मनीष आणि अमिता: ‘नक्षलवादी दाम्पत्या’ची सत्यकथा

हे सरकार आपल्या अल्पसंख्यांक, दलित, महिला, आदिवासी, पर्यावरण विरोधी सत्तेला कायम ठेवण्याकरिता दोन तर्‍हेची कामे करीत आहे. एकीकडे तर ते एका बहुसंख्य विभागाच्या मेंदूत जमातवादी व ब्राह्मणी संकुचितपणा कोंबून त्यांना आपसातील भांडण आणि झुंडबळी सारख्या गुन्हेगारीकडे ढकलत आहे, तर दुसरीकडे जे त्यांचा बुरखा फाडून त्यांना नागडं करतातअशांना तुरुंगात डांबत आहे. याच मालिकेचा एक भाग म्हणून ८ जुलै रोजी उत्तर प्रदेशच्या कुप्रसिद्ध दहशतवाद विरोधी पथकाने मनीष आणि अमिता यांच्या घरी सकाळी ६वाजता हल्लाबोल करून अटक केली. पोलिसांच्या प्राथमिक माहिती अहवालानुसार“आधी सूचना प्राप्त झाली आहे की,काही संशयित नक्षलवादी फिरून फिरून सामान्य जनतेसोबत बैठका घेऊन, अपराधिक कटकारस्थान रचून, लोकांना चिथावून सशस्त्र बंडाच्या माध्यमातून सत्ताबदल करण्याची योजना आखत आहेत.”

मनीष आणि अमिता यांच्याव्यतिरिक्त प्राथमिक माहिती अहवालामध्ये विविध जनसंघटनांशी संबंधित कृपाशंकर, वृंदा,बृजेश आणि प्रभा ह्या चार लोकांची नावे आहेत. दहशतवाद विरोधी पथकाकडून ८ जुलै रोजीच देवरिया येथील त्यांच्या घरी पहाटे चार वाजता हल्लाबोल करून त्यांना अटक करण्यात आली होती, परंतु लोकांनी विरोध केल्याने रात्री उशिरा त्यांना सोडूनदेण्यात आले. विचारपूस करण्याच्या सबबीखाली त्यांना वारंवार दहशतवाद विरोधी पथकाच्या मुख्यालयातबोलावून त्रास दिला जात आहे आणित्यांना कधीही अटक केली जाऊ शकते. तसे तर लोकशाही समाजात सत्ता बदलाच्या उद्देशाने केवळ सभा घेणे गुन्हा ठरू नये, परंतु जर तो गुन्हा ठरत असेल तर हा पहिला गुन्हा प्रत्यक्षरित्या खुद्द सरकारकडून केला जात आहे, जे आपल्या सशस्त्र बळांना आदिवासी, विस्थापित आंदोलनकर्त्यांच्या दडपशाहीकरिता केवळ उघड उघड प्रेरितच करीत आहे,असे नव्हे तर या दडपशाहीबद्दल त्यांना पुरस्कृतही करीत आहे. यावर आपण नेहमीच चर्चा करत असतो आणि विरोधही नोंदवत असतो.परंतु यावेळी मी अटक करण्यात आलेले ‘संशयित नक्षलवादी’ मनीष आणि अमिता कोण आहेत, एवढेच केवळ सांगू इच्छिते.

४६ वर्षे वयाचा मनीषहा माझा मोठा भाऊ आहे. अलाहाबादमध्ये माझी ओळख आधी मनीषभाऊच्या बहिणीच्या रूपातच होती, स्वतंत्र ओळख नंतर निर्माण झाली. परिस्थिती अशी बदलली आहे की,मनीषभाऊला याच शहरात लोक आता माझा मोठा भाऊ म्हणून ओळखतात. मनीष भाऊला या गोष्टीचा आनंद होत असेल. मनीषभाऊ अशा लोकांपैकी आहेकी, जेकधीच पारंपारिक वाटेवर चालले नाहीत. तरुण असण्यासोबतच त्याने या व्यक्तीमत्वाचा परिचय घरी दिला, जेव्हा इंटरची परीक्षा उत्तर प्रदेश शिक्षण मंडळातून ६७ टक्के गुणांनी विज्ञान शाखेत उत्तीर्ण होऊनही त्याने सांगून टाकले होते की,तो घरातील पारंपारिक पद्धतीनुसार अभियांत्रिकीची तयारी न करता बी.ए. करेल. त्याला घरच्यांनी व कुटुंबातील सर्वांनीच समजावून सांगितले, परंतु त्याने अलाहाबाद विश्वविद्यालयात हिंदी वाङमय, राज्यशास्त्र आणि इतिहास हे विषय घेऊन बी.ए.च्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. यानंतर घरच्यांकडून आणि कुटुंबांतील मंडळींकडून सल्ला दिला जाऊ लागला की जर बी. ए. करतोच आहे तर त्याने अलाहाबादच्या परंपरेनुसार नागरी सेवेची तयारी करावी. मनीष भाऊच्या आवडीनिवडीतील वैविध्य, माहिती आणि अभ्यासाची चिकाटी पाहूनलोकांना वाटत होतं की पाहिल्याच प्रयत्नात त्याची निवड होईल. परंतु त्याने लोकांचा हा सल्ला धुडकावून लावला आणि बी.ए. करत असतानाच तो सामाजिक कार्यात पडला.   अलाहाबाद विश्वविद्यालयात प्रा. लाल बहादुर वर्मा नुकतेच आले होते. वर्मा आणि देवमणीभारती यांच्या प्रभावात येऊन तो अलाहाबादच्या झोपडपट्ट्यांमध्ये मुलांना शिकवायला जाऊ लागला. यादरम्यान त्याची अंशु मालवीय यांच्याशी चांगली गट्टी जमली. लाल बहादुर वर्मा यांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात याचा उल्लेख केला आहे, त्यांनी मनीष भाऊचं नाव मनू लिहिलं आहे. हे काम करत असताना त्याच्या मित्रांच्या संख्येत खूप भर पडली, ज्यात वर्माजींच्या देखरेखीखाली ‘मौखिक इतिहास’ यासारख्या अनोख्या विषयावर संशोधन करीत असलेली त्यांची प्रिय विद्यार्थिनी अमिता सुद्धा होती. मनीष भाऊ मित्रांनी वेढलेला असे. परंतु जे अशी सामाजिक कामे करत असताना आपल्या परिवारापासून दूर जातात, अशा सामाजिक कार्यकर्त्यांपैकी तोनव्हता. मनीष भाऊने आपल्या सख्ख्या भावंडांसोबतच काका, आत्या आणि मावशीच्या मुलांनाही आपल्या बरोबर घेतले. त्यावेळी  माझ्या घरात व कुटुंबात या गोष्टीवर खूप चर्चा होत असे. मनीषच्या प्रभावात येऊन या सर्व युवकांचे हे काय झालेले आहे? माझे अनेक मामेभाऊ, आतेभाऊआणि चुलत भाऊ वस्त्यांमध्ये शिकविण्याकरिता जाऊ लागले. आपल्या ज्ञानात भर घालण्याकरिता ते देशव जागतिक वाङमय आणि इतिहासाचे सामूहिकपणे वाचन करीत असत आणि त्यावर वाद-विवाद करीत असत. आज ही सर्व मंडळी जरी कुटुंब आणि रोजगारात गुंतलेली असली,तरी हे सारेच सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत चांगली माणसं म्हणून जीवन जगत आहेत.

सरंजामी मुल्ये जोपासणाऱ्या आमच्या घरात लोकशाहीचे बीज मनीषभाऊनेच पेरले आणि संपूर्ण घर बदलू लागले. मनीष भाऊ आणि अमिता वहिनींच्या प्रभावामुळेच माझी मोठी ताई लग्नाच्या १४वर्षानंतर नालायक आणि दारुड्या नवऱ्याला सोडून येण्याचे धाडस करू शकली. अमिता त्यावेळीशहरात चर्चित व सक्रियअशा ‘उमेद महिला मंच’ या महिला संघटनेचे नेतृत्व करत होती. माझी ताई दोन मुलांना घेऊन सासर सोडून आपल्या माहेरी येण्याऐवजी अमिताच्या घरी पोहोचली होतीते माहेरच्या भरवशावर नव्हे तर संघटनेच्या भरवशावर तिने नवे जीवन निवडले आहेहे दाखवण्यासाठी. यासर्वांच्या प्रभावामुळे माझ्यात सुद्धा बदल होत होता. प्रत्येक संघर्षात मनीष भाऊ माझ्या सोबत होता आणि आता तर तोमाझा भाऊ कमी व मित्र जास्त असा बदलू लागला होता. मनीष भाऊ वर्माजींच्या प्रभावाखाली येण्याआधी १९९० साली माझ्या दादाचे लग्न परमानंद श्रीवास्तव यांच्या मोठ्यामुलीशी झाले तेव्हा वहिनींचा प्रभाव सर्वात आधी मनीष भाऊ वरच पडला. त्यावेळीइंटर उत्तीर्ण होऊन त्याने बी.ए.मध्ये प्रवेश घेतला होता. वहिनींशी मनीष भाऊचं चांगलंचपटत होतं. कारण वहिनी ‘मुक्तिबोधांच्या कवितेत मार्क्सवादी सौंदर्यशास्त्र’यावर संशोधन करीत होत्या. दोघेही खूप चर्चा करत असत. आता मला हे आठवत नाही की, त्यांच्यापैकी सांगणारं कोण होतं आणि ऐकणारंकोण होतं. माझ्या कानावर तर सतत‘मार्क्सवाद’आणि ‘मुक्तिबोध’हेच शब्द पडत असत. मनीष भाऊ आणि मोठ्या वहिनींच्या प्रभावात येऊन मीसुद्धा इंटरमध्ये असताना माझ्या जीवनातील पहिली साहित्यिक कादंबरी ‘गोदान’ केवळ वाचलीच नाही तर त्यावर आपले मत लिहून गुपचूप महेश भाऊला दिले होते. मनीष भाऊच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्य आजही माझ्या आठवणीत आहे. यानंतर त्याने मला पुस्तके भेट देण्यास सुरुवात केली, ते आजतागायत. मनीष भाऊ जेथे कुठे जातो,तेथे प्रत्येकासाठी काही ना काही पाहण्यासारखं किंवा वाचण्यासारखं त्याच्या झोळीत काही ना काही नक्कीच असते,एक वर्षाच्या बालकापासून तर म्हाताऱ्यापर्यंत. कुणालाही काही समजून घ्यायचं असेल तर ते मनीष भाऊला शोधतात. मनीष भाऊनेच आम्हा सर्वांसमोर जागतिक वाङमयापासून तर चित्रपट, कला,संस्कृती, विज्ञान, खगोलशास्त्र आणि तत्त्वज्ञानाची दारे उघडली.

अलाहाबाद विश्वविद्यालयातून बी.ए. उत्तीर्ण केल्यानंतर घरातून नोकरीकरिता पडणाऱ्या दबावापासूनवाचण्यासाठी त्याने गोरखपूरला जाऊन गोरखपूर विश्वविद्यालयात  एम.ए.च्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आणि‘इंकलाबी छात्र सभा’ नावाच्या विद्यार्थी संघटनेची स्थापना केली. त्या संघटनेचा तो प्रथम अध्यक्ष होता. संघटना गोरखपूरपासून तर अलाहाबादपर्यंत विस्तार पावली. विश्वविजय याच संघटनेतून आले आहेत. ही संघटना पुढे  ‘इंकलाबी छात्र मोर्चा’ अशी झाली.

याच दरम्यान त्याने पुन्हा एकदा सरंजामी परंपरा तोडत वय आणि शिक्षणात आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या अमिताशी लग्न केले. अमिताचे घर देखील अलाहाबादेतच होते. ती आपल्या वडिलांची बजाज स्कुटर किंवा आपल्या हीरो पुकने आमच्या घरी येऊन सर्वांची गळा-भेट घेई तेव्हा आमच्या घरच्यांसोबतच शेजारच्या लोकांचेही लक्ष वेधून घेत असे. त्या वेळी ती महिला संघटनेच्या कार्यासोबतच आपल्या संशोधन कार्यासंबंधाने फिरून स्वातंत्र्य लढ्यातील लोकांच्या मुलाखती घेत असे. मी सुद्धा कधी कधी तिच्या सोबत जात असे. ती खूपच सुरेल गाते व तिच्या या गुणामुळे सुद्धा ती सर्वांमध्ये लोकप्रिय आहे. फैज यांची नज़्म‘मुझसे पहले सी मोहब्बत मेरे महबूब न मांग’ आणि फरीदा खानम यांची ‘आज जाने की ज़िद न करो’ मी सर्वप्रथम तिच्याकडूनच ऐकल्या होत्या. तिचे घर म्हणजे माझ्यासारख्या स्वतःच्या कोशात राहणार्‍या मुलीला स्वातंत्र्याचा आनंद लुटण्याचे व स्वतःतील गुण ओळखण्याचे स्थान राहत असे. तिच्या खोलीत चित्तवेधक आणि सुंदर अशा  खुप सार्‍या गोष्टींसह माझीही एक अनाकलनीय वाटणारी कविता लावलेली होती.

मनीष-अमिता यांच्या लग्नाच्या वेळी आणि त्यानंतर माझे घर म्हणजे संपूर्ण कुटुंबाच्या कुतुहलाचा विषय ठरले. कारण मनीष भाऊनंतर मी आणि मग माझ्या लहान भावाने सुद्धा जात,हुंडा,प्रतिष्ठा,कुंडली,रूढी-परंपरा इत्यादि तोडून लग्न केले ते सुद्धा अगदी साध्या समारंभात आणि अतिशय कमी खर्चात. आणि आता सामाजिक कार्यामुळे आधी माझी व विश्वविजयची आणि आता मनीष-अमिताची ही अटक लोकांच्या कुतुहलाचा विषय आहे. परंतु बहुतेक लोकांनी ही बाब सकारात्मकपणे स्वीकारली आहे. माझ्या आई-वडिलांसाठी ही स्थिति निश्चितच अस्वस्थ करणारी असेल. परंतु मनीष भाऊनेच आईला म्हटले आहे की,“चांगल्या कामाची सुरुवात  काहीच लोक करत असतात,सुरूवातीला टीकाही करतात. परंतु इतिहास आम्ही योग्य असल्याचे सिद्ध करेल.”

मनीष भाऊ आणि अमिता यांनी अलाहाबाद पासून तर गोरखपुर, देहरादून, रायपुर मार्गे भोपाळपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. देहरादूनमध्ये मनीषभाऊने ‘प्रोग्रेसिव स्टूडेंट फ्रंट’ला समृद्ध करण्याचे कार्य केले आणि अमिता वहिनी उत्तराखंड महिला मंचसोबत जुळून राहिली. रायपुरमध्येही ती सामाजिक कार्यांसोबतच एका शाळेत शिक्षिका होती. प्रत्येक ठिकाणी दोघेही चळवळीत सोबत राहिले. मागील काही वर्षांपासून अमिताची प्रकृती चांगली नसल्याने दोघेही भोपाळात राहत होते व मुख्यत्वे अनुवादाचं काम करीत होते. तिला रक्त शर्करा आणि उच्च रक्तदाब आहे. अमिता एका शाळेत शिकवत सुद्धा होती. ‘शिरीन’हे तिचं टोपण नाव आहे. याच नावाने तिच्या कविता,कथा विविध साहित्यिक नियतकालिकांमध्ये प्रकाशित होत आल्या आहेत. तिने बोलिव्हियातील खाणीत काम करणार्‍या कामगार डोमितिला हिचे खाणीतील जीवन  सांगणार्‍या ‘Let me speek’या पुस्तकाचे हिंदीत भाषांतर केले आहे. त्या दोघांनी मिळून हान सुइन यांच्या ‘Morning deluge’या ऐतिहासिक पुस्तकाचे  हिंदीत भाषांतर केले आहे व ते लवकरच प्रकाशित होऊ घातले आहे. मार्गरेट रंडाल यांचे ‘Sandino’s daughters’या पुस्तकाचे हिंदीत भाषांतर केले आहे व त्याला प्रकाशक मिळण्याची वाट पाहत आहेत. मनीष भाऊ विशेषतः विविध जन संघटना व आंदोलनकर्त्यांसाठी दर्जेदार वाङमय हिन्दी भाषेत उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे. परंतु राज्यसत्तेला हा गुन्हा वाटतो,कारण आपल्या भाषेत लोकशाहीवादी साहित्य उपलब्ध करून देणे म्हणजे त्यांच्या जाणिवेचा विकास करणे व बुद्धिला लोकशाहीवादी बनवणे आहे. अशा ‘गुन्हेगारा’वर मी केवळ बहीण याच नात्याने नव्हे तर एक नागरिक या नात्याने सुद्धा प्रेम करते.

 

लेखिका साम्यवादी विचारसरणीच्या असून अलाहाबाद येथून नियमित प्रकाशित होणार्‍या ‘दस्तक’या हिन्दी मासिकाच्या संपादिका आहेत. त्यांना ‘नक्षलवादा’च्या खोट्या गुन्ह्यात अनेक दिवस तुरुंगवास घडला असून त्यांच्या कथा,कविता व काही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.