झेप छावणीची-भविष्याच्या आशेची

[dropcap]वो[/dropcap] आदमी नहीं है मुकम्मल बयान है

माथे पे उसके चोट का गहरा निशान है

सामान कुछ नहीं है फटेहाल है मगर

झोले में उसके पास कोई संविधान है

दुष्यंत कुमारांची वरील रचना ज्यांच्याबद्दल सांगते आहे अशी माणसं आपल्या अवतीभवती वावरत असतात. व्यक्तिगत संघर्ष आणि वेदना शांतपणे पचवून कुठल्यातरी स्वप्नाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरु असतो. कुठून येते त्यांच्यात ही ऊर्मी? कशी पडतात स्वप्नं? अटळ संघर्षाची आणि जखमांच्या खुणांनाच ओळख मानणारी ही वाट त्यांना कशी सापडते? कधीकाळी सामान्य आयुष्य जगणाऱ्या, प्रसंगी चुकीच्या मार्गानी चालणाऱ्या किंवा दिशाहीन असणाऱ्या तरुणांच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो मैलाचा दगड नेमका कोणता असतो?

या प्रश्नाचं उत्तर सापडेल रायगड जिल्ह्यात माणगावजवळच्या वडघर गावात. इथल्या ३६ एकरांच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात. एक असं स्मारक जिथे ना साने गुरुजींचा पुतळा आहे ना व्यक्तिपूजेचं स्तोम. आहे ते फक्त खुलं, मोकळं अवकाश. जिथे प्रत्येकाला नवे विचार समजून घेण्याची, आपले विचार मांडण्याची संधी आहे, नवं काही शिकण्या-शिकवण्याची, नवी नाती जोडण्याची आणि पर्यायानं स्वतःला ओळखण्याची ही एक प्रयोगशाळा आहे. कान, डोळे आणि मन जागं ठेवून इथे आलेल्या प्रत्येकाला स्मारकाचा परिसस्पर्श झाल्यावाचून राहत नाही आणि इथे येऊन जाणारा कुणीही माणूस इथे गुंतल्याविना राहत नाही. इथल्या निसर्गात, इथल्या वातावरणात आणि इथल्या विचारात परिवर्तनाची जबरदस्त ताकद आहे.

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्मारकामध्ये होणारी छावणी ही एक तरुणांची प्रयोगशाळा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून इथे तरुण मुलं-मुली येतात. दरवर्षी एका नव्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित व्याख्याने, गट चर्चा, सादरीकरण, मुलाखती, खेळ, निसर्गाशी मैत्री, श्रमदान अशा उपक्रमांतून ही तरुणाई व्यक्त होते. इथे कुठलेही विशिष्ट विचार त्यांच्यावर लादले जात नाहीत, पण नव्या विचारांचा एक पट समोर मांडला जातो. स्वतःला अजमावण्याची संधी दिली जाते. मुक्तपणे अभिव्यक्त होता येतं. छावणीमुळे स्वतःची ओळख पटण्याचा, स्वतःचा आवाका लक्षात आणून देणारा तो नेमका क्षण हातात येतो. मनावरची झापडं दूर होतात, हक्काचे मित्र आणि ‘फक्त लढ’ म्हणणारे आश्वासक चेहरे मिळतात. या मंतरलेल्या जागेनं गेल्या वीस वर्षांच्या वाटचालीत पेरलेल्या हजारो बियांची आता रोपटी झाली आहेत. जिथे पोहोचली तिथे घट्ट मूळ रोवून उभी राहिली आहेत.

११ जून हा साने गुरुजींचा स्मृतिदिन. यावर्षी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक परिवारानं हा दिवस छावणीतून झेप घेतलेल्या तरूण मित्रांसोबत साजरा केला. आपापल्या क्षेत्रात वेगळेपण सिद्ध केलेल्या निवडक साथींचा स्मारक परिवारातल्या जेष्ठांकडून सत्कार करण्यात आला. जगभरातले पुरस्कार, कौतुक सोहळे एकीकडे आणि ज्या अंगणातून आपण या ठिकाणापर्यंत पोहोचलो त्या अंगणात मिळणारी कौतुकाची ऊब एकीकडे हीच भावना या तरुण मित्रांच्या बोलण्यातून व्यक्त झाली. झाडं लावण्याचा ध्यास घेतलेला आणि आपल्या गावातल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांना थेट साता समुद्रापार घेऊन जाणारा विनायक साळुंखे, स्वसंरक्षणाचे धडे देतानाच आत्मभान जागवण्याचा प्रयत्न करणारी वर्षा राहासे, विद्यार्थी आंदोलनांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणारा अमीर काझी, रंग आणि रेषांच्या माध्यमातून लहान मुलांच्या निर्मल अभिव्यक्तीला आकार देऊ पाहणारी स्नेहल एकबोटे, स्वतःच्या लैंगिकतेचा समंजसपणे स्वीकार करून आपलं माणूसपण जपणारी शमिभा, पर्यावरण प्रश्नांबाबत लोकांना जागरूक करणारी तेजश्री देवाडकर, झोपडपट्टीतील मुलांना गांधी आणि आंबेडकर समजावून सांगणारा सुदर्शन चकाले, पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून दुष्काळ निवारण प्रक्रियेत भाग घेणारा चिंतामणी पवार हे तरुण-तरुणी म्हणजे आपल्या प्रत्येकाचं उर्जास्थान आहे. कोणतीही सामाजिक चळवळ अथवा राजकीय विचार प्रवाह तरुणांची भाषा ऐकत नसेल, स्वीकारत नसेल तर त्यातला प्रवाहीपणा, जिवंतपणा हरवायला वेळ लागत नाही. आजच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत हेच चित्र पाहायला मिळतं. मात्र साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक याला अपवाद आहे. खुल्या मनानं व्यक्त होणारे तरुण आणि तितक्याच खुल्या मनानं ऐकणारे त्यांचे जेष्ठ, अनुभवी मित्र अशी ही अनोखी मैफल म्हणजे झेप छावणीची हा हृद्य सोहळा.

आताचा काळ हा अस्वस्थतेचा, काही बाजूंनी निराश करणारा काळ आहे. जगण्याची अफाट गुंतागुंत, वेग आणि स्पर्धा यांत माझी पिढी अडकून गेलेली आहे. अनेक बाजूंनी परस्परविरोधी विचारांचे प्रवाह आपल्या अंगावर आदळत असताना, सतत कुठली तरी बाजू घेण्याचा आणि जे आपल्या बाजूला नाहीत त्यांचा द्वेष करण्याचा दुराग्रह वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत आपला मेंदू शाबूत ठेवून, कुठलाही विचार सद्सद्विवेकाच्या कसोटीवर घासून पुसून घेण्यावाचून आणि नव्या ऊर्जेसह नव्या आव्हानांना सामोरं जाण्यावाचून पर्याय नाही. माणूसपण हरवत जाण्याच्या या पर्वात विज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही टोकदार झालं तरी मानवी जीवनाचे सूक्ष्म कंगोरेच आपलं आयुष्य समृद्ध करू शकतात, हेही तितकंच खरं आहे.

साने गुरुजींच्या विचारांचा आणि त्यांच्यातल्या माणूसपणाच्या ओलाव्याचा स्पर्श प्रत्येक मनाला घडवणारं साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक हे याच मानवी आयुष्याची प्रयोगशाळा आहे. नामदेव ढसाळांच्या कवितेतील खालील शब्दात स्मारकाचं संचित नेमकेपणानं उतरलं आहे.

‘आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी म्हणून

त्याच्या कुशीत गुण्यागोविंदानं राहावं

चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावं

एक तीळ सर्वांनी कांडून खावा

माणसावरच सूक्त रचावं

माणसानं गाणे गावे माणसाचेच’

लेखिका अनुवाद  करतात.