The Leaflet

| @theleaflet_in | July 21,2019

भगतसिंगांचे लाडके बटुकेश्वर दत्त समाजवादी समाजव्यवस्थेच्या स्थापनेसाठी जीवनाचे बलिदान करणारे उच्च दर्जाचे क्रांतिकारक आणि आणि तेवढेच संवेदनशील विचारवंतही होते, हे त्यांनी लिहिलेल्या या प्रस्तुत लेखावरून दिसून येते. भगतसिंगांसोबत जवळीक, अगदी कमी वयातही क्रांतीबद्दलची त्यांची निष्ठा, स्पष्टता आणि संपूर्ण जीवनात भोगाव्या लागणाऱ्या परिस्थितीशी  मुकाबला करण्याची दुर्मिळ जिद्द यांचे उत्तम उदाहरण आहे. २० जुलै हा बटुकेश्वर दत्त यांचा स्मृती दिन. त्यांच्या नजरेतून भगतसिंगांच्या एका पैलूचा वेगळा परिचय करून देणारा हा लेख विस्तार भयास्तव तीन भागात सादर करीत आहोत. 

सरदारचंगुणगुणणं आजही ही माझ्या कानावर आदळते-  मैं वो एक मुश्ते गुबार हूं…..धुवून पीळलेल्या कपड्यांना झटकून जणू संपूर्ण उन्हात पसरवत आहे व संपूर्ण तन्मयतेने गात आहे.

कानपूर येथील सुरेश दादांच्या खानावळीच्या दुसऱ्या माळ्याच्या छतावर किशोर सरदारचे कपडे धुण्याचे ते दृष्य आजही ताजे आहे-  खांद्यासहीत डोक्यावर लपेटलेला केशसंभार, कंबरेला एक पंचा उर्वरित संपूर्ण उघडे शरीर,  पाण्याच्या प्रवाहासारखा कपडे आपटत आहे. साबणाचा शुभ्र फेस उडून इकडे तिकडे पसरत आहे आणि सरदार पुन्हा पुन्हा एकच ओळआळवत आहे- मैं वो एक मुश्ते…..

१९२४सालच्या सुरुवातीचा कोणतातरी महिना. मी त्या काळात कानपूरच्या बंगाली माध्यमिक शाळेत विद्यार्थी आणि कौटुंबिक नजरचुकवून कार्य करणारा क्रांतिकारक पक्षाचा एक सक्रिय कार्यकर्ताहोतो. श्री गणेश शंकर विद्यार्थी यांच्या ‘प्रताप’या वृत्तपत्राशी संबंधित व पक्षाचे प्रमुख नेते श्री सुरेश चंद्र यांच्या सूचनेवरून सायंकाळी त्यांना भेटावयास कंपनीबागेत गेलो. कांव कशासाठी बोलावले गेले,हे विचारणे पक्षाच्या नियमाविरुद्धहोते आणि डोळे मिटून आदेशाचे पालन करणे आमच्या क्रांतिकारक जीवनाचा पहिला पाठहोता. म्हणून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास स्वतःला तयार करून तेथे पोहोचलो. सुरेश दादा तेथे नव्हते. माझी भिरभिरती नजर बागेच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंतफिरून आली, परंतु ते नजरेस पडले नाहीत. मला आश्चर्य वाटले. क्रांतिकारकांच्या कार्यात अशा तऱ्हेची चूक आधी कधीच दिसून आली नव्हती. काळ्याकुट्ट अंधारातही मुसळधार पावसाचा मारा डोक्यावर झेलत, सीआयडीची नजर चुकवून नियोजित कार्यासाठी ठरलेल्या वेळी हजर राहण्यात यापूर्वी माझ्याकडून कधीही चूक झाली नव्हती. मग आज प्रमुख क्रांतिकारक नेत्याच्या सूचनेत व कामात हा फरक कसा?

याच तंद्रीत असताना माझी नजर एक दाट काटेरी झुडुपावर स्थिरावली. किती विचित्र व हसू आणत शहारे आणणारे दृश्य! झुडूपाच्या वर पांढऱ्या फेट्याचे एक टोक डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे मोराच्या पिसासारखे डोलत होते.मी नजर रोखून त्याला पाहू लागलो. मधातच ते स्थिर होई आणि पुन्हा घड्याळाच्या लंबकाप्रमाणे आपला वेग धरी. बागेतील निस्तब्ध वातावरणात लालिमायुक्त संध्याप्रकाश रात्रीच्या अंधारात आपले मुख लपवण्याची तयारी करत असताना काटेरी झुडुपावर पांढऱ्या फेट्याचे टोक जणू मला आपल्याजवळ येण्यास खुणावत होते.

मी पुढे झालो. झुडूपाजवळ पोहोचताच पांढऱ्या फेट्याचा धारक साडेसहा फूटाहूनही उंच एक शीख तरुण माझ्या चाहूलाने साळसूद उभा ठाकला. त्याच्या काळ्या चकाकत्या डोळ्यात शंकेची भावना आणि लांब मुखाकृतीवर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची दृढता विद्यमान होती. लांब लटकणाऱ्या दोन्ही बाजूंवर सदऱ्याच्या मोडलेल्या बाह्या, मजबूत मुठीत बंद लांबसडक बोटे, दोन्ही गालांवर दाढीच्या हलक्या रेषा, डोक्यावर फेट्यात बंद केसांचा गुच्छ ज्यातील काही बटा बाहेर झुलत होत्या. माझ्यापुढे तो शीख तरुण चेहऱ्यावर आव्हानात्मक भाव धारण करून उभा होता आणि मी त्याच्या तत्कालीन मुद्रेप्रति उदासीन. तेवढ्यात बाजूला अविचल पर्वतराजासारखे बसलेल्या क्रांतिकारक सुरेश दादांकडे लक्ष गेले. मला पाहून त्यांच्या चेहर्‍यावर अतिपरिचित स्मित उमलले आणि सरदार शांत झाला. त्याच्या दृढ मुठींची बोटे सहज व शिथिल झाली.मला नवागंतुकाला पाहताच जी चमक आणि रक्त डोळ्यात उतरले होते, ते सुरेश दादांच्या स्मितामुळे जणू संपूर्ण चेहऱ्यावर लाली बनून पसरले आणि आपल्या अवाजवी दृढतेमुळे त्याला ओशाळल्यागतवाटत असल्याचे मला जाणवले. सुरेश दादांनी हसतच आम्हा दोघांना समोरासमोर बसवले आणि त्या तरुण सरदाराशी माझी ओळख करून दिली. नाव- बलवंत सिंग. पंजाबच्या नॅशनल कॉलेजात बी.ए.चा विद्यार्थी आहे. प्रमुख क्रांतिकारक नेते रासबिहारी बोस यांचे अत्यंत जवळचे सहकारी शचिंद्रनाथ सान्याल, ‘बंदी जीवन’चे लेखक आणि नंतर काकोरी कटाचे प्रमुख आरोपी त्या काळात उत्तर भारतातील क्रांतिकारक पक्षाचे प्रमुख संघटक होते. पंजाब नॅशनल कॉलेजचे अध्यापक जयचंद विद्यालंकार यांच्या माध्यमातून त्या नवतरुणाची ओळख शचिंद्रदादांशी झाली आणि तो हळूहळू क्रांतिकारक संघटनेकडे आकर्षित झाला. त्याची क्रांतिकारक विचारसरणी पाहून त्याच्या घरच्या मंडळींनी विद्यार्थीदशेतच त्याचाविवाह करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु क्रांतीपथावरील वाटसरु असलेल्या त्या तरुणास त्याच्या विवाहाचा प्रस्ताव मंजूर नव्हता आणि त्यापासून सुटका करून घेण्याकरिता संपूर्ण कौटुंबिक आत्मीयता व कुटुंबातील लोकांशी संबंध तोडून तो लाहोरहून सुरेशदादांच्या आश्रमात कानपूरात पळून आला होता. रशियन क्रांतिकारकांचा प्रभाव त्याच्या स्मृतिपटलावर होता व त्यांच्या प्रमाणेच त्यानेही शपथ घेतली होती की, मी आयुष्यात कुणाच्या प्रेमात पडणार नाही व कुणाला प्रेमात पाडणार नाही, विवाह करणार नाही व कुणाचे विवाह संबंध जोडून देणार नाही. जेव्हा आम्ही दररोज व क्षणोक्षणी एकमेकांच्या जवळ येत गेलो तेव्हा त्याच्यासंबंधीच्या या सर्व बाबींची माहिती मला नंतर हळूहळू झाली.

आणि त्याच वर्षी म्हणजे १९२४ सालीच! जीवनदायी गंगेचा प्रलयंकारी महापूर! दोन्ही काठांवर वसलेल्या कानपूर शहरासोबतच असंख्य गावे पुराची बळी ठरली. महापुराने ग्रासलेल्या उंच फांद्यांचा आश्रय घेतला. वाहत जाणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी गंगेच्या पुलावर मोठमोठे दोर बांधून लटकत सोडले होते, जेणेकरून प्रवाहात वाहणारे लोक ते दोर पकडून आपला जीव वाचवू शकतील. शहरात पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिबीर लावले गेले.‘तरुण संघ’ नावाची एक संस्था कार्य करीत होती व आम्हालाही सेवादलात कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. नुकसान पावलेल्या लोकांच्या सेवा कार्यात मी कामी लागलो. बलवंत सिंग सोबत होता. घरच्या शिस्तीकडे दुर्लक्ष करीत एखाद्या सार्वजनिक सेवा कार्यासाठी घर सोडून रात्रंदिवस काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. बलवंतचा घराशी असलेला संबंध आधीच तुटला होता, त्यामुळे त्याला कोणत्याही कौटुंबिकशिस्तीची काळजी नव्हती. सेवा कार्यात सामील होणे त्याला अगदी सहज होते,परंतुत्याच  कार्याकरिता माझ्या किशोर मनाने घराविरुद्ध विद्रोहाचा मार्ग प्रथमच पत्करला.

आम्हा दोघांचे कर्तव्यसाधारणतः एकाच वेळी असे. महापुराच्या अतिशय वेगवान प्रवाहात वाहणारी माणसे व गुरांना काठाचा संकेत मिळावा म्हणून रात्री आम्ही दोघेही काळोख्या काठावर उभे राहून हातात जळता कंदील घेऊन शून्यात अविरत हलवत राहत असू आणि जर कधी गुरांचा एखादा कळप त्या उजेडाच्या आधारे आमच्या पायापर्यंत पोहोचला तर आम्ही त्याला बाहेर काढत असू, मग त्यांना ठेवण्याची व्यवस्था केली जात असे.

दिवसा आम्ही दोघेही नावाड्यांसोबत निघत असू आणि पूरग्रस्त निराश्रित कुटुंबांना त्यांच्या उरलेल्या सामानासह नावेत टाकून गंगा काठावरील शिबीरात पोहोचवत असू. पुराच्या प्रलयंकारी लीलेत सर्व काही गमावलेल्या हताश, भुकेल्या लाचार लोकांचा तो लोंढा! काळीज हेलावणाऱ्या त्यांच्या किंकाळ्यांनी तो परिसर निनादत होता. जेवणाची वाट पाहत बाया-माणसे वेगवेगळ्या रांगेत बसलेच होते, एवढ्यात गरम पुर्‍यांची टोपली दोन्ही हातांनी वर उचलून असलेला तरुण सरदार नजरेस पडला. डोक्याला पांढरा रेशमीफेटा, अंगात दोन्ही बाह्या वर चढवलेला साधारण कापडाचा सदरा. माझ्याशी नजरानजर होताच त्याच्या ओठांवर उत्स्फूर्त स्मित आणि डोळ्यात चमक चकाकली, परंतु बोलायला वेळ कुठे! उत्साह आणि उल्हासाने तो बेचैन लोकांच्या रांगेकडे गेला.

पूरग्रस्तांच्या मदत कार्याच्या त्या काळाने आम्हा दोघांना एकमेकांच्या जवळ येण्यास फार मदत केली. त्या काळात भुकेल्या सर्वहारा जनतेस पुर्‍या वाढण्याची सरदारची तऱ्हा, कामाप्रती त्याची चिकाटी व निष्ठा मी आजही विसरु शकत नाही आहे. पुऱ्या वाढणाऱ्या त्याच्या हातांनी नंतरच्या क्रांतिकारक जीवनात त्याच निष्ठेने पिस्तूल किंवा बाँबही चालवले. नंतरच्या क्रांतिकारक जीवनात आम्हाला अतिसाधारण जेवणही मिळणार नाहीकिंवा पुऱ्या वाढणाऱ्या या हातांवर कोरडी भाकर व मीठ हेच उर्वरित जीवनाचा आधार असेल, हे त्या दिवसात कोणास माहीत होते?

त्या काळात आम्हा दोघांच्या जीवनात एकमेकांबद्दलच्या आकर्षण भावनेसोबतच कानपूर शहराच्या जवळील कनालफाल जवळ गंगेच्या काठावर बसून प्रवाहास एक टक निरखत राहणे व एखाद्या विषयावर किंवा मुद्यावर अथवा योजनेवर विचार विनिमय करणे हेही सर्वात मोठे आकर्षण होते. याच संबंधात बहुधा आम्ही क्रांतिकारक जीवनात येऊ घातलेल्या दिवसांची कल्पना करण्यात तल्लीन होत असू. प्रसिद्ध क्रांतिकारकांची जीवन चरित्रे किंवा क्रांतिशी संबंधित साहित्याचे वाचन आम्ही येथेच बसून करत असू. एकीकडे गंगेचा अश्वेत प्रवाह भयानक आवाज करीत पुढे जाई तर दुसरीकडे क्रांतिकारक साहित्याचा प्रभाव आमच्या किशोर धमण्यांमध्ये रक्ताचा वेग वाढवी. पाण्याचा प्रचंड वेग आणि त्याच्या निरंतर गतिशीलतेचा आमच्यावर सर्वात जास्त प्रभाव पडला आणि कदाचित यामुळेच गंगेच्या काठाचे आकर्षण आम्हा दोघांच्याही मनात नेहमीच कायम राहिले.

एका सायंकाळी आम्ही गंगेच्या काठावर बसून आपल्या क्रांतीसंबंधीच्या कल्पनांना प्रत्यक्षात अमलात आणण्याच्या पद्धतींवर विचारच करत होतो तर एकाएकी आकाश ढगांनी झाकाळूलागले. गंगेच्या पलिकडील वस्त्या धूसर दिसू लागल्या, वाऱ्याचा वेग वाढला आणि थोड्याच वेळात आकाश ढगांच्या भयंकर गडगडाटाने फाटून जाईल असे वाटू लागले. क्षणभरातच निसर्गाने भयानक रूप धारण केले होते. आम्ही तेथून उठून शहराकडे चालू लागण्यापूर्वीच थेंब पडणे सुरू झाले आणि शहराच्या फुलबाग परिसरातील ‘एडवर्ड मेमोरियल हॉल’पर्यंत पोहोचत नाही तोच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. येथे आल्यानंतर आमच्या लक्षात आले की, सोबतचे ‘हिरो अँड हिरोइन्स ऑफ रशिया’ हे बहुमूल्य पुस्तक तर आम्ही धावपळीत गंगेच्या काठावरच विसरलो.  रशियावर झारशाहीचे निरंकुश अत्याचार आणि निर्वासनाविरुद्ध युवक-युवतींच्यासंग्रामाचे ते इतिहास पुस्तकअत्यंत दुर्मिळ असल्याकारणाने आमच्यासाठी जास्त मौल्यवान होते. परंतु त्या किर्रर्र अंधारात पावसासोबतच वाऱ्याच्या प्रचंड वेगाला तोंड देत दोन मैलांचे अंतर पार करून आणणार कोण?  मी जाण्याची बाब सरदारला खटकली. शारीरिकदृष्ट्या तो माझ्यापेक्षा नक्कीचधिप्पाड होता आणि आपल्या धिप्पाडपणाचा तर्क देऊन त्यावेळी मला जाण्यापासून रोखले व स्वतः लांब पावले टाकत अंधारात अदृश्य झाला. तो जाऊन काहीच क्षण लोटले असतील, माझ्या भावनिकतेने मला गदागदा हलवले आणि मीहीकिर्रर्र अंधारात सरदारच्या मागे गेलो.  भयान अंधारात सुसाट धावताना जेव्हा माझे पाय रस्त्याच्या मधोमध बसलेल्या सरदारवर जाऊन धडकले तेव्हा कुठे माझ्या पायांना माझ्या धावण्याची अनुभूती झाली. डोक्यावरील रेशमी फेटा अर्धा सुटून चिखलाने माखलेला होता. एका हातात पुस्तक व दुसऱ्या हातात आपल्या पायाचा अंगठा धरून तो रक्ताळून पडलेला होता. पायाच्या अंगठ्याचे नख निघाले होते. फेटा फाडून मी पट्टी बांधली आणि त्याला आधार देऊन ओले होत सुरेश दादांच्या खानावळीत परत आलो. त्याच्यापासून दूरआपल्या घरी परतल्यावर माझे मन सरदारच्या दुःखामुळे बेचैन होते. मी तेथून कापूस-पट्टी, जेंबकची डबी घेऊन तसाच मुसळधार पावसात सरदारकडे पोहोचलो, त्याच्या अंगठ्याचे रक्त साफ करून मलमपट्टी केली आणि रात्रभर त्याच्या जवळ बसून राहिलो. सकाळ होताच घरची शिस्त  आठवली. आपल्या प्रिय मित्राप्रति मी माझे लहानसे कर्तव्य बजावले, या समाधानामुळे त्यादिवशीकुटुंबियांकडून मिळणाऱ्या सर्व शिक्षा मी धैर्याने सहन केल्या. (अपूर्ण)

 

(प्रस्तुत लेख सुधीर विद्यार्थी यांच्या हाती लागला व संपादित स्वरूपात कथादेशमासिकाच्या ऑक्टोबर २००७ च्या अंकात प्रकाशित करण्यात आलाहोता.)

Leave a Comment