लिहीलेल्या कवितेत कुलदीप सलिल यांनी नोंद केली होती-

“कोण आहेत हे?

कोण बटुकेश्वर दत्त?”

विचारतात मुलं

आणि दोन तीन डोळ्यातून

गळतात आसवं

गाडग्यासारखा जुना चेहरा

हातांचे केस जळालेले

“हात एवढे काळे?”

विचारतात मुलं

“एवढे काळे यांचे हात कशापायी?”

पहिल्यांदा हसतात दत्त

“भट्टीचं काम बेटा,नोकर आहे बेकरीवर

डबल रोटी बनवतो मी अलिकडे”

आजीवन कारावास भोगून

डबल रोटी बनवतात बटुकेश्वर दत्त!

पाटण्याच्या रस्त्यावरून एका जुनाट सायकलने येता जाता,आपल्या कुटुंबासाठी दोन शेर लाकडं आणि एक शेर पिठाची सोय करून आणतानाची प्रतिमा आज तेथे कुणाच्या आठवणीतही आहे की नाही,ठाऊक नाही.

एकदा बिहारच्या राज्यपालांनी त्यांना विधान परिषदेचे सदस्यही नियुक्त केले,परंतु तेथे त्यांना फार विरोध सहन करावा लागला. संसदीय राजकारण कदाचित त्यांच्या स्वभावास अनुकूल नसेल. ते जन्मजात क्रांतिकारक होते व अखेरच्या श्वासापर्यंत क्रांतिकारक राहिले.

आजारी पडले तेव्हा पाटण्यात त्यांचेवर उपचार झाले. नंतर २२ नोव्हेंबर १९६४ रोजी त्यांना दिल्लीला नेण्यात आले. दिल्ली रेल्वे स्थानकावर उतरताना कुण्या तरी वार्ताहराला त्यांनी म्हटले, ‘जेथे मीबाँब टाकला त्या दिल्लीत एका अपंगासारखे मला स्ट्रेचरवर टाकून आणले जाईल,असे मला स्वप्नातही वाटले नव्हते.’

बटुकेश्वर दत्त यांना कर्क रोग झाला होता. आठ महीने ते मृत्युशी झुंज देत राहिले. फार त्रास झाला. शहीद भगतसिंगांची आई व इतर क्रांतिकारक सहकारी त्यांच्या सुश्रुषेत राहिले. परंतु २० जुलै १९६५ च्या रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. १९३१ साली हुसैनीवालां येथे ज्या ठिकाणी भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांच्या चितेस अग्नि देण्यात आला होता,त्याच ठिकाणी त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाला अग्नि देण्यात आला.

बटुकेश्वर राहत होते त्या पाटण्याच्या जक्कनपूरा मोहल्ल्यातील बोळींचे नामकरण ‘बटुकेश्वर दत्त लेन’करण्यात आल्याचे ऐकण्यात आले आहे. परंतु हे शहर त्या क्रांतिकारकाच्या स्मृति सांभाळून ठेवू शकले नाही. जेथे ते जन्मास आले त्या कानपूर शहरानेही त्यांच्या स्मृति जपल्या नाहीत. आणि जेथील केंद्रीय विधी मंडळात बाँब फेकून त्यांनी भगतसिंगांसह साम्राज्यवादाविरुद्ध एका नव्या पद्धतीची लढाई सुरू केली होती, त्या दिल्लीनेही त्यांना विस्मृतीत टाकले. एका शोषणविहीन समाजवादी समाजाच्या निर्मितीची लढाई आजही देशाच्या अजेंड्यावर आहे.

(प्रस्तुत लेख शहीद भगतसिंग जन्मशताब्दी वर्षात लिहीलेल्या हिंदी लेखाचा मराठी अनुवाद आहे.)