दिपक कुमार यांच्या तीन कविता

काल  चक्र

 

नरेंद्र मोदी

मी आणि तुम्ही

आरोपी आहोत दोघेही

फरक केवळ एवढाच

की जनतेच्या नजरेत अपराधी आहात तुम्ही

आणि मी राज्यसत्तेच्या नजरेत

अपराधाचा हा कट

जनतेविरुद्ध रचलाय तुम्ही

आणि मी तुमच्या सारख्यांच्या विरुद्ध

माझ्या विरोधात सुरू आहे सरकारी न्यायालयात खटला

आणि तुमच्या विरुद्ध जनतेच्या न्यायालयात

तुमच्या समूहाच्या इच्छेशिवाय

मला तुरुंगातून मुक्ति नाही

जनसत्ता स्थापित झाल्याशिवाय

तुम्ही येणार नाहीत तुरुंगात

हा काळाचे चक्र आहे

नरेंद्र मोदी

आज तुम्ही कायद्याने देशाचे नेते आहात

आणि त्याच कायद्याच्या नजरेत मी गुन्हेगार

(जुलै २०१४)

 

भरवसा

 

माहीत आहे

न्यायाचे जे ढोंग करताहात तुम्ही

त्याचे अखेरचे परिणाम सुद्धा

चांगलं ठाऊक आहे

भरवसा?

प्रश्नच येत नाही

तुमच्या व्यवस्थेच्या कोणत्याही अंगावर ठेवण्याचा

(फेब्रुवारी २०१४)

 

 

जबाबदारी

 

जबाबदार्‍या केवळ

पती, पिता, भाऊ, पुत्र…

असण्यापर्यंतच नसतात

एक माणूस या नात्यानं

आणखीही असतात जबाबदार्‍या

कुटुंबाशिवायच्या

एक नागरिक या नात्यानं

जबाबदार्‍या असतात

समाज, देश आणि नागरीक अधिकारांच्या

संरक्षणाच्या

एक मानव या नात्यानं

मोठी जबाबदारी असते

मानवतेच्या रक्षणाची

सत्याला सत्य म्हणण्याच्या धाडसाची

शोषण उत्पीडनाच्या विरोधाची

जुलूम अत्याचाराच्या प्रतिरोधाची

नव्या समताधिष्ठित समाज निर्मितीची

कधी कधी

मोठ्या जबाबदार्‍या निभावण्यासाठी

लहान सहान जबाबदार्‍यांना

द्यावी लागते तिलांजली

(३ एप्रिल २०१४)