सूडबुद्धीने हल्ले ही तर ब्राम्हणी प्रवृत्ती !

प्रसिद्ध सामाजिक व मानवाधिकार कार्यकर्त्या आणि पत्रकार तिस्टा सेटलवाड आणि त्यांचे पती पत्रकार जावेद आनंद यांच्या मुंबई येथील निवासस्थानी व कार्यालयावर केंद्रीय गुप्तचर खात्याने काल धाड टाकल्याचे ताजे वृत्त आहे. अशीच धाड परवा सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील आणि माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल इंदिरा जयसिंग यांच्यासह त्यांचे जोडीदार व सर्वोच्च्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आनंद ग्रोवर यांच्याही मुंबई व दिल्ली येथील निवासस्थानी व कार्यालयांवर धाडी टाकल्याचे वृत्त आहे. ही दोन्ही दांपत्ये आणि त्यांच्या संस्थांनी मिळालेल्या पैशाचा गैरवापर केल्याची सबब पुढे करून या धाडी टाकल्या गेल्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई मोदी सरकारने सूडबुद्धीने केल्याची चर्चा आहे. सीबीआय ही संस्था सत्ताधार्‍यांच्या सोनेरी पिंजर्‍यातील पोपट असल्याचे म्हटले जाते. ती गृहमंत्र्याच्या ईशार्‍यावर नाचत असते. अशा संस्थेचा वापर सत्ताधारी नेहमी आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी करत असतो. अशी कृत्ये यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या सरकारने सुद्धा केली आहेत,पण ते राजकारणाच्या वर्तुळापर्यंत मर्यादित होते. मात्र आता भाजपचे मोदी सरकार त्या परिघाबाहेर जाऊन भूमिका बजावत आहे.

या सत्रात मोदींनंतर त्यांच्या मंत्रीमंडळात दुसर्‍या क्रमांकाचे महत्वपूर्ण पद गृह मंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे. मोदी-शाह ही जोडगोळी गुजरातच्या दंगलीपासून कुख्यात झालेली आहे. या जोडीच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतली,अशांचा सुड या जोडीकडून उगविला गेल्याचे जाणकारांकडून बोलले जाते. त्यातून तिस्टा सेटलवाड आणि ॲड. इंदिरा जयसिंग यांच्याविरुद्ध असे धाडसत्र अवलंबिल्या गेल्याचे बोलले जात आहे. तिस्टा सेटलवाड ह्या एक सुप्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. देशात जिथे कुठे दलित,मुस्लिम,आदिवासी,श्रमिक या जाती-वर्गातील लोकांवर अन्याय अत्याचार होतो,अशा ठिकाणी धावून त्या पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. २००६ साली खैरलांजी भोतमांगे वंशसंहार प्रकरण घडून आले होते,तेव्हाही त्या तिथे धावून आल्या होत्या. गुजरातमध्ये २००२ च्या सुमारास ज्या धार्मिक दंगली घडवून आणल्या गेल्या होत्या,त्यातील पीडितांची बाजू घेऊन त्यांनी न्यायालयीन लढाई प्रारंभली होती. या दंगलीची चौकशी करणार्‍या तेव्हाच्या विशेष तपास पथकाने तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री आणि सहकार्‍यांना ‘क्लीन चीट’दिली होती,याविरुद्ध भूमिका घेऊनतिस्टा सेटलवाड यांनी न्यायालयीन लढाई चालवलेली होती. अशी मोदी-शहाविरुद्ध त्यांची भूमिका राहिली होती. इंदिरा जयसिंग यांची भूमिकाही काहीशी तिस्टा सेटलवाड यांच्यासारखीच पीडितांना न्यायालयीन मदत करणारी राहिलेली आहे. मागासवर्गीयांच्या अनेक न्यायालयीन प्रकरणात त्यांनी निशुल्क बाजू लढविल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांची ही भूमिका संघ परिवाराच्या ब्राम्हण्याविरुद्ध राहिल्याचा समज आहे. अलिकडे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर एका कार्यालयीन कर्मचारी महिलेने लैंगिक छ्ळाचा आरोप केला होता,अशा प्रकरणात त्या महिलेची बाजू घेऊन धाडसाने बाजू घेऊन लढणार्‍या ॲड. इंदिरा जयसिंग ह्या होत्या. त्यांचे जोडीदार ॲड. आनंद ग्रोवर हे सुद्धा प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्वास्थ अधिकाराचे विशेष दूत राहिलेले आहेत तर ॲड. इंदिरा जयसिंग यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्यामहिलाविरोधी भेदभाव निर्मूलन समितीतही कार्य केलेले आहे. अशा दलित,पीडित,शोषित,श्रमिक यांची बाजू घेऊन संवैधानिक मूल्यांवर लढणार्‍या (तिस्टा सेटलवाड व ॲड. इंदिरा जयसिंग) या दोन परिवारांना संघ परिवार आपल्या आचार-विचारविरोधी दृष्टीने बघतो. हा भेद उभयंतात लपून राहिलेला नाही.

जी जी व्यक्ति व संस्था येथील प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढते,दलित-मुस्लिम,आदिवासी व मागासवर्गीयांची न्याय्य बाजू घेते,अशा भूमिकेतील व्यक्ति व संस्था या संघ परिवाराला आपल्या ब्राम्हणी आचार-विचार व तत्वांविरुद्ध असल्याचे वाटत आले आहे. अशी त्यांची शत्रूत्वाची भूमिका आजपासूनची नाही. त्याचा प्राचीन काळापासूनचा मोठा इतिहास राहिला आहे. या इतिहासात जाण्याची आता गरज राहिलेली नाही. या इतिहासाची जवळपास बर्‍याच प्रबुद्ध लोकांना कल्पना आहे. या संघर्षाचा इतिहास बुद्धाच्या काळापासूनचा आहे. याचे कारण म्हणजे ब्राम्हणांनी जन्माच्या आधारावर स्वतःला गृहीत धरलेली वर्ण श्रेष्ठत्वाची मानसिकता म्हणता येईल. त्याचे मूळ हे मनुस्मृतीत दडले आहे. मनुस्मृतीने ब्राम्हणांना पृथ्वीवरील भूदेव म्हणून सर्वात श्रेष्ठ आणि सर्वाधिकारसंपन्न ठरविले आहे. या संदर्भात मनुस्मृतीत असे म्हटले गेले आहे की, ‘ब्राम्हणांचा जन्म सर्वप्रथम आणि ब्रम्ह्याच्या मुखातून झाल्यामुळे व वेदांना धारण केल्यामुळे तो संपूर्ण जगाचा स्वामी आहे.’अशा प्रवृत्तीविरुद्ध बुद्धाचा संघर्ष होता. तो त्यांच्या पश्चात सम्राट अशोकाने चालवला. त्यामुळे सम्राट अशोकांचा नातू बृहद्रतची पुष्यमित्र शृंगाच्या मदतीने हत्या करून ब्राम्हणांनी मौर्य राजवट उलथून लावत ब्राम्हणशाही प्रस्थापित केली. असा जय-पराजयाचा इतिहास ब्राम्हणांचा व्यवस्था परिवर्तनवाद्यांशी राहिलेला आहे. याचे अनेक दाखले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथातून देशाच्या इतिहासाचे सिंहावलोकन करताना दिलेले आहे. ब्राम्हण म्हणतात की, ‘ब्रम्हाने शुद्रांना अर्थात मागासवर्गीय बहुजनांना केवळ एकच कार्य करण्याचा आदेश दिलेला आहे,तो म्हणजे इर्षारहित होऊन वरील तिन्ही वर्णांची सेवा चाकरी करणे. शुद्रातिशुद्रांना या कर्तव्याचे कठोरपणे पालन करण्यासाठी आणि ब्राम्हणविरोधी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी राजाची निर्मिती केली आहे.’मनुस्मृतीतील एक श्लोक म्हणतो, ‘आपआपल्या धर्मामध्ये निष्ठा ठेवून आचरण करणार्‍या सर्व वर्ण व आश्रमांच्या रक्षणासाठी ब्रम्हाने राजाची निर्मिती केली.’

याविरुद्ध बंड करणार्‍यांना राज्यसत्ता कशी सहन करणार?केंद्र आणि राज्याराज्यात संघ परिवाराची सरकारं आहेत. याविरुद्ध बंड म्हणजे बंडखोर व्यक्ती आपल्या सामर्थ्याने श्रेष्ठ ठरणे होय,असेही मनुस्मृतीत कथन करण्यात आले आहे. तसे आव्हान उभे राहू नये,म्हणून जी जी व्यक्ती ब्राम्हण्यवादी व्यवस्थेच्या विरोधात गेली,त्याला त्याला देशोधडीला लावण्याचे काम संघ परिवाराने पद्धतशीरपणे केले आहे. एटीएस प्रमुख हेमंत करकरे,डॉ. दाभोळकर, ॲड. पानसरे,प्रा. कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश अशा व्यक्तींच्या हत्येमागे संघ परिवाराला संशयाने बघितले जाते. अशाच प्रकारे सत्तेचा आधार घेऊन बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचा बंदोबस्त करण्यात आला. कारागृहातच त्यांची हत्या करण्याचा प्रधानमंत्री मोदी यांचा कट होता,असा दावा सीबीआयच्या माजी प्रमुखाने केलेला आहे. याचे कारण म्हणजे लालूप्रसाद हे मागासवर्गीयांच्या हिताची गोष्ट करतात. अशीच भाषा अखिलेश यादव आणि मायावती देखील करतात. या दोघांच्या मैत्रीचा काट्याने काटा काढल्याचा दावा अटलबिहारी बाजपेयी यांनी लखनऊतील विश्राम गृह कांडाची आठवण करताना केली होती. मोदीविरुद्ध भूमिका घेतल्यावरून गुजरातमधील ज्येष्ठ पोलिस अधिकारी संजीव भट्ट यांचा काटाही एका तीस वर्षे जुन्या प्रकरणातून काढला गेला.

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री भगवाधारी योगी आदित्यनाथ यांच्या रूपाने धर्मसत्ता प्रस्थापित झाल्याचे भासविले गेले तर महाराष्ट्रात देवेंद्रपंत फडणवीस यांच्या रूपाने नवी पेशवाई अवतरलेली आहे. असे संघ परिवारकडून अप्रत्यक्ष जाहीर करण्यात आले. उत्तर प्रदेशात प्रशांत कनोजिया या ओबीसी समाजातील तरुण पत्रकाराने योगी आदित्यनाथ यांच्या प्रेमात पडलेल्या एका महिलेची चित्रफीत समाज माध्यमांवर टाकली म्हणून त्याला विविध गुन्ह्यात अटक केली गेली. त्या अगोदर शपथ विधी घेऊन मुख्यमंत्री पदाची सुत्रे स्वीकारताना योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला ब्राम्हणी परंपरेनुसार ‘पवित्र’केले होते. कारण की,यापूर्वी या कार्यालयात मायावती व अखिलेश यादव यांसारख्या शूद्रातिशुद्रांचा वावर राहिला होता. तो वावर ब्राम्हणी धर्मानुसार ‘अपवित्र’होता.

महाराष्ट्रातील व देशातील नव्या पेशवाईला त्यांच्या शनिवारवाड्यावरून आव्हान देण्याचा प्रयत्न चालविला म्हणून भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पूर्व संध्येला एल्गार परिषद घेणार्‍या लोकांचा संबंध भीमा कोरेगाव दंगलीशी जोडून त्यांना अटक करण्यात आली. दक्षिणेतील चित्रपट सृष्टीतील ‘कबाली’व ‘काला’या बहुचर्चित सामाजिक चित्रपटांचे दिग्दर्शक पा रणजीत हे ब्राम्हणी राज्यव्यवस्थेविरुद्ध बोलले म्हणूण मक्कल काची या ब्राम्हणवादी संघटनेच्या नेत्यांनी तमिळनाडूतील थिरुपमंडल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

रामायणात शंबुकाचा वध तर महाभारतात एकलव्याचा अंगठा कापल्याचे दृष्टांत हे शुद्रातिशुद्रांना दिले गेलेले ब्राम्हणी धडे आहेत. ते आज मोदीचे सरकार लोकशाहीची झूल पांघरून अमलात आणीत आहे. त्यातूनच तिस्टा सेटलवाड आणि ॲड. इंदिरा जयसिंग यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न होत आहे. मोदी हे सत्तेतील मुखवटा आहेत. त्यांच्या मागे कार्य कर्तव्य हे संघाचे आहे. संघाचे उद्दीष्ट हे हिंदुत्वाची आड घेऊन बहुसंख्यांक शुद्रातिशुद्रांना भुलथापा देत आपले ब्राम्हणी राष्ट्र उभारण्याचे आहे. ते मनुस्मृतीवर अधिष्ठीत राहणार आहे. त्याचे संकेत या पाच वर्षांच्या मोदी राजवटीदरम्यान संघ परिवाराची राहिलेल्या भूमिकेतून मिळतात. ही आक्रमकता सूडबुद्धीची ब्राम्हणी प्रवृत्ती होय. ही प्रवृत्ती कालसापेक्ष असते हे समजून घेणे आवश्यक आहे.

 

लेखक बहुजन चळवळीतील कार्यकर्ते व दैनिक जनतेचा महानायक या वृत्तपत्राचे संपादक आहेत.