फेडरेशन बरखास्त करा

१९५१ साली कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिल्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजकीय परिस्थिती व पक्षांतर्गत राजकरणामुळे निराश झाले होते. पक्ष बरखास्तीचा किंवा दुसर्‍या पक्षात विलीनीकरणाचा सल्ला देण्यासही त्यांना संकोच वाटला नाही. त्यावेळची त्यांची उद्विग्नावस्था त्यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना लिहीलेल्या खालील पत्रावरून दिसून येते. त्यांच्याच हस्ताक्षरात इंग्रजीत लिहिलेले हे पत्र उपलब्ध आहे. 

 

                                                                                          २६,अलिपुर रोड,

                                                                                          सिव्हील लाईन्स,दिल्ली

                                                                                          २९-२-१९५२

प्रिय  भाऊराव,

मला तुमचे पत्र काल मिळाले. मी पी चा उल्लेख केला,ते कोल्हापूरचे पी आहेत. त्यांच्यावर चांगल्या उद्देशाने दोषारोपण करण्यात आले असेल. परंतु ते ज्यांच्याशी बोलतील,ते विरुद्ध चाल करतील. म्हणून मला तुम्ही त्यांच्याकडे केलेला उल्लेख मला आवडला नाही. ते मोरेंशी बोलतील,जे तुम्हाला माहीत आहे की ते फेडरेशनचे कट्टर शत्रू आहेत. मोरेंना आपली चाल समजली तर ते नक्कीच तिच्या विरुद्ध काम करतील. मोरेंचा माहीत असलेला दृष्टीकोण लक्षात घेता मी हे वाचून गोंधळून गेलो की तुम्ही वाघांना जास्त मतांसाठी प्रचार करण्यास सांगितले. वाघ मोरेंच्याच मताचे नाहीत का?तुम्ही त्यांच्याकडून चांगल्या अपेक्षा करू शकता. मी तुमच्यावरच सोडतो. तुम्हाला जास्त चांगले समजते.

दोन पत्रांच्या मूळ प्रती मी सोबत जोडत आहे. त्या वाचल्यानंतर कृपया त्या मला परत करा. राजभोज हे फार मोठी डोकेदुखी होणार आहेत. त्यांनी फेडरेशनमध्ये जो दर्जा प्राप्त केलेला आहे त्याकरिता खूप लोक तुम्हाला दोष देतात. ते आपल्या दर्जाचा दुरुपयोग करतील असे फक्त नाडकर्णींचेच नाही तर सर्वांचे मत आहे. कदमने मोरेंना लिहीलेल्या पत्राबद्दल,तो चौकशीचा विषय आहे. त्यांनी त्यांचा पत्ता दिला नाही. म्हणून मी त्यांना पत्र लिहू शकत नाही. परंतु तुम्ही जर मुंबईला गेलात तर त्यांच्याशी संपर्क साधू शकाल.

काहीतरी चळवळ चालू करण्याच्या विनंतीबाबत मला काही कळत नाही की तुम्हाला परिस्थिती काय आहे,हे स्पष्टपणे समजले का?जोपर्यंत आपल्या वेगवेगळ्या मतदारसंघातील निवडणुकीचे पूर्ण निकाल मिळत नाहीत,आपण पक्षाच्या (फेडरेशनच्या) भवितव्याबाबत कोणत्याही ठाम निर्णयापर्यंत पोहचू शकत नाही. मी फक्त वाटच पाहत आहे. परंतु अजूनपर्यंत माझ्याकडे कोणताही अहवाल मिळाला नाही. माझे प्रयोगात्मक निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत-

  • अनुसूचित जाती पक्षाच्या (फेडरेशनच्या) मागे किती उभ्या आहेत?
  • पक्ष (फेडरेशन) स्वतःच्या शक्तीच्या भरवशावर कोणतीही जागा निवडणुकीमध्ये जिंकू शकत नाही आणि जिंकणार नाही.
  • हे सर्व पाहता पक्ष (फेडरेशन) बरखास्त करून टाकलाच पाहिजे आणि जे अनुसूचित जातीचे लोक पक्षाचे अनुयायी आहेत त्यांना त्यांच्या आवडीनुसार कोणत्याही पक्षात जाण्याची परवानगी देण्यात यावी.
  • फेडरेशनने (शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन) /पक्षाने दुसर्‍या पक्षात सामील व्हावे,अ) ज्यांच्या कार्यक्रमामुळे अनुसूचित जातींचा फायदा होणार आहे. ब) आणि जो त्यांना पक्षांतर्गत स्वतंत्र गट म्हणून कार्य करू देईल.
  • जर फेडरेशनला स्वतंत्र पक्ष म्हणून अस्तित्वात राहायचे असेल तर त्याच्याकडे निधी पाहिजेच. यातील प्रत्येक अटही आवश्यक आहे. जर ह्यांपैकी कोणतीही अट पळण्यात आली नाही तर फेडरेशनला बंदच केले पाहिजे.

मला पक्षाच्या बाहेर राहणे आवडेल. खरोखर मला राजकारणाच्या बाहेर राहणे आवडेल. माझे स्वतःचे असे राजकीय तत्वज्ञान आहे. मी ते सहजासहजी सोडू शकत नाही. परंतु मला हे सुद्धा समजते की,माझ्या राजकीय परिणामाचा निकाल त्यांना तात्काळ फायदा देऊ शकत नाही. आपल्या लोकांची अवस्था किती वाईट आहे आणि त्यांना सुधारासाठी प्रदीर्घ वाट पाहणे किती जड जात आहे,हे समजणारा माझ्यापेक्षा चांगला कोणीच नाही.

माझा आपल्या लोकांना असाही सल्ला देण्याचा कल आहे की कम्युनिस्ट पक्षात सामील झाल्याने त्यांचा ताबडतोब फायदा होत असेल तर त्यांनी तसे करावे. शेवटचा मुद्दा तुम्ही गंभीरपणे विचार करावा असा आहे,तो म्हणजे माझी पक्षातून (फेडरेशनमधून) आणि त्याचबरोबर माझ्या राजकीय कर्तव्यातून सुटका (मुक्तता) करावी.

उमेदवारीचे अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्या ३ मार्च ते १३ मार्चमधील आहेत. मला वाटते मला स्वतःला माझा उमेदवारी अर्ज द्यावा लागेल. ह्याचा अर्थ ह्या कारणासाठी मला मुंबईला राहावे लागेल. मी कोणत्या तारखेला मुंबईला राहील हे तुम्हाला कळवीन.

आपल्या मित्रांशी व्यक्तिगत संबंध ठेवण्यासाठी मला त्यांना वैयक्तिक पत्र लिहिण्यावाचून अजून काय करता येईल माहीत नाही. जर मला तुम्ही त्यांची नावे आणि पत्ते दिले तर मी त्यांना लिहू शकतो किंवा त्यांना वितरित करण्यासाठी तुम्हाला पत्रे पाठवू शकतो. माझ्या स्वतःसाठी मी तुम्हाला इतका त्रास दिला त्याबद्दल मी दिलगीर आहे.

मंगल कामनांसह

                                                                                               तुमचं स्नेहांकित

                                                                                                  बी.आर.ए.