१४ डिसेंबर २०११

[dropcap]श्री[/dropcap]रामुला श्रीनिवासन जामीनावर बाहेर पडून आता एक महिना आठ दिवस लोटलेत. रामन्नापेट न्यायालयाकडून  त्याच्यावर नवीन वारंट जारी करण्यात आले आहे. असू दे, घड्याळ बारा वाजून दहा मिनिटांची वेळ दाखवते आहे. जेमतेम रात्रीचा तिसरा प्रहर सुरु झाला आहे. म्हणजे मी खरे तर १५ डिसेंबरला लिहीत आहे. रामकृष्णा वार्डर या वेळी ड्युटीवर आहे. त्याच्या कर्तव्याचा दुसरा प्रहर नुकताच सुरु झालाय. थंडी खूप आहे. मी ग्रीन टी बनवला आणि त्याला बोलावून स्टीलच्या एका लहानशा ग्लासात त्याला प्यायला दिला. हा पिटुकला ग्लासच तेवढा बंद दाराच्या  सळाखीतून कसा तरी बाहेर जाऊ शकतो आणि तोही एका विशिष्ट जागेतून. चहा मिळाल्याने तो आनंदित झाला.

घड्याळाची टिक… टिक… आणि मधात सुमारे साडे तीन किलो मीटर पश्चिमेकडील चर्लपल्ली रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या गाड्यांचा खडखडाट…, शेजारच्या गोविंद रेड्डीच्या सेलमधील सर्र सर्र फिरणाऱ्या पंख्याचा एक नीरस व कर्कश आवाज आणि अर्धा किलो मीटर अंतरावरील फाटकाबाहेर धावणाऱ्या मोटार गाड्यांच्या भोंग्यांचे तीव्र व कर्कश आवाज किंवा मग बाजूच्या औद्योगिक वसाहतीतील कच्चा माल घेऊन जाणारी वाहने आणि कंटेनर्स यांचे संगीतमय ध्वनी….  सकाळी वारंगल न्यायालयात जायचे आहे. तेथे मी राज्यसत्तेविरुद्ध युद्ध छेडण्यास जनतेला चिथावणी देणारे भाषण दिल्याच्या आरोपात पोलिसांनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक अधिनियम (युएपीए) अंतर्गत खटला दाखल केला आहे. माझा जामीन रद्द करण्यासाठी पोलिस उच्च न्यायालयापर्यंत गेले होते, परंतु तेथेही त्यांना यश लाभले नाही. तरीही मी बंदी आहे. मी तुरुंगात असतानाच दुसऱ्या जिल्ह्यातील पोलिसांनी कट करून मी  भित्तीचित्रे व फलकांच्या माध्यमातून माओवादी विचारांचा प्रचार करण्याचे गुन्हे नोंदवून मी सुटण्याच्या शक्यताच सपुष्टात आणल्या. वारंगलच्या सत्र न्यायालयाने जामीन तर मंजूर केला परंतु माझे भाऊ जामीन घेण्यास पोहचले तेव्हा ते वारंगलचे रहिवाशी नाहीत असे सांगून जामीन देण्यास खालच्या न्यायालयाने नकार दिला. तेथून कागजनगर (तेव्हा जिल्हा आदिलाबाद व आता जिल्हा कोमाराम भीम) येथील आमच्या पिढीजात निवासस्थानी परत जाईपर्यंत साध्या वेषातील एके-74 घेतलेल्या जवळपास ३० पोलिस शिपायांनी त्यांचा उघडपणे पाठलाग केला व घाबरवण्याचे मनसुबेही जाहीर केले.

मी आता आजपुरता लेखणीला लगाम देतो, यातच भलं आहे. शुभ रात्री…

वारंगलला जाणं हे सुद्धा डीजनरेटीव डिस्कमुळे झालेल्या स्कायटीका आणि माकड हाडाच्या व मणक्याच्या आजारामुळे एक प्रकारची शिक्षाच वाटते.

१० ऑक्टोबर २०१२

 

दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत एक तास वेगाने चालतो. पाचव्या आणि सहाव्या मनोर्‍याच्या मधील  जागेत चालल्यानंतर ५७० ते ५८० पावलं होतात. दहा फेर्‍या लावल्यावर जवळपास ५८०० पावलं. आज सायंकाळी वारंगल न्यायालयातून आलो. आजही निर्णय लागला नाही. जनशक्ति पक्षाचा केंद्रिय समिती सदस्य असलेला माझा सह-आरोपी कुरा देवेन्द्र आला नव्हता. तो हजर न झाल्याने निर्णय पाच दिवस पुढे ढकलला. तो निरंतर पाच पेशींवर गैरहजर राहिला आहे. गुजरातच्या सुरतमध्येही त्याच्यावर एक खटला आहे. मला सांगण्यात आलं आहे, की याच प्रकरणात राजकीय शिक्षणाचे वर्ग चालवण्याचा माझ्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. त्या खटल्यात मला न्यायालयासमोर हजर करण्याबाबत मी अर्ज पाठवला, परंतु दोन वर्षे कोणतेही उत्तर आले नाही. (खटला दाखल झाल्यावर सात वर्षांनी मला २००७ साली नाट्यमयरीत्या कशी अटक करण्यात आली, हे नंतर कधी तरी सांगेन.) आधीच्या अर्जाच्या दीड महिण्यानंतर मी बाकायदा स्पीड पोस्टाने पुनर्विनंती पाठवली होती. कदाचित न्यायालयाला माझी पेशी गरजेची वाटली नसावी. जे काही असेल, कुरा देवेंद्रच्या गैरहजेरीमुळे लगेच परत आलो. सायंकाळी ४ वाजेपावेतो चर्लपल्लीला पोहचलो. ब्रिस्क वॉकिंग करताना पाऊल अर्धा मीटर पडत असते, अर्थात जवळपास पाच किलो मीटर चालतो. माझी चालण्याची गती सरासरीपेक्षा चांगली असल्याचे पाहणारे सांगतात. सहावा मनोरा महानदी ब्लॉकच्या अगदी समोरासमोर बनलेला आहे. संपुर्ण रस्ता एका दिशेने चढाईचा आहे. आऊटर सर्कलच्या बाहेरील भिंतीलगत जी सडक बनलेली आहे, त्या सडकेवर महानदी ब्लॉकनंतर ब्रम्हपुत्र ब्लॉक व नंतर चित्रावती ब्लॉक आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर आतील सर्कलमधील गोदावरी व कृष्णा ब्लॉकचा मागील भाग नजरेस पडतो. कृष्णाच्या मागील भागापर्यंत जाऊन परत येतो. पाचव्या मनोर्‍याच्या उंच मजल्यावर पक्षांची घरटी बनलेली आहेत. त्यांना इथे स्थानिक तेलगु भाषेत ‘मंगलीकत्ति’ असे म्हटले जाते. न्हाव्याचा वस्तरा असा त्याचा अर्थ होतो. कदाचित सरळ जोडलेल्या पंखांमुळे, त्यांचा आकार काहीसा वस्तर्‍यासारखा दिसत असल्याने असे विचित्र नाव पडले असावे. इंग्रजीत याला बार्बर रेझर म्हणावे लागेल! किच-किच करत हे पक्षी घरट्याजवळ येतात आणि लगेच फुर्रकन उडून दूर निघून जातात. त्यांचा हा खेळ अंधार होईपर्यंत चालतच असतो. हे लहानसे पक्षी थव्यात राहतात. उडताना पंखांना एक दोनदा फडकावत त्याच वेगाने काही मिनिट हवेत चिरत जातात, गरुड व गिधाडांसारखे. ग्लायडिंग करण्याचा विचार कदाचित यांना पाहूनच आला असावा.

शेकडोंच्या संख्येने ग्लायडिंग करणार्‍या अशा पक्षांना पाहिले की मुक्त होण्याची इच्छा मनात अधिकच प्रबळ होते. ए.पी.एस.पी.चे पोलिस शिपाई चार मनोर्‍यांवर पहारा देतात. एका शिपायाने पाचव्या मनोर्‍यावरून खाली पाहत माझे लक्ष वेधले आणि जोरात सलामी दिली. त्याला कदाचित अशाच पद्धतीने अभिवादन करण्याची सवय झाली आहे. साधारणपणे अभिवादनाची सवय प्रशिक्षणादरम्यान कदाचित त्याच्या स्मृतितून पुसली गेली असावी. यालाच ब्रेन वॉशिंग म्हणतात का…?

माझ्या विषयी त्याच्या मनात असलेली आदराची भावना त्याने अशा रीतीने व्यक्त केली. परंतु प्रेम, आदर, समभाव, आपुलकी या सर्वांवर रंग फासून केवळ अधिकार्‍यांपुढे आज्ञाधारकता प्रदर्शित करण्याची एकच पद्धत त्यांच्या मेंदूत कोंबण्यात आलेली आहे. या शिपायांची ड्यूटी दररोज बदलत असते. परंतु जवळजवळ सारेच आदर व्यक्त करत असतात, माझे हालहवाल विचारत असतात, हवं असेल ते देत असतात. फार साधारण लोक आहेत. केवळ काही हजारच्या वेतनाच्या आशेपोटी महिनोगणती एकाच कॅम्पमध्ये पडून राहण्यास शापित आहेत. कुटुंबापासून शेकडो मैल दूर रहावे लागते. त्यांच्या मानाने मंगलीकत्ति तरी जास्त स्वतंत्र आणि स्वछंद आहेत. २०११ साली त्यांच्या बायकांनी संप केला. त्यांच्या पतींची नेमणूक सहा महिन्यांऐवजी एका महिण्याची करावी या मागणीसाठी. शेवटी संप यशस्वी झाला.

सपडी… झडती… वाटणी…   

 

सर्वात आधी मी हे सांगितलं पाहिजे की ‘सपडी’चा अर्थ होतो, डॉक्टरच्या सल्ल्याने दिली जाणारे तेल, मीठ, तिखट नसलेले जेवण किंवा आजारी लोकांची खुराक.

तुरुंगाची आपली भाषा असते. या शब्दाचे मूळ तेलगूमध्ये आहे. तुरुंगाच्या भाषेत कैद्यांच्या राहण्याच्या बराकींची किंवा कोठडींची अकस्मात तपासणी करण्याला ‘झडती’ आणि जेवण वितरीत करण्याला ‘वाटणी’ म्हटले जाते.

मुंग्याची मोजणी करण्याची किंवा त्यांच्या धावपळीचा बारकाईने अभ्यास करण्याची मला कधी संधी मिळाली नाही, याची मला किंचितशीही खंत नाही. राजकीय कारणांनी अटक करण्यात आलेला कच्चा कैदी असल्यामुळे आणि किस्ती किस्तीने आठ वर्षांपेक्षा जास्त दिवस तुरुंगात राहिल्यानंतर देखील मानवी दुःखाकडे दुर्लक्ष करून मुंग्यांची काळजी वाहण्याचं कधी मनात आलंच नाही. इथं तर एवढी कामं आहेत की झाडाच्या सावलीत एखादा तास बसण्याची मनातील इच्छा देखील मनातच राहून जाते. एखाद्या कच्च्या कैद्याचा अर्ज लिहिण्यापासून कधी फुरसत मिळालीच तर जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना त्यांच्या चांगल्या वागणुकीखातर शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधी सुटका होण्याच्या मोहिमेत गळ्यापर्यंत बुडालेला असतो. पं. नेहरूंची गोष्ट निराळी असेल. ते मस्त पैकी मुंग्यांकडे पाहत व किती तरी पाने रंगवत. तसं तर मी १५ वर्षाचा होता होता पहिल्यांदा तुरुंगाची हवा खाल्ली होती, परंतु तो किस्सा मी आता पाटण्याच्या बेऊर ‘आदर्श कारागृहा’पासून सुरू करतो. गंगा, यमुना आणि सरस्वती सेक्टर ओलांडल्यानंतर किंवा कारागृहाच्या फाटकातून आत येऊन डावीकडील टपरी ओलांडल्यानंतर तीन रस्त्यावर गौतम बुद्धाची मूर्ती आहे,  त्याच्या डावीकडून पुढचे लहानसे मैदान ओलांडल्यानंतर आतमध्ये गोदावरी सेक्टर-४ च्या नंतर सेक्टर-५ लगतच्या डाव्या विंगेत पहिली रात्र गेली. चाळीस लोकांसाठी जागा कमीच होती. ‘माओवादी’ असल्याचा  शिक्का लागल्याने जेवण्या-झोपण्यात कोणतीही अडचण भासली नाही. शमशेर सिंग किंवा असंच काहीसं नाव होतं त्या बराकीच्या रंगदाराचं. त्याच्या देखरेखीखाली इतर मुलांनी खूप आदरातिथ्य केळे. तीन चार मुलांचे एकत्र जेवण होत असे. लॉकअप नंतर बराकीत जेवणार्‍या या चौघांच्याही वाट्यातून काढून माझ्यासाठी वेगळे ताट तयार केले गेले. संडास खरंच फार घाणेरडा असला तरी सार्वजनिक संडासापेक्षा घाणेरडा नव्हता. पैशासारखं पाणी वाहवून त्याला साफ ठेवण्याचा प्रयत्न केला जात असे. माझी झोपण्याची व्यवस्था फाटकापाशी एक दोघांनंतर करण्यात आली. मला मदत करण्यात त्यांच्यात जणू स्पर्धाच लागली होती. रात्री साडे नऊ वाजता पुन्हा एकदा कुलूप उघडलं गेलं. तुरुंगाच्या कार्यालयाजवळ (फाटकाजवळ) साठेक वर्षाचे एक सद्-गृहस्थ दिसले होते, दोन्ही वेळा. म्हणजे पोलिसांनी पहिल्यांदा जेव्हा न्यायालयात हजर करून दहा दिवसांची कोठडी मागितली आणि मजिस्ट्रेटने माझी बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न न करताच कोठडी देऊनही टाकली. दहा दिवस म्हणजे १९ सप्टेंबर २००७ ते २९ सप्टेंबर २००७ पर्यंत मला कायदेशीरपणे पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. आजच २९ सप्टेंबरच्या सायंकाळी मला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले आणि तेथून मला येथे सोपवण्यात आले. तुरुंगाच्या शिपायाने माझ्याकडील सर्व चिल्लर ठेवून घेतली आणि मला आतमध्ये एका खोलीत पाठवून दिले. तेथे एका डेप्युटी जेलरने एका ठराविक पद्धतीने माझ्या खाणाखुणा तपासल्या. माझ्या शरीरावरील तिळांचा जो तपशील पोलिसांनी न्यायालयात लिहून दिला होता, तो मिळवून पाहिला आणि या बाबी एका रजिस्टरात जे वृद्ध गृहस्थ लिहीत होते, त्यांना मी ओळखले. हे तेच बाबा होते जे आता वार्ड/बराकीत आले. पहिल्या वेळेलाही त्यांच्यासोबतच मला वैद्यकीय निरीक्षणासाठी तुरुंगात ‘टपरी’वर पाठवण्यात आले होते. डॉक्टर तर रात्रीच्या वेळेस राहत नव्हते, त्यामुळे कुण्या इसमाने मी तंदुरुस्त असल्याचा कागद लिहून दिल्याने टपरीच्या आवारात वही खाते घेऊन बसलेल्या एका जमादाराकडे (तीन पट्ट्या असलेला हेड वार्डर) आणले गेले. त्यांनी माझी ऊंची वगैरेची नोंद केली आणि मला फाटकावर परत जाण्यास सांगण्यात आले. बाबासोबतच मी पोलिस कोठडीत पाठवण्यासाठी परतलो आणि माझ्यासोबत अटक करण्यात आलेले उमेशजी उर्फ बृजमोहन राम यांना त्याच वेळी तुरुंगात ठेवून घेण्यात आले. आता थर्ड डिग्री सहन करण्याची पाळी माझ्या एकट्याच्या वाट्याला येणार होती. आज रात्री सात-आठ वाजताचे सुमारास मला तुरुंगात दाखल केले जात असताना बाबा पुन्हा दिसले होते.

असू दे, तुरुंगात पहिली रात्र पार पडलीच आणि पहाट झाली.

भल्या सकाळी ‘लॉक अप’ उघडताच पहिल्या माळ्यावरून काही आधीपासून परिचित असलेले व बहुसंख्य  अनोळखी असलेले साथी येऊन पोहचले. माझ्या भोवताल उभे झाले व आग्रहाने त्यांच्या बराकीत घेऊन गेले. मी तुरुंगात परत आल्याचे त्यांना वर्तमानपत्रातील ठळक बातम्यांवरून आधीच समजले होते. माझ्या अटकेच्या ठीक एक महिण्याआधी आश्रयदाते असलेले वार्ड सेवक आणि झारखंडचे एक शेतकरी नेते मदनजी यांच्यासह पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात अटक झालेले साथी किरण (विद्यार्थ्यांमध्ये कार्य करणारे कॉमरेड सरूण ठाकूर) या मधातल्या मजल्यावरील वार्डात होते. त्यांच्या व्यतिरिक्त माझ्यासोबतच अटक करण्यात आलेले व तिसर्‍याच दिवशी न्यायालयीन कोठडी मिळालेले साथी उमेशजी उर्फ  बृजमोहन राम तेथे असल्याने इतरांमध्ये मिसळण्यात सोयीचे झाले. मी आल्याचे माहीत झाल्याने माझ्यासाठी आधीच लुंगी, टॉवेल, एक जोड चपला, ब्रश-पेस्ट यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंची व्यवस्था करण्यात आली होती. लांब आकाराच्या हॉलच्या एका भिंतीवर मार्क्स व इतरांचे चित्र फ्रेम करून टांगलेले होते. याच्या ठीक खाली एक लहानसा टीव्ही संच ठेवण्यात आला होता. मला कॉमरेड सरूणजवळ जागा देण्यात आली. ज्या बाबत मी स्वतःच अनभिज्ञ होतो, ते वर्तमानपत्रे व टीव्हीमुळे त्या माहितीने सज्ज होते. पोलिसांनी मनात येईल त्या कथांची मालिका छापून माझ्याविरोधात माध्यमांचा परिणामकारकपणे वापर केला होता. माध्यमेही डोकं न वापरता पोलीसांनी रचलेल्या निरर्थक कथा सर्रास प्रकाशित करत असतात, हे जाणवले.

वार्डात नेत्याची भूमिका बजावण्यासाठी कम्युनने निवडून दिलेल्या ब्रजेशजींनी त्या दिवशी संध्याकाळ होण्याच्या आधीच गेटवर जाऊन माझे ‘नाव कापले’. खरे तर प्रत्येक तुरुंगात दररोज येणार्‍या नवीन प्रवेशकरी हवालाती/शिक्षा भोगणार्‍या कैद्यांना एका वेगळ्या बराकीत किंवा वार्डात ठेवले जाते. याला ॲडमिशन वार्ड किंवा ‘आफ्टर’ बराक म्हटले जाते. लॉक अपच्या वेळेनंतर न्यायालयातून परत आलेल्या कैद्यांनाही याच बराकीत ठेवले जाते. यामुळेच याला हे नाव पडले. दुसर्‍या सकाळी अधिक्षक आणि डॉक्टरांच्या ‘राऊंड’नंतर या सर्वांना वेगवेगळ्या वार्डांमध्ये पाठवले जाते. वार्डांमधील रिक्त जागा, वेगवेगळ्या अपराधी समुहांमधील संतुलन आणि आलेल्या आरोपींचा पूर्वेतिहास लक्षात घेऊन ही ‘नाव लिहीण्याची’ कवायत पूर्ण केली जाते. माओवादी, ‘लिबरेशन’ गटासारखे संसदीय नक्षलवादी आणि आनंद मोहनसारख्या सत्ताधारी वर्गाच्या ‘नेत्यां’च्या प्रकरणात हे नियमाला अपवाद असल्याचे पाहायला मिळते. आणि हो, ईदच्या आधी रोजा असणार्‍यांकरिता सुद्धा वेगळी व्यवस्था केली जाते. जेव्हा कुणी नवीन ‘माओवादी’ हवालाती कैदी तुरुंगात येतो तेव्हा नियमांनुसार त्याचेही नाव एखाद्या वार्डात लिहिले जाते. माओवादी वार्डच्या नेत्याने गेटवर जाऊन व जेलरला सांगून ‘नाव कापायचे’ असते. तेव्हा कुठे नव्याने दाखल झालेल्या सहकार्‍याला माओवाद्यांसाठी असलेल्या ‘वार्डा’त पाठवले जाते. निदान बेऊर कारागृहात तरी हीच परंपरा आहे.

….. मला कळायच्या आधीच ही प्रक्रिया पार पडली होती. १३ दिवसांच्या ‘इंटरोगेशन’चा परिणाम शारीरिक व मानसिक स्तरावर अजूनही कायम होता. ३० सप्टेंबरच्या रात्रीही पुरेशी झोप झाली नव्हती. उमेशजी तीन दिवसांच्या नरक यातनेतून सावरल्याचे दिसत होते. शेजारच्या सेक्टर-५ मध्ये सुद्धा ३० ते ४० ‘माओवादी’ किंवा त्यांचे तथाकथित समर्थक होते. त्यांच्या व्यतिरिक्तही इतर आरोपाखाली अटक केलेले काही ‘माओवादी’ इतर वार्डांमध्ये होते. तुरुंग प्रशासनाने त्यांना ‘माओवादी’ न मानल्याने एक फायदा असा झाला की ते इतर सामान्य कैद्यांसोबत राहू शकत होते आणि आपल्या मर्यादेत राहून त्यांना प्रभावित करू शकत होते. दुसरी गोष्ट अशी, की तुरुंगात कैद्यांच्या आंदोलनाची जी पार्श्वभूमी तयार होऊ लागली होती, त्यातही ते इतर कैद्यांना जोडण्याचे काम करीत होते. नळांच्या तुटलेल्या तोट्या आणि संडासांची दारे हे असे मुद्दे होते ज्यावर कैद्यांना संघटीत केले जाऊ शकत होते. लिबरेशन गटाचे सुमारे ३० कैदीही या आंदोलनात सहभागी व्हायला तयार होते. त्यांच्या एका राज्यस्तरीय नेत्यासहित दोन्ही संघटनांचे ५-५ प्रतिनिधी घेऊन एक समिति तयार करण्यात आली होती. प्रथम कैद्यांच्या सह्या घेऊन एक निवेदन अधिक्षकांना देण्यात येईल असे ठरवण्यात आले. तुरुंग प्रशासनाच्या दृष्टीने हे अनपेक्षित होते. सामान्य कैद्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मला सर्वानुमते या समितीचा संयोजक नेमण्यात आले. तुरुंग प्रशासनाची प्रतिक्रिया सुद्धा उशिरा का होईना, येणारच होती…..

तसं तर दोन तीन वार्डांमध्ये ‘माओवादी’ व त्यांचे समर्थक विखुरलेले होते, परंतु आम्ही ज्या दुसर्‍या मजल्यावरील वार्डात होतो त्या वार्डालाच माओवादी वार्डाची मान्यता होती. झडती किंवा ‘धाड’ आमच्याही वार्डाची होत असे, परंतु जेल वार्डर खालूनच ओरडत येत व सर्वांना इशारा देत असत. ते येत तेव्हा त्यांना कोणाचाही मोबाईल फोन शोधूनही सापडत नसे. माझ्या अंदाजानुसार ‘बेऊर आदर्श कारागृहा’त कोणत्याही दिवशी कैद्यांची संख्या ३३०० ते ३५०० एवढी असे तर सेल फोनची संख्या ५०० ते ६०० एवढी असे. जरी मोबाईल फोन येऊ नयेत अशी मोहीम प्रशासनाने सतत सुरू ठेवली होती. पण तो किस्सा नंतर!  सध्या ‘धाडी’चा तपशील. तर सज्जनहो, तुरुंग रक्षक काठी वाजवत येत. एकही मोबाईल न गवसण्याचे रहस्य एवढेच होते की लॉक अप होताच प्रत्येक जण त्यांचे मोबाईल प्लास्टीकच्या पिवळ्या रंगाच्या, हवा व पाणी शिरणार नाही अशा बंद पिशवीत सील करून व सुताने बांधून वार्डाच्या बाहेर टांगत किंवा अशीच एखादी युक्ति उपयोगात आणत. साधारणतः दुसर्‍या सकाळपर्यंत कुणी मोबाईलचा वापर करत नसे. मात्र शिपाई अधिकार्‍यांचा गर्व कुरवाळण्यासाठी व अहंकार जोपासण्यासाठी मातीने बनवलेल्या विजेच्या चुली घेऊन जात व दुसर्‍या मजल्यावरून फेकून तोडून टाकत. दुसर्‍या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे स्वयंपाक वार्डातील कैदी भिजवलेल्या पिठाचा गोळा देऊन जात व त्या आधीच नवीन चुली तयार झालेल्या असत, जसं काही सर्व सुरळीतच आहे….

माझे मजवे भाऊ आलोक भैय्या आणि माझ्या पाठची बहीण प्रतिमा (बुलबुल) हे माझ्या अटकेनंतर उच्च न्यायालयाच्या परवानगीने मला भेटण्यासाठी बुद्धा कॉलनी पोलिस स्टेशनला आले होते. उच्च न्यायालयाची परवानगी असतांनाही पोलिस निरीक्षक अशोक कुमारच्या हस्तक्षेपामुळे त्यांना काही अंतरावरून मला फक्त पाहू देण्यात आले. परंतु आम्हाला भेटण्याची व बोलण्याची संधी न देता पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली गेली. माझी जीवन साथी शोमा आणि मेव्हणा प्रकाश मेघे हेही पाटण्याला पोहचले होते, परंतु पोलिसांच्या कुटील चालीमुळे शोमाला परत जावे लागले. वस्तुस्थिती अशी आहे की आरोप पत्र तयार झाल्यानंतर शोमाचे नाव तिसरी आरोपी म्हणून लिहिण्यात आले. पंच साक्षदारांच्या सह्यांनंतर मुद्दाम लिहिलेले नाव आरोप पत्रात पाहता येते. सर्वोच्च न्यायालयात काम असल्याने प्रकाशही परत गेले…..

 

बेऊर तुरुंगात जामर व सेल फोन

 

मी बेऊर तुरुंगात (२००७) गेलो तेव्हा जवळ जवळ सर्वच वार्ड/ब्लॉकमध्ये मोबाईल फोनचा वापर होताना पाहिले. या बाबतीत सामान्य गुन्हेगारांपासून तर प्रतिष्ठितांपर्यंत कुणीही पवित्र नव्हते. अपवाद नव्हते. कोणत्याही सामान्य दिवशी जवळपास ३५०० कैदी या तथाकथित ‘आदर्श’ कारागृहात कोंबलेले असत. यांच्या पैकी एक तृतीयांश लोकांजवळ मोबाईल फोन जाड लोखंडी पत्रे ओलांडून नक्कीच पोहचत.

मी येण्याआधी तुरुंग प्रशासनाने एकदा कैद्यांनी स्वतःच प्राप्त केलेल्या या सोयीपासून वंचित करण्यासाठी महागडे व मोठ्या क्षमतेचे ‘प्रतिरोधक यंत्र’ लावण्यात आले. ही प्रणाली रेडियो तरंगांना आपल्या शक्तीशाली प्रतिरोधक तरंगांनी अडवते.

आधी तर तुरुंग कर्मचार्‍यांच्या वाकी टाकी बंद पडल्या. तरीही ते सुरू ठेवून संदेश वाहकांच्या माध्यमातून सूचनांची देवाण-घेवाण करण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाने घेतला. दुसर्‍याच दिवशी तुरुंगाच्या आजूबाजूच्या भागांतून शेकडो लोक तुरुंगाच्या फाटकावर येऊन थडकले. धरणे व घोषणाबाजीला कारण सर्व संकटाचे मूळ ‘रेडियो तरंग प्रतिरोधक यंत्र’ होते. आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये राहणार्‍या लोकांच्या मोबाईलपर्यंत पोहचणार्‍या संकेतांना अडवले गेले होते. दडपणामुळे प्रशासनाला ते यंत्र काढावे लागले आणि वस्त्यांमधील जनतेसोबतच कैद्यांचे फोनही खणखणू लागले….

 

[लेखक सामाजिक कार्यकर्ते, लेखक व अनुवादक आहेत.]

Leave a Comment