गिरीश कर्नाड: एक प्रखर लोकशाहीवादी कलावंत

[dropcap]अ[/dropcap]त्याचारी काळातही गीतं गाईली जातील?

होय,अत्याचारी काळाचीच गीतं गाईली जातील!

  • बर्टोल्ट ब्रेख्त

‘कलावंत’ हा शब्द कानावर पडताक्षणीच डोळ्यापुढे चित्र उभे राहते ते अतिशय हळव्या,भावनिक व संवेदनशील माणसाचं. कलावंत असणे म्हणजे केवळ इतरापर्यंत त्याची कला पोहचवणे नव्हे,तर कलेच्या माध्यमातून तो ज्या समाजाचा घटक आहे,त्याची सेवा करणे म्हणजे कलावंत असणे असते. कलावंताची अशी व्याख्या ज्यांच्या जीवनमूल्यांनी भारतीय साहित्य व कला विश्वाला दिली त्या गिरीश कर्नाड यांच्या निधनाची बातमी सकाळी कानावर आदळल्यागत आली आणि मग संपूर्ण दिवस त्यांच्या संदर्भातील आठवणीत गेला. खरे तर त्यांची आठवण करत राहण्यास कित्येक दिवस अपुरे पडतील,असं प्रखर व्यक्तिमत्व आपण गमावून बसलो आहोत,याची आठवण येणारा भीषण काळ आपल्याला करून देत राहील.

जगात कलावंतांची वानवा नाही. चुकीच्या मार्गाने अमाप पैसा कमवून कोट्यावधी रुपये दान करणारे कलावंतही आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. मात्र देशातील लोकशाही व संवैधानिक मूल्ये संकटात सापडली असताना काही अपवाद सोडले तर बहुतेक सारेच कलावंत एक तर मौन बाळगून असतात किंवा लोकशाहीविरोधी शक्तींची तळी उचलताना दिसतात.

गिरीश कर्नाड यांनी वयाच्या २३ व्या वर्षी ‘ययाती’ हे पहिले नाटक लिहीले. त्यानंतर लोक कथा व पुराण कथा यांचा आधार घेत त्यांनी ‘तुघलक’, ‘हयवदन’, ‘अंगुमालिगे’, ‘हितिना हुंजा’, ‘नाग मंडल’, ‘ताले दांडा’, ‘अग्नि मट्टू माले’, ‘दी ड्रीम्स ऑफ टीपू सुलतान’अशी अनेक नाटके लिहिली. यू. आर. अनंतमूर्ती याच्या ‘संस्कार’या कादंबरीवर त्यांनी त्याच नावाचा चित्रपट केला होता व त्या चित्रपटाला राष्ट्रपतीचे सुवर्ण पदक मिळाले होते. ‘निशांत’, ‘मंथन’व ‘स्वामी’चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ‘उत्सव’आणि ‘गोधूली’यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. नाटक व चित्रपटांव्यतिरिक्त दूरदर्शनवरील काही मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.

विजय तेंडुलकर,बादल सरकार,मोहन राकेश या समकालीन नाटककारांपेक्षा त्यांच्या नाटकांची शैली अगदी वेगळी होती. कला ही एक सामाजिक चळवळ आहे असे ते मानत. नाटककार म्हणून त्यांचा प्रभाव इतर साहित्यिक,नाटककार व कलावंतांवर पडत असे,परंतु त्यांच्या सहज आणि विनम्र स्वभावामुळे सुद्धा ते अनेकांवर प्रभाव टाकून जात. नव्या कलावंतांचे काम पाहून त्यांच्या पाठीवर कौतुकाने थाप द्यायला त्यांना कधीही कमीपणा वाटत नसे.

‘संस्कार’चित्रपट करण्यापूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठात सहा-सात वर्षे त्यांनी अध्यापन केले होते. १९७० साली ‘फिल्म्स अँड टेलीविजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया’ या प्रतिष्ठीत संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना दहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कारांनी सम्मानीत करण्यात आले होते. साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमीतर्फेही त्यांना पुरस्कृत करण्यात आले होते. संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. साहित्याच्या क्षेत्रात अतिशय मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला होता. याशिवाय अनेक संस्थांचे संचालकत्व त्यांनी लिलया पेलले होते. त्यांच्या सडेतोडपणामुळे एफटीआयआय विद्यार्थ्यांना प्रवेश देताना घ्यावयाची स्क्रीन टेस्ट पद्धतीला त्यांनी तर्कशुद्धपणे विरोध केला व काही संचालकांचा विरोध पत्करून केवळ अभिनयगुण लक्षात घेऊन कुरूप चेहर्‍याच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला होता. ‘गिरीश कर्नाड होते म्हणून मी चित्रपट क्षेत्रात येऊ शकलो’असे उद्गार ओम पूरी यांनी काढले,हीच तर गिरीश कर्नाड यांच्या कामाची पावती होती. त्यांच्यामुळे चित्रपट सृष्टीला ओम पूरी सारखा अभिनेता लाभला,याबाबत चित्रपट सृष्टी त्यांची ऋणी राहील.

गिरीश कर्नाड कलावंत असण्यासोबतच जनपक्षीय विचारवंताचे जीवन जगले याची साक्ष्य त्यांचे एकूण जीवन व त्यांनी जगलेली मूल्ये देतात. कामरेड शरद पाटील यांची प्राच्यविद्या पंडीत म्हणून ख्याती होती. ते सुद्धा गिरीश कर्नाड यांच्या नाटकातील ऐतिहासिकतेवर चर्चा करत असत. यावरून पुराणकथा व इतिहासाचे उत्खनन करण्याचा त्यांचा आवाका लक्षात येतो. इतिहासाच्या पानांतून पुसण्यात आलेल्या पात्रांबाबतचा किंवा विकृतपणे उभ्या केलेल्या पात्रांबाबतचा त्यांचा अन्वयार्थ थक्क करणारा असे. ते आधुनिक विचारांचे असल्यामुळेच विरोधकांची पर्वा न करता टीपू सुलतानचे महत्व ते विशद करू शकत होते.

कोणत्याही राजकीय पक्षाशी जवळीक न ठेवता जनतेसाठी लढणार्‍या व लोकशाहीसाठी झटणार्‍या कार्यकर्त्यांना ते पाठींबा देत. नागपूरात अरुण फरेरा व उत्तराखंडमधून वरिष्ठ पत्रकार प्रशांत राही यांना नक्षलवादाच्या आरोपात अटक केली गेली त्या विरोधात त्यांनी सुप्रसिद्ध लेखिका महाश्वेता देवी यांचेसोबत दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती,त्याचा मी साक्षदार राहिलो आहे. पुण्याच्या कबीर कला मंचावर दडपशाही करण्यात आली तेव्हा अनेक कलावंतांनी अंतर राखले परंतु ते कबीर कला मंचाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. आपला देश आधुनिक,इहवादी व समताधिष्ठित असावा हे त्यांचे स्वप्न होते व त्यासाठी ते न डगमगता ठामपणे उभे राहत. घृणा आणि भेदभाव यांचाच उदोउदो होत असताना व दहशतवाद्यांनी प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या केल्या त्या विरोधात दहशतवाद्यांनी तयार केलेल्या यादीत त्यांचे नाव असतांनाही त्यांनी सडेतोडपणा कायम राखला होता. २०१२ साली  मुंबईतील एका मोठ्या साहित्यिक कार्यक्रमात व्ही. एस. नायपाल या परदेशी लेखकाला जीवन गौरव पुरस्काराने सम्मानीत करण्यात येणार होते. त्या कार्यक्रमात बोलताना सुमारे एक तास त्यांनी कोणतीही भीडमुर्वत न ठेवता नायपाल यांच्या भारताच्या इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या लिखाणाचा व अशा लेखकाचा सन्मान करणार्‍या आयोजकांचाही त्याच समारंभात अतिशय खरपूस समाचार घेतला होता. धर्मांध समूहाकडून अल्पसंख्यांकांच्या होणार्‍या हत्यासत्राच्या विरोधात ‘Not in my name’ असे लिहीलेली पाटी हातात धरून ते सहजपणे रस्त्यावरील आंदोलनात सहभागी झाले होते. ‘नक्षल’असल्याचे आरोप झाले की अनेक तथाकथित लोकशाहीवादी दूर जातात,परंतु लोकशाहीविरोधी शक्तींनी ‘शहरी नक्षल’ची यादी तयार करण्यासाठी,माहीत असलेल्या ‘शहरी नक्षल’ची नावे कळवण्याचे आवाहन केले तेव्हा गिरीश कर्नाड यांनी ‘Me Too Urban Naxal’ असे लिहीलेली पाटी गळ्यात मिरवली होती,हे आपण सर्व जण जाणतोच.

आपला देश इहवादी असावा,त्याने आधुनिक विचार आत्मसात करावेत,हा देश समतेच्या पायावर उभा रहावा,असे त्यांना वाटणे त्यांच्या वैचारिकतेला अगदी साजेसे होते. देशातील शैक्षणिक संस्था व विद्यापीठे यांचे भगवेकरण होणे हा त्यांना मोठा धोका वाटत होता. घृणा व भेदभाव कायम राखू पाहणारी विचारसरणी व राजकारण यांचा ते तिरस्कार करत. आज देशात सगळीकडे अंधार युगाने प्रवेश केल्याची भावना लोकांच्या मनात दाटत चालली असताना प्रकाशाचा कवडसा उघडणारे व त्यासाठी वेळ पडल्यास दोन हात करणारे प्रखर लोकशाहीवादी कलावंत आज आपण गमावून बसलो आहोत. जसजसा काळोख वाढत जाईल तसतसे गिरीश कर्नाड यांची आठवण येत राहील. या महान लोकशाहीवादी कलावंताला ‘लिफलेट’परिवारातर्फे विनम्र अभिवादन!