पृथ्वीवर येऊ घातलेले संकट– भाग १

प्रस्तुत लेख हा पर्यावरण तज्ञ व अमेरिकेतील नासा गोडार्ड इंस्टिट्यूट ऑफ स्पेस स्टडीजया संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. जेम्स हॅन्सेन यांनी लिहीलेल्या माझ्या नातवंडांपुढील वादळेया पुस्तकाचा सार आहे.  

“ज्या प्रमाणे एका माणसाची दुसर्‍या माणसावरील मालकी अन्यायी व अनैतिक आहे,त्याच प्रमाणे कोणतीही एखादी व्यक्ति वा समाज वा देश या पृथ्वीवर स्वतःची मालकी निर्माण करू शकत नाही. आपण सर्व (लोक) काही काळापर्यंत या पृथ्वीवर कार्यरत असतो. म्हणूनच प्रत्येक पिढीचे हे कर्तव्य आहे की ही पृथ्वी अधिक चांगल्या पर्यावरणीय परिस्थितीत पुढच्या पिढीला उपलब्ध करून दिली पाहिजे.” – कार्ल मार्क्स

१)      ज्या पृथ्वीवर नागरीकरण विकसित झाले,ज्या पृथ्वीवरची हवामान पद्धती आपणास माहीत आहे व पृथ्वीवर स्थिर असलेले समुद्र काठ आपणास ज्ञात आहेत- अशी सुर्य मालिकेतील ग्रह असलेली पृथ्वी लवकरच संकटात अडकणार आहे.

२)     सातत्याने सुरू असलेल्या फोसिल (कोळसा,पेट्रोल व नैसर्गिक वायू या सर्वांना मिळून फोसिल इंधन असे म्हणतात.) इंधनाच्या वापरामुळे असा धक्कादायक निष्कर्ष निघतो की या पृथ्वीवरील केवळ इतर दश लक्ष प्रजातीच नव्हे,तर खुद्द मानवाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे व आपणास वाटत होते त्यापेक्षा किती तरी कमी वेळात हे घडणार आहे. आपणास माहीत आहे की मंगल व शुक्र या ग्रहांवरील हवामान कार्बन डायऑक्साईड या वायुमुळे ठरवले जाते.

३)      जिथून परत मागे जाता येणार नाही असा टप्पा आता जवळ येत असल्यामुळे आणीबाणीची स्थिति निर्माण झाली आहे. या टप्प्यानंतर असे बदल हवामानात घडतील की जे मानवी नियंत्रणाच्या बाहेर असतील व म्हणून आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.

४)     सरकारी लबाडी- सर्वच सरकारे जागतिक तापमान वृद्धीबाबत आपली काळजी व्यक्त करतात,पण हवामान स्थिर राहण्याकरिता आवश्यक असलेल्या योग्य कृती अमलात आणत नाहीत.

५)     हवामान प्रेरकाची व्याख्या– जागतिक हवामानातील होणार्‍या बदलास कारणीभूत असणार्‍या ग्रह कार्यशक्तीच्या समतोलावर परिणाम करणार्‍या त्रासास हवामान प्रेरक असे म्हणतात. या घटकाची मोजणी वॅट्स प्रती चौरस मीटर या मापात केली जाते. उदा. जर सुर्य १ टक्का अधिक प्रखर झाला तर २ वॅट्स एवढा हवामान प्रेरक कार्यरत झाला असे म्हणता येईल. (या पुढे प्रती चौरस मीटर हे शब्द वॅट्सच्या संदर्भात वगळले जातील.) पृथ्वी प्रत्येक दिवस व रात्र सरासरी २४० वॅट्स एवढा सुर्यप्रकाश शोषून घेते. १९९१ साली फिलीपाईन्स मधील पिनाटूबा या पर्वताच्या ज्वालामुखीतून जे एअरोसोल (कण) निर्माण झाले,त्यामुळे पृथ्वीची सुर्यामुळे होणारी तापमान वाढ २ टक्क्यांनी कमी केली होती. म्हणजे सुमारे ४ वॅट एवढे नकारात्मक हवामान प्रेरक त्यामुळे कार्यरत झाले होते. दोन वर्षाच्या अल्प काळात हे एअरोसोल वातावरणातून बाहेर पडले होते.

६)      मानवी कृतीमुळे सर्वात जास्त परिणाम ग्रीनहाऊस वायु म्हणजेच हरितगृह वायु या प्रेरकाद्वारे होतो. हे असे वायु आहेत की जे इन्फ्रारेड रेडिएशन अंशतः शोषून घेतात. म्हणून त्यांच्या वातावरणात वाढलेल्या प्रमाणामुळे या इन्फ्रारेड वेव्हलेंथच्या रेडिएशनला वातावरणात उंच जागी अडवले जाते व या उंच जागी हवामान थंड असल्यामुळे जी उष्णता परावर्तीत केली जाते त्यापैकी काही उष्णता वातावरण तप्त करण्यास कारणीभूत ठरते व त्यामुळे ग्रहावरील कार्यशक्ती (एनर्जी बॅलन्स) समतोल नाहीसा होतो. पृथ्वी जेवढी कार्यशक्ती शोषून घेते त्यापेक्षा कमी कार्यशक्ति  परावर्तीत करते आणि त्यामुळे पृथ्वी अधिक तप्त होते. आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण मानवी कृतीमुळे १७५० साली (म्हणजे औद्योगिकरण सुरू होण्यापूर्वी) जे २८० पीपीएम (दहा लाख एकूण कणांमधील प्रमाण) होते ते २००९ साली ३७८ पीपीएम झाले. आता हे स्पष्टपणे समजून आले आहे की ३८७ पीपीएम हे प्रमाण धोकादायक पातळीच्या पुढे गेले आहे.

७)     हे अतिशय महत्वाचे आहे की मानवापुढील महाविनाशकारी संकटे टाळण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ३५० पीपीएम एवढे तरी कमी केले पाहिजे. अन्यथा शेकडो वर्षाच्या काळात बर्फाचे डोंगर वितळण्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी अतिमतः २५० फूट एवढी वाढेल,यामुळे किनार्‍यावरील मानवी वस्ती संकटात सापडणार आहे. शिवाय दुष्काळ,अतिवृष्टी,१७५० सालाशी तुलना करता तापमानात २ डिग्री सेंटीग्रेड एवढी वृद्धी आणि महाभयंकर अशी वादळे,हिमवादळे,तूफान निर्माण होतील. या सर्वांमुळे येणार्‍या पीढीस जगणे अशक्य होणार आहे.

८)      सुर्याभोवती होणारे वर्तुळाकार भ्रमण व ज्वालामुखींमुळे निर्माण होणार्‍या हवामान प्रेरकांद्वारे जे बदल तापमानात होतात ते हरितगृह वायूंमुळे होणार्‍या बदलांच्या तुलनेत फार कमी आहेत.

९)      २०,००० वर्षांपूर्वी जे मोठे बर्फमय शीत युग आले होते,तेव्हा पृथ्वीवरील सरासरी तापमान आताच्या तापमानापेक्षा ५ डिग्री सेल्सियस एवढे कमी होते. हे स्पष्ट आहे की छोट्या बर्फमय काळातील (सुमारे १६०० ते १८५० सालापर्यंतचा कालखंड किंवा १२५० ते १८५० पर्यंतचा कालखंड) तापमान वृद्धीशी तुलना करता गेल्या काही दशकातील मानवी कृत्यांमुळे झालेली तापमान वृद्धी खूप जास्त आहे.

१०)    वातावरणातील कार्बन डायऑक्साईडची वृद्धी दर वर्षास सरासरी १.७ पीपीएम एवढ्या वेगाने विसाव्या शतकाच्या शेवटी होत होती. त्या वृद्धीची वार्षिक वाढ २०५० सालापर्यंत १.३ पीपीएम एवढी कमी करणे शक्य झाल्यास पर्यायी परिस्थिति अस्तित्वात आणणे शक्य होऊ शकणार आहे.

११)    जागतिक तापमान वृद्धी थांबवणे अजूनही शक्य आहे,पण त्यासाठी आवश्यक त्या बाबी त्वरेने पुर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य आवश्यक आहे. असे केले तर मानवी स्वास्थ्य,कृषि व पर्यावरण या घटकांसाठीही अधिक फायदे होऊ शकतील.

१२)    वातावरणीय व्यवस्था किती संवेदनशील आहे याबाबत आपणास वातावरणाच्या इतिहासावरून माहिती प्राप्त होऊ शकते आणि लक्षात येते की अगदी छोट्याशा हवामान प्रेरकाबाबत सुद्धा हवामान प्रचंड संवेदनशील असते.

१३)    समुद्राची पाण्याची पातळी २०,००० वर्षापूर्वी आजच्यापेक्षा ३५० फूट खाली होती व त्यामुळे आताच्या उपखंडाच्या कडा त्यावेळी अधिक उघड्या होत्या.

१४)    शारीरिकदृष्ट्या आधुनिक मानवाचा सर्वात जुना पुरावा आफ्रिकेतील १,३०,००० वर्षापूर्वीच्या जीवाश्माद्वारे उपलब्ध आहे. अर्थात होमो सेपियन्सचा (मानव सदृश्य प्रजाती) उदय २ लाख वर्षापूर्वी झाला आहे. सुरूवातीचे हे मानव इमीयन नावाच्या दोन शीतयुगांच्या मधल्या काळात (सुमारे दीड लाख वर्षापूर्वी) जीवन जगले होते.हा इमीयनचा कालखंड आताच्या दोन शीतयुगांच्या मधल्या काळापेक्षा म्हणजेच होलोसिन कालखंडापेक्षा किंचितसा गरम होता. तरी सुद्धा इमीयन कालखंड अगदी आताच्या काळापेक्षा एक डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी गरम होता व म्हणून धोकादायक जागतिक तापमानवृद्धीच्या संदर्भात ही माहिती खूप महत्वाची आहे.

१५)    खरं म्हणजे समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये बदल न घडल्यामुळे मानवी समाजाचा विकास अधिक गुंतागुंत असलेल्या समाजात होत गेला. या आधुनिक गुंतागुंत असलेल्या मानवी समाजामध्ये अन्नधान्य उत्पादन एवढे अधिक असावे लागते की ज्याद्वारे अन्नधान्य उत्पादन न करणारे समाजातील विभाग सुद्धा जगू शकतील. म्हणुनच जेव्हा ६०००  ते ७००० वर्षांपूर्वी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत जाणे अतिशय कमी झाले,तेव्हाच अनेक खंडांवर अधिक मानवी वस्ती असलेली केंद्रे (शहरे) उदयास आली. या आधी समुद्राची पातळी अनेक हजारो वर्षे सातत्याने दर १०० वर्षास एक मीटरपेक्षा अधिक गतीने वाढत गेली होती. परंतु आता समुद्राची पातळी स्थिर असण्याचा कालखंड संपुष्टात येऊ लागला आहे.

१६)    प्रकाश किरण परावर्तीत करण्याच्या पृथ्वीच्या पृष्ठीय क्षमतेवर आणि पृथ्वीवरील हरितगृह वायूच्या आकारमानातील बदलावर हवामानातील बदल जवळ जवळ  पुर्णपणे अवलंबून असतात. म्हणून नैसर्गिक प्रक्रियेद्वारे पृथ्वी पुढील शीत कालखंडाकडे प्रवास करेल असा विचार करणे हा शुद्ध मुर्खपणा आहे.

१७)   या आधीच्या दोन शीत कालखंडाच्या मधल्या काळात (उदा. इमीयन) वातावरण फक्त एक डिग्री सेल्सियसने अधिक गरम होते व तरी सुद्धा समुद्राची पातळी त्यावेळी आतापेक्षा चार ते सहा मीटर एवढी जास्त होती.

१८)    वकीलास सत्य जाणून घ्यायचे नसते,त्याला फक्त  आपल्या अशीलासाथी विजय प्राप्त करायचा असतो.

१९)    राष्ट्राध्यक्षाने हवामानाबाबत सल्ला मागितला तेव्हा उत्तर म्हणून अकॅडेमी ऑफ सायन्सने जो अहवाल त्यांना दिला व ज्या अहवालाबाबत शास्त्रज्ञ लिंडझेन यांनी आपली नाराजी व्यक्त केली,त्या अहवालातील मजकूर वाशिंग्टनच्या व्हाईट हाऊसला अपेक्षित नव्हता. राष्ट्राध्यक्ष बुश यांनी आपल्या उरलेल्या ८ वर्षाच्या काळात या अकॅडेमीला हवामानाबाबत पुन्हा कधी सल्ला विचारला नाही.

२०)    हवामानाचे  जडत्व (इनर्शिया) व हवामानाची वृद्धीत होणारी प्रतिक्रिया या दोन घटकांमुळे भावी पिढ्यांसाठी मोठा धोका निर्माण होतो व विशेषतः जेव्हा मानवी लोभामुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वेगाने वाढत जाते तेव्हा तर धोका जास्तच वाढतो. या घातक धोक्याबाबत जनतेमध्ये काही जागृती नाही याबाबत आश्चर्य वाटू नये.

२१)    जेव्हा फोसिल इंधन जाळले जाते तेव्हा एकाच वेळेस ग्रीनहाऊस वायूमुळे तापमानात वृद्धी होते,तर याच ज्वलनातून निर्माण झालेल्या एअरोसोलमुळे तापमानात घट होते. परंतु कधी ना कधी फोसिल इंधनाचे साठे संपुष्टात येतील किंवा वाढणार्‍या वातावरणीय प्रदूषणामुळे जनता अति त्रस्त होईल. ग्रीनहाऊस वायु अनेक शतके वातावरणात आहे तसेच राहत असतात. पण एअरोसोलची उत्पत्ति बंद झाल्यावर काही दिवसातच हे एअरोसोल वातावरणातून नष्ट होतात व याद्वारेच जागतिक तापमानवृद्धी वेगाने घडून येईल.

२२)   हरितगृह वायुंमुळे हवामान प्रेरक ३ वॅट्स एवढी वृद्धी करतात. परंतु एअरोसोलमुळे हवामानातील प्रेरक उणे ३ वॅट्स ते जवळ जवळ शून्य या आवाक्यात परिणाम (नकारात्मक) घडवून आणतात. जर एअरोसोलमुळे उणे एक वॅट एवढा परिणाम घडत असेल तर वातावरण निव्वळ प्रेरक परिणाम २ वॅट एवढा होईल व मानवजातीने हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी अर्ध्या प्रमाणात एअरोसोलचे कण हवेत जाऊ दिले नाहीत तर तेव्हा निव्वळ प्रेरक परिणाम  २ वॅट्स ऐवजी २.५ वॅट्स एवढा वाढेल. परंतु जर एअरोसोलमुळे उणे दोन वॅट्स एवढा प्रेरक परिणाम घडून येत असेल व मानवजातीने एअरोसोलची निर्मिती अर्ध्याने कमी केली तर निव्वळ प्रेरक परिणाम दुप्पट झालेला असेल. या वाढलेल्या ग्रीनहाऊस वायु व प्रेरक परिणामांमुळे या ग्रहाचा परत न फिरू शकणारा टप्पा पार केला जाईल व महाविनाशकारी संकटे या पृथ्वीवर लादली जातील. आताच अगदी अल्प हवामान प्रेरकाच्या परिणामी जगातील  पर्वतांच्या माथ्यावर असलेले बर्फाचे साठे वितळू लागले आहेत. परिणामी गोड्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ लागला आहे,वाढत्या प्रमाणात आगी व पूर उदयास येत आहेत. उत्तर ध्रुवावरील बर्फाचे साठे कमी होऊ लागले आहेत व  समुद्राची पातळी वाढू लागली आहे.

लेखक पर्यावरण आणि मार्क्सवाद या विषयाचे अभ्यासक असून त्यांनी कित्येक आंतरराष्ट्रीय लेखकांची पुस्तके अनुवादीत केली आहेत. त्यांची अनेक स्वरचित पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.