भारताला नेत्यांपासून वाचवा!

सआदत हसन मंटो

 

‘देशाचे वातावरण बिघडवत असलेल्या’, ‘जनतेची दिशाभूल करत असलेल्या’, ‘प्रत्येकाचे खिसे कापत असलेल्या’, ‘ढोंग व धोकेबाजी’त रमलेल्या, ‘खूप धन जमा करीत असलेल्या’ आणि ‘चोरांचेही चोर’, ‘दरोडेखोरांचे दरोडेखोर’ नेत्यांपासून भारताला वाचवण्यासाठी आणि त्यांना सत्तेवरून दूर सारण्यासाठी ‘फाटक्या कुडत्यातील’ तरुणांना १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला या लेखात केलेले आवाहन आजही किती तरी अचूक आहे. भारत सरकार अधिनियम १९३५ मधील तरतुदींनुसार अनेक प्रांतांमध्ये काँग्रेस व मुस्लिम लीगची सरकारे बनली होती तेव्हा हा लेख लिहिण्यात आला होता.  या सरकारांनी अशी काही लूट सुरु केली होती की, ‘काँग्रेसने भ्रष्टाचाराकडे जाणारे रॉटन बरो बनवले आहेत. ज्या नावापुरत्या प्रातिनिधिक आणि लोकतांत्रिक आहेत, अशा ह्या संस्था आहेत’, असे म्हणणे गांधींनाही भाग पडले होते. (सुमित सरकार, आधुनिक भारत, १९२३, पृष्ठ ४७४)

 

[dropcap]आ[/dropcap]पण एका काळापासून ही ओरड ऐकतो आहोत, की भारताला या गोष्टीपासून वाचवा, त्या गोष्टीपासून वाचवा. परंतु वस्तुस्थिती अशी आहे, की जे अशा प्रकारची आरडाओरड करीत आहेत अशा नेत्यांपासून भारताला वाचवले पाहिजे. अशा प्रकारची ओरड करण्याच्या कलेत हे लोक तरबेज आहेत, यात कोणतीही शंका नाही. परंतु त्यांच्या हृदयात किंचितही खरे प्रेम नाही. रात्री एखाद्या सभेत जोरदार भाषण दिल्यानंतर जेव्हा ते त्यांच्या आरामदायक बिछाण्यावर झोपतात तेव्हा त्यांचा मेंदू पुर्णपणे रिकामा असतो. भारताला कोणत्या रोगाने ग्रासले आहे या विचारात त्यांच्या रात्रीचा किंचितसा भागही खर्च होत नाही. खरे तर ते त्यांच्या स्वतःच्या अडचणी सोडवण्यात एवढे गुंग  असतात की त्यांना आपल्या देशाच्या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही.

 

हे जे लोक आपल्या घरातील व्यवस्था सांभाळू शकत नाहीत, ज्यांचे चारित्र्य अतिशय खालच्या दर्जाचे असते, ते  राजकारणाच्या मैदानात आपल्या देशाची व्यवस्था चांगली करण्यासाठी व लोकांना नैतिकतेचे धडे देण्यासाठी  निघालेले असतात. ही किती हास्यास्पद बाब आहे.

 

सर्वसाधारण जनतेच्या भाषेत ज्यांना लीडर म्हटलं जाते ते हे लोक राजकारण आणि धर्माला लंगडा, लुळा-पांगळा जखमी माणूस म्हणून प्रदर्शित करतात, ज्यांचे प्रदर्शन करून आपल्या येथे भिकारी साधारणतः भीक मागतात, हे नावाजलेले नेते राजकारण आणि धर्माचे मढे आपल्या खांद्यावर घेऊन फिरतात. रेटून बोललेली प्रत्येक गोष्ट स्विकारण्याची तर साध्या भोळ्या लोकांना सवय असते. त्यांना हे नेते सांगत फिरत आहेत की या मढ्यांना ते नवजीवन बहाल करीत आहेत.

धर्म जसा होता तसाच आहे आणि तो नेहमीच तसाच राहील. धर्माचा आत्मा एक ठोस वस्तुस्थिती आहे जी कधी बदलू शकत नाही. धर्म अशी शिळा आहे जिच्यावर समुद्राच्या भयंकर लाटांही परिणाम करू शकत नाहीत. हे नेते जेव्हा आसवं गाळत लोकांना म्हणतात, की धर्म संकटात आहे तेव्हा त्यात कोणताही खरेपणा नसतो. धर्म अशी गोष्टच नाही की जिच्यावर संकट येईल. जर कोणत्या गोष्टीचे संकट असेल तर ते आपला स्वार्थ साधण्यासाठी धर्माला संकटात घालणार्‍या नेत्यांचे आहे.

देशाचे वातावरण बिघडवत आहेत आणि जनतेची दिशाभूल करीत आहेत अशा नेत्यांपासून भारताला वाचवा. तुम्हाला माहीत नाही, परंतु हे वास्तव आहे की हे केवळ नावाचे नेते आपल्या काखेत एक पेटी घेऊन फिरतात व त्यात प्रत्येकाचे खिसे कापून रुपये जमा करतात. त्यांचे जीवन म्हणजे संपत्तीच्या मागे लागलेली एक लांब स्पर्धा आहे. त्यांच्या प्रत्येक श्वासांत ढोंग आणि धोकेबाजीची दुर्गंधी तुम्ही अनुभवू शकता.

लांबच लांब मोर्चे काढून, मणावारी हारांखाली दबून, चौकांमध्ये जुमलेबाज भाषणांचे पोकळ शब्द फेकून  आपल्या समाजाचे हे नामधारी नेते केवळ स्वतःसाठी केवळ ऐशोआरामाकडे जाणारा मार्ग तयार करतात.

हे लोक देणग्या गोळा करतात. परंतु यांनी कधी बेकारीवर तोडगा सादर केला आहे? हे लोक धर्म धर्म अशी ओरड करतात. परंतु यांनी कधी धर्माच्या तत्वांची बाजु मांडली आहे? हे लोक खैरातीत मिळालेल्या घरांमध्ये राहतात. देणग्यांनी आपले पोट भरतात. जे हडपलेल्या गोष्टींवर जगतात, ज्यांचा आत्मा लुळा, मेंदू अपंग, जीभ अर्धांगवायूने ग्रस्त आणि हात पाय बधीर आहेत, ते धर्म आणि देशाला मार्गदर्शन कसे काय करू शकतात!

 

भारताला नवनवे राग आळवणाऱ्या खूप साऱ्या नेत्यांची गरज नाही. हजरत उमर यांच्यासारखा निस्वार्थीपणा  बाळगत असेल, अतातुर्क यांच्यासारखी सैनिकी भावना ज्याच्या छातीत असेल, जो पुढे येऊन देशाच्या बेलगाम घोड्याच्या तोंडाला बागा घालून स्वातंत्र्याच्या मैदानाकडे दौडत घेऊन जाईल अशा केवळ एका नेत्याची देशाला गरज आहे.

 

मस्त पैकी खाल्ले प्याले लोक देशाची सेवा करू शकणार नाहीत, हे लक्षात असू द्या. ढेरी वाढलेले पोट घेऊन देशाची सेवा करण्यास पुढे आलेल्या नेत्यांना लात मारुन बाहेर काढा. मखमली वस्त्र लपेटलेले लोक जमिनीवर झोपणाऱ्या व ज्यांच्या शरीरांना नाजूक व तलम वस्त्रांची कधी ओळखच न झालेल्या लोकांचे नेतृत्व करू शकत नाहीत. जर कोणी व्यक्ती रेशमी वस्त्र परिधान करून तुम्हाला गरीबी निवारणाबाबत सांगण्याचे धाडस करीत असेल तर तो जेथून आला तेथेच त्याला उचलून फेका.

हे नेते देशाच्या खाटेच्या फटीत घुसलेले ढेकुण आहेत. त्यांना घृणेच्या उकळत्या पाण्याच्या सहाय्याने बाहेर काढून फेकले पाहिजे. स्वतःला खूप धन जमा करता यावे यासाठी हे नेते धन आणि धनवंतांच्या विरोधात केवळ विष ओकतात.  हे धनवंतांपेक्षा नीच नाहीत काय? हे चोरांचेही चोर आहेत व दरोडेखोरांचेही दरोडेखोर आहेत. यांच्यावर अविश्वास व्यक्त करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

फाटक्या कमीजातील नवयुवकांनी उठून आणि दृढ निश्चय व आक्रोश आपल्या छातीत भरून त्या नामधारी नेत्यांना आपल्या परवानगीशिवाय चढून बसलेल्या बुलंद शिखरावरून उचलून फेकणे गरजेचे आहे. त्यांना आपल्याशी, आम्हा गरीबांशी सहानुभूती बाळगण्याचा कोणताही अधिकार नाही. लक्षात ठेवा, गरीबी ही काही घृणास्पद बाब नव्हे. जे हिला घृणास्पद बाब असल्याचे सांगतात ते स्वतःच गुन्हेगार आहेत. आपली होडी स्वतः आपल्याच हाताने वल्हवणारे हे गरीब लोक अशा श्रीमंतांपेक्षा लाखों पटीने चांगले आहेत. तुमच्या नावेचे नावाडी तुम्ही स्वतःच बनले पाहिजे. आपला फायदा व तोटा यांचा विचार तुम्हीच केला पाहिजे आणि मग ते नामधारी नेते त्यांच्या जीवनाच्या विशाल सागरात आपल्या जीवनाचे भारी जहाज कसे चालवतात ती गंमत पहा.

 

(मंटो यांच्या ‘मजामीन’ या संग्रहातील हा लेख पाटणा येथून हिन्दीतून प्रकाशित होणार्‍या फिलहाल या वैचारिक मासिकाच्या एप्रिल २०१९ च्या अंकातून साभार अनुवादीत)