भगत सिंगांचे सिद्धांत

पेरियार ई. व्ही. रामस्वामी

 

[dropcap]भ[/dropcap]गत सिंगांच्या बलिदानानंतर पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांनी त्यांच्या तामिळी साप्ताहिक ‘कुडई आरसू’च्या २९ मार्च १९३१ च्या अंकात प्रस्तुत संपादकीय लिहिले होते. त्याचे अनेक भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित झाले होते. त्यावेळच्या इंग्रज सरकारसोबतच तथाकथित देशभक्तांवर ताशेरे ओढले होते.

 

 

भगत सिंगांना फाशी  दिल्याचे  दुःख झाले नसेल असा एकही माणूस नाही. प्रत्येक माणसाने या फाशीबद्दल सरकारचा धिक्कार केला आहे.  या व्यतिरिक्त ज्यांना देशभक्त व राष्ट्रीय नेते मानले जाते त्या श्री गांधींवर टीका करीत आहेत, की त्यांनी हे सारे का घडू दिले. जेव्हा एकीकडे हे सारे घडत आहे तेव्हा दुसरीकडे हेच लोक काय करीत आहेत? ते लॉर्ड इर्विनचे अभिनंदन करीत आहेत. लॉर्ड इर्विन यांचेसोबत समझोता केल्यामुळे ते श्री गांधींचे कौतुक  करीत आहेत. हा समझोता भगत सिंगांना फासावर न चढवण्याची अट न घालता झाला, केवळ याच बाबीवर ते समाधानी नाहीत तर ते या समझोत्यास एक महत्वाचा विजय समजतात व या विजयावर आनंद साजरा केला पाहिजे असे मानतात. याशिवाय श्री गांधी म्हणतात, की लॉर्ड इर्विन एक महात्मा आहेत, व्हाईसरायला महात्मा म्हणून संबोधित करावे असे सर्वसामान्य लोकांना त्यांनी आवाहन केले आहे. लॉर्ड इर्विन गोर्‍या लोकांना श्री गांधीजी एक दिव्यत्वयुक्त एक महान विभूती असल्याचे सांगतात.

जे लोक श्री गांधींना महान नेते मानत आले आहेत, तेच आता ‘गांधी मुर्दाबाद’, ‘काँग्रेस मुर्दाबाद’ असे ओरडत आहेत. गांधी जिथे  कुठे जातात तिथे त्यांना काळे झेंडे दाखवले जात आहेत आणि गांधी ज्या सभांमध्ये भाषण देणार असतात त्या सभांना लोक अडथळे निर्माण करीत आहेत. या सर्व बाबी आता अगदी सामान्य झाल्या आहेत. आपण या सर्व बाबी जेव्हा पाहतो तेव्हा हे लोकांचे मत आहे की एखाद्या राजकीय प्रश्नाशी निगडीत तत्वाचे पालन करणे आहे, हे सांगणे कठीण आहे.

मीठाचा सत्याग्रह कशासाठी?  असो… जनतेची स्थिति काहीही असो, गांधींनी मीठाचा सत्याग्रह सुरू केला होता तेव्हा हा सत्याग्रह कोणत्याही फायद्याचा नाही, उलट हा सत्याग्रह देशाची प्रगती आणि पिडीत जनतेच्या स्वातंत्र्यास बाधा आणेल या बाबीची आम्ही सविस्तर चर्चा केली होती. ही चळवळ सुरू करण्याचा उद्देश भगत सिंगांसारख्या लोकांनी केलेल्या कार्यास उडवून लावणे व या कार्याचा प्रभाव नाहीसा करणे हा असल्याचे गांधींनी स्पष्टपणे व उघडपणे कबुल केले आहे. या बाबीव्यतिरिक्त ‘श्री गांधींनी गरीबांचा विश्वासघात केला आहे. ते ह्या सर्व गोष्टी समाजवादी सिद्धांतांना नष्ट करण्यासाठी करतात’, ‘गांधी मुर्दाबाद’, ‘काँग्रेस मुर्दाबाद’ असे आमच्या आसपासचे समाजवादी स्पष्ट शब्दात म्हणत आहेत. परंतु आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी व ‘देशभक्तां’नी या प्रतिक्रियांवर कधीही लक्ष दिले नाही. ते कधीही कोणत्याही बाबतीत फायदा व नुकसान यांचा विचार करत नाहीत, ते स्वार्थाच्या भावनेतून केवळ त्यांच्या प्रतिष्ठेविषयीच विचार करतात. जर भगत सिंग जीवंत असते तर त्यांना अशा लोकांची कृत्ये पाहून दुःख झाले असते. यापेक्षा तर भगत सिंगांनी मरण पत्करून ‘शांती’ प्राप्त केली हेच बरे. असे दुर्मिळ भाग्य मला लाभले नाही याचे दुःख आहे. एखाद्या व्यक्तीने त्याचे कर्तव्य पार पडले किंवा नाही हाच प्रश्न आहे, त्याच्या कार्याची फलश्रुती मिळाली किंवा नाही हा प्रश्न नाही. देश आणि काळ लक्षात घेऊन आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे असे आम्ही मानत असलो तरी काळ, स्थान आणि साधारण कल हे निश्चितच भगत सिंगांनी पुरस्कार केलेल्या सिद्धांतांच्या आड येत नाही असे आम्ही मानतो. भगत सिंगांनी सिद्धांतांना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याच्या पद्धतीची निवड करण्यात थोडी चूक केली असे आमच्या मनात येत असले तरी त्यांच्या सिद्धांतात उणिवा होत्या हे आम्ही कधीही मानी करणार नाही. केवळ याच सिद्धांतांनी जगात शांततेचा प्रसार होईल. भगत सिंगांचे सर्वच सिद्धांत योगी होते व जे मार्ग त्यांनी अनुसरले ते न्यायपूर्ण होते यावर जर भगत सिंगांचा दृढ विश्वास होता तर त्यांनी जे केले तेच करणे आवश्यक होते. जर त्यांनी ते केले नसते तर आम्ही त्यांना प्रामाणिक म्हणू शकलो नसतो. म्हणूनच ते एक सच्चे व्यक्ति होते असे आज आम्ही म्हणू शकतो. आज भारताला भगत सिंगांच्याच सिद्धांतांची आवश्यकता आहे, असे आमचे ठाम मत आहे.

 

सिद्धांतवादी

 

आम्हाला माहिती आहे त्यानुसार भगत सिंगांच्या सिद्धांतांनी समाजवाद आणि साम्यवाद यांचे प्रतिनिधित्व केले. या दृष्टीकोणाच्या पुराव्यादाखल आम्ही भगत सिंगांनी पंजाब प्रांताच्या गव्हर्नरला लिहीलेल्या (पत्रातून-सं) दोन ओळी पाहू शकतो. ‘जो पर्यन्त कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर येत नाही आणि लोक समतेने राहत नाहीत तो पर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील. केवळ आम्हाला संपवून याचा अंत करता येत नाही. हा संघर्ष उघड व छुप्या स्वरुपात सुरूच राहील.’

भगत सिंगांचा  ईश्वरी व दैवी व्यवस्थेवर विश्वास नव्हता. परंतु त्यांच्यात स्वतःवरचा  विश्वास भरलेला होता, असे आम्हास वाटते. अशा प्रकारचे (ईश्वरासंबंधी) विचार असणे कोणत्याही कायद्याने गुन्हा नाही. जर आसवे मानणे गिनहा असेल तरी कुणाला घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण अशा प्रकारच्या (भगत सिंगांनी पुकारलेल्या) सिद्धांतांनी कोणतीही हानी होणार नाही वा ते हानीस करणीभूतही ठरणार नाहीत. जर योगायोगाने काही हानी झालीच तर ती निरुद्देश्य असेल. कोणत्याही व्यक्तींच्या समूहाने  देशांच्या नागरिकांविरुद्ध कोणताही द्वेष न पसरवता अंतःकरणातून आपले सिद्धांत कृतीत उतरवावेत, असा आमचा प्रयत्न आहे. कोणालाही हानी न पोहचवता आम्ही आपले करी करतो, परंतु आपल्या उद्दिष्टांकरिता कठोर हालअपेष्टा भोगण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि म्हणून आम्हाला कोणत्याही गोष्टीपासून घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही.

जे तत्वज्ञान आमच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या प्रयत्नामागे आहे तेच तत्वज्ञान गरीबी निर्मूलनाच्या प्रयत्नांचा आधार आहे. अस्पृश्यता निर्मुलंनकरिता आपल्याला उच्च व नीच जातींच्या संकल्पनांचा नायनाट करावा लागेल. त्याच प्रमाणे भांडवलदार आणि कामगार या संकल्पनांचा नायनाट करावा लागेल. समाजवाद आणि साम्यवाद हे दुसरे तिसरे काहीही नसून याच संकल्पना व व्यवस्थेपासून मुक्ति मिळवणे आहे. भगत सिंग ज्याकरिता उठून उभे राहिले तो हाच विचार आहे. याच कारणामुळे जे लोक या विचारांना न्यायापूर्ण आणि योग्य मानतात ते ‘गांधी मुर्दाबाद’, ‘काँग्रेस मुर्दाबाद’च्या घोषणा देतात. जे लोक या सिद्धांतांची बाजू घेतात ते ‘गांधी जिंदाबाद’, ‘काँग्रेस जिंदाबाद’ करीत राहतात हे आश्चर्य आहे.

 

ज्या दिवशी गांधींनी म्हटले, की ईश्वर त्यांना मार्गदर्शन करतो, विश्वाचे संचालन करण्यासाठी वरणाशरम व्यवस्था एक श्रेष्ठ व्यवस्था आहे आणि जे काही घडते ते ईश्वराच्या इच्छेने घडते, त्याच दिवसापासून आम्ही गांधीवाद व ब्राम्हणवाद यांत काहीही फरक नाही या निष्कर्षाप्रत पोहचलो होतो. जो पर्यंत या तत्वज्ञानावर व सिद्धांतांवर चालणारा काँग्रेस पक्ष संपुष्टात येत नाही तो पर्यंत या देशाचे भले होऊ शकत नाही, हा निष्कर्षही आम्ही काढला होता.

 

परंतु आता ही वस्तुस्थिती किमान काही लोक मान्य करू लागले आहेत. ते गांधीवादाचा नायनाट करण्याचा प्रयत्न करू शकतील एवढे ज्ञान आणि धाडस त्यांच्यात आले आहे. हा आमच्या उद्देशाचा महान विजय आहे. भगत सिंगांना जर फाशी दिली गेली नसती तर एवढ्या लोकप्रिय पद्धतीने या विजयाचे आधार नसते. या उलट भगत सिंगांना फाशी देण्यात आली नसती तर गांधीवादाला आणखी आधार मिळाला असता, हे म्हणण्याची जोखीम आम्ही पत्करत आहोत. भगत सिंग इतरांप्रमाणे आजारी होऊन मरण पावले नाहीत. त्यांनी केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला खरीखुरी समता आणि शांतीचा मार्ग दाखवण्याच्या महान उद्देशाकरिता आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. भगत सिंग अशा एका शिखरावर पोहचले आहेत, जिथे सहसा कोणी पोहचू शकले नाहीत. आम्हाला त्यांच्या बलिदानावर अंतःकरणपूर्वक अभिमान आहे. या सोबतच आम्ही सरकारात बसलेल्या लोकांना अशी विनंती करीत आहोत, की त्यांनी प्रत्येक प्रांतातून भगत सिंगांसारखी चार सच्ची माणसं शोधावीत आणि त्यांना फासावर चढवावे.