न्यायालय एक ढोंग आहे

– भगत सिंग व त्यांचे सहकारी

 

भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयीन कामकाजात भाग न घेण्याचा राजकीय निर्णय घेतला होता. परंतु न्यायालयाच्या मंचाचा वापर त्यांनी इंग्रज न्यायालयांचे ढोंग उघडे पाडण्यासाठी मोठ्या खुबीने केला. त्या काळातील व आताच्या काळातील न्यायव्यवस्थेचा स्वभाव व गुणधर्म यातील साम्य आणि भेद समजण्यासाठी भारतातील क्रांतिकारकांची त्या काळातील ही भूमिका वाचकांच्या नक्कीच उपयोगी पडेल.

कमिश्नर,

विशेष न्यायाधिकरण,

लाहोर कट खटला,  लाहोर

महोदय,

माझ्या सहा सहकाऱ्यांच्या वतीने, ज्यापैकी मी सुद्धा एक आहे, खालीलप्रमाणे स्पष्टीकरण या सुनावणीच्या सुरवातीलाच देणे आवश्यक आहे, याची नोंद केली जावी असे आम्हाला वाटते.

हे सरकार न्यायावर आधारित व कायदेशीरपणे स्थापित असल्याचे आम्ही मानत नाही व त्यामुळे खटल्याच्या कोणत्याही कार्यवाहीत भाग घेऊ इच्छित नाही. आमच्या विचारांनुसार आम्ही घोषित करतो की ‘संपूर्ण शक्तीचा आधार मनुष्य आहे. कोणतीही व्यक्ति किंवा सरकारला अशा कोणत्याही शक्तीचा अधिकार नाही जी जनतेने त्यांना दिली नसेल’. कारण हे सरकार या सिद्धांतांच्या अगदी उलट आहे आणि म्हणूनच हिचे अस्तित्वही उचित नाही. राष्ट्रांना लुटण्यासाठी एकजूट होतात अशा सरकारांच्या तलवारीच्या बळाशिवाय इतर कोणताही आधार नसतो. म्हणूनच ती  हिंस्त्र शक्तिनिशी मुक्ति व स्वातंत्र्याचे विचार आणि लोकांच्या योग्य इच्छा दडपून टाकतात.

आमचा विश्वास आहे की, अशी सरकारे विशेषतः इंग्रज सरकार जी असहाय्य आणि असहमत भारतीय राष्ट्रावर लादली गेली आहे, जीने सर्रास खून करण्यासाठी व लोकांना विस्थापित करण्यासाठी सर्व शक्ति एकवटली आहे अशी गुंड, दरोडेखोरांची आणि लूटमार करणाऱ्यांची टोळी आहे. शांतता व सुव्यवस्थेच्या नावावर ते विरोधकांना व त्यांचा रहस्यभेद करणाऱ्यांना दडपून टाकते.

आमचा असाही विश्वास आहे की, साम्राज्यवाद एका मोठ्या दरोडेखोरीच्या षडयंत्राशिवाय दुसरे काहीही नाही. साम्राज्यवाद माणसाकडून माणसाच्या व राष्ट्राकडून राष्ट्राच्या शोषणाचे अत्युच्च टोक आहे. साम्राज्यवादी त्यांचे हित आणि लुटीच्या योजना पूर्ण करण्यासाठी केवळ न्यायालये व कायद्याचेच मुडदे पाडत नाहीत, तर भयंकर हत्याकांडेही आयोजित करतात. शोषणप्रक्रिया पूर्णत्वास नेण्याकरिता युद्धासारखे भयंकर अपराध सुद्धा करतात. जेथे कुठेही लोक त्यांच्या नादिरशाही शोषणकारी मागण्या मान्य करत नाहीत किंवा त्यांच्या उध्वस्त करणाऱ्या व घृणास्पद षडयंत्रांना निमूटपणे मान्य करत नसतील तर त्यांना निरपराधांचे रक्त वाहवण्यात संकोच वाटत नाही. शांतता व सुव्यवस्थेच्या आड ते शांतता भंग करतात. गोंधळ निर्माण करून लोकांचे खून अर्थात शक्य होईल तेवढी दडपशाही करतात.

आम्ही असे मानतो, की स्वातंत्र्य हा प्रत्येक मनुष्याचा न हिरावता येणारा हक्क आहे. प्रत्येक मनुष्याला त्याच्या श्रमाचे फळ प्राप्त करण्यासारखे सर्व प्रकारचे हक्क आहेत आणि प्रत्येक राष्ट्र त्याच्या मुलभूत नैसर्गिक संसाधनांचे पूर्ण मालक आहे. जर एखादे सरकार जनतेला तिच्या या मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवत असेल तर अशा सरकारला मुळातून उपटून फेकणे हा जनतेचा केवळ अधिकारच नव्हे तर ते आवश्यक कर्तव्यही ठरते. कारण ब्रिटिश सरकार आम्ही लढत असलेल्या सिद्धांतांच्या पुर्णपणे विपरीत आहे. म्हणून ज्याही पद्धतीने देशात क्रांति केली जाईल व या सरकारचा पुर्णपणे नायनाट केला जाईल असे कोणतेही प्रयत्न आणि अवलंबण्यात येणाऱ्या सर्व पद्धती नैतिकदृष्ट्या योग्यच आहेत, असे आमचे ठाम मत आहे. आम्ही वर्तमान संरचनेच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक परिवर्तन आणू इच्छितो. आम्ही वर्तमान समाजाचे पुर्णपणे एका नव्या सुसूत्र समाजात रूपांतर करू इच्छितो. अशा प्रकारे माणसाकडून माणसाचे शोषण अशक्य करून सर्वांसाठी सर्वच क्षेत्रांमध्ये पूर्ण स्वातंत्र्य हमीकारक बनवले जावे. जोपर्यंत संपुर्ण सामाजिक रचना बदलली जात नाही व त्या ऐवजी समाजवादी समाजाची निर्मिती केली जात नाही, तोपर्यंत संपुर्ण जग एका उध्वस्तकारी वादळी संकटात आहे, असे आम्हाला वाटते.

जेथवर शांततेच्या अथवा इतर मार्गाने क्रांतिकारक आदर्शांच्या स्थापनेचा संबंध आहे, त्याची निवड तत्कालीन शासकांच्या मर्जीवर अवलंबून आहे, असे आम्ही जाहीर करतो. क्रांतिकारक त्यांच्या मानवी प्रेमाच्या गुणांमुळे मानवतेचे पुजारी आहेत. आम्हाला न्याय व समताधिष्ठित शाश्वत आणि खरीखुरी शांतता हवी आहे. आम्ही निर्बुद्धतेतून जन्मास येणाऱ्या आणि भाले व बंदुकांच्या जोरावर जीवंत राहणाऱ्या खोट्या व दिखाऊ शांततेचे समर्थक नाहीत.

क्रांतिकारक जर बाँब आणि पिस्तुलांचा आधार घेत असतील तर ते केवळ अतिशय आवश्यकतेपोटीच, आणि तोही शेवटचा पर्याय म्हणुन. शांतता आणि कायदा माणसासाठी असतो, माणुस शांतता आणि कायद्यासाठी नसतो, असे आमचे मत आहे.

फ्रांसच्या उच्च न्यायाधीशांचे हे मत योग्यच आहे की, कायद्याची आंतरिक भावना स्वातंत्र्य समाप्त करणे किंवा त्यांस प्रतिबंध करणे नव्हे तर स्वातंत्र्य अबाधित राखणे व त्यात भर घालणे ही आहे. सरकारला कायदेशीर शक्ति केवळ अशाच योग्य कायद्यांनी मिळेल जे सामूहिक हितांसाठी तयार करण्यात आले असतील आणि ज्यांच्याकरिता ते बनवले गेले अशा जनतेच्या आकांक्षा ज्यांचा आधार असेल. यातून कायदे बनवणाऱ्यांसहित कोणीही कक्षेबाहेर असू शकत नाही.

जोपर्यंत कायद्यात जनतेचे हृदय (काळीज) अर्थात भावना प्रतिबिंबीत होते, तोपर्यंतच कायद्याचे पावित्र्य जपले जाऊ शकते. ते जेव्हा शोषणकारी समुहाच्या हातातील एक हत्यार बनते तेव्हा ते पावित्र्य आणि महत्व गमावून बसते. न्याय प्रदान करण्यासाठी मूळ बाब अशी आहे की सर्व प्रकारचे लाभ व हितांचा अंत झाला पाहिजे. कायद्याकडून सामाजिक गरजांची पूर्तता बंद होता क्षणीच तो जुलूम आणि अन्याय वाढवण्याचे हत्यार बनतो. असे कायदे सुरू ठेवणे हे सामूहिक हितांवर विशिष्ठ हितांच्या अहंकारयुक्त बळजबरी शिवाय दुसरे काहीही नाही.

वर्तमान सरकारचे कायदे परदेशी शासनाच्या हितार्थ आणि आम्हा लोकांच्या हिताविरुद्ध राबतात. म्हणुन त्यांचे कोणत्याही प्रकारचे सदाचार्य आमच्यावर लागू होत नाही.

त्यामुळे या कायद्यांना आव्हान देणे आणि त्यांचे उल्लंघन करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी ठरते. शोषणाचा भाग असलेले इंग्रज न्यायालय न्याय देऊ शकत नाही. खासकरून जेथे सरकार आणि लोकांचे हित विरुद्ध आहेत अशा राजकीय क्षेत्रांमध्ये. हे न्यायालय न्यायाच्या ढोंगाशिवाय दुसरे काहीही नाही, हे आम्हाला ठाऊक आहे.

याच कारणांमुळे आम्ही सहभागी होण्यास नकार देत आहोत आणि या खटल्याच्या कार्यवाहीत भाग घेणार नाही.

५ -५ -३०

न्यायाधीशांनी नोंद केली: ‘हे रेकार्डमध्ये तर ठेवावे परंतु यात काही न आवडणाऱ्या बाबी लिहीलेल्या असल्यामुळे ह्याची प्रत देण्यात येऊ नये.’