The Leaflet

| @theleaflet_in | July 6,2019

तारुण्य तुरुंगात व्यतीत करणेच ज्यांच्या वाट्याला आलं अशा संवेदनशील तरुणांची लेखणी त्यांच्या भावना कागदावर चितारते. कवितेतून व्यक्त होणार्‍या भावनांतून त्या व्यक्तीच्या काळजातील स्थैर्य व गांभीर्य यांचा अदमास येत असतो. खोट्या आरोपाखाली छत्तीसगडच्या तुरुंगात कैदेत असलेल्या व दिपक कुमार या नावाने कविता लिहिणार्‍या एका कामगाराच्या निवडक चारकवितांचा मराठी अनुवाद  प्रस्तुत करीत आहोत.

 

  • विकास

महाखंडांच्या पलिकडे

वातानुकूलित कक्षात बसून

गहन चिंतन अध्ययन करून

ते आमच्यासाठी योजना बनवतात

आपले शासक धन्य होऊन

त्या योजना अमलात आणतात

एका शेतकर्‍याला काय हवं

गरज काय एका कामगाराची

इच्छा काय एका सामान्य माणसाची…

याची चिंता कुणाला?

सार्‍या सल्लागार संस्था

साम्राज्यवादी वैश्विक संस्था आणि

त्यांच्या विश्वासू अनूचरांसाठी

विकास म्हणजे निव्वळ एक धंदा

ते आपल्या व देशाच्या नव्हे

खरं तर त्यांच्या विकासाच्या योजना बनवतात.

 

  • खरं तर

जे धर्माचा वापर करून

सत्ता करतात काबीज

धर्माच्या कपट कारस्थांनानी

ती टिकवू पाहतात

कोणत्याही धर्माचा देखावा करोत ते

जनतेला भुलवोत किंवा देवोत खोटी आश्वासनं

खरं तर हेच असतात

माणुसकीचे सर्वात मोठे शत्रू .

 

  • इंधन

तो शेवटचा नव्हता

आणि ना पहिलाच होता

मधल्या साखळीतील कोणता तरी भाग होता तो

परंतु जे काही होता

होता त्याच काफिल्याचा भाग

जो चालत आहे शतकानुशतके

न त्याच्यापासून सुरू झाला

न अजून संपलेला

त्याने फक्त निभावला सहभाग मधल्या काळात

करू शकत होता जेवढा प्रयत्न

त्यापेक्षाही खूप केलं त्यानं

केवळ जिद्दी धाडसीच नव्हे

धैर्यवान दूरदृष्टा होता तो

जोपर्यंत जगला

जिकिरीनं लढला युद्ध

त्या ध्येय उद्दिष्टांप्रति

जीवनभर राहिला कटिबद्ध.

नक्कीच त्याच्यातही होत्या उणिवा

एका सामान्य माणसासारख्या

तरी लोकयुद्धात ठाम राहून

आजन्म करत राहिला संघर्ष

तडजोडीपेक्षा बेहत्तर वाटायचं

जीवाची बाजी लावणं

मृत्यूही किती सुंदर मिळवला त्यानं

त्याचं बलिदान उत्तेजना नव्हती केवळ

निर्माण करून गेली एक चैतन्य

शत्रूच्या गोटात सुद्धा.

इतिहासाच्या पानांवर

नसतील ते गद्दार

आणि नसतील ते सैनिकही,

गोवलं होतं त्याला कुचक्रात ज्यांनी

लक्षात राहील केवळ तोच

मुकाबला केला ज्यानं

मृत्युचाही दिलेरीनं.

मृत्युच्या मालिकेनं

थांबत नाही जीवनाची तर्‍हा

शूर प्रेरणा घेत असतात

अशाच व्यक्तिमत्वांकडून

तो नव्हता अंत

आणि ना आरंभही

ना त्याच्यापासून सुरू झाला

ना अंतही

जनसंघर्षात अशी बलिदानंच

इंधनाचं काम करतात

भावी पिढ्यांसाठी.

 

  • मी संघर्षरत जनता

दगड भाल्यांपासून तर अॅटम बाँबपर्यंत

भोगलं आहे मी

तरीही हुकुमशाही अन्यायाला

प्रत्येकदा मागे सारलंय मी

तुझी काय बिशाद अंकल सॅम

तुझ्यासारख्या कित्येक हिटलर मुसोलिनींना

लाथाडलंय मी

सुर्य कधीही न मावळणार्‍या

गोर्‍यांनाही काठावर ढकललंय मी

तुझ्यासारखे कित्येक आले

दारुगोळा आणि काय काय घेऊन

माझ्यावर बरसवलेत

साम दाम दंड भेदाचे

किती तरी डावपेच अजमावले

तरीही त्यांना माझ्या शक्तीनं हाकललंय मी

अजूनही माझी आशा निद्रा पावलेली नाहीय

गमावला नाहीय मी उत्साह

आजही संघर्षरत आहे

जगाच्या दूरदूरच्या कानाकोपर्‍यात

तो दिवस दूर नाहीय

संघटीत शक्तीनं तुला पराभूतच करणार नाहीय केवळ

धरित्रीच्या याच तुकड्यावर तुला जीवंत गाडेन सुद्धा.

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of