मृत्युदंडाविषयी

रोबेस्पियर

 

फ्रेंच राज्यक्रांतीचे एक नेते, वकील व महान लोकशाहीवादी क्रांतिकारक रोबेस्पियर यांनी मृत्युदंड समाप्त करावा यासाठी २२ जून १७९१ रोजी फ्रांसच्या घटना सभेत अतिशय मुद्देसूद केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद प्रस्तुत करीत आहोत.

एथेन्समध्ये ही बातमी पोहचली की अर्गोस शहरातील नागरिकांना मृत्युदंड दिला गेला तेव्हा तेथील लोक घाबरून मंदिरांमध्ये  गेले व त्यांनी देवतांना अशा आणा भाकल्या की एथेन्सच्या लोकांना अशा भयंकर व क्रूर विचारांपासून वाचवावे. माझे आवाहन देवतांना नाही, देवत्वाच्या शाश्वत नियमांचे जे संचालक व भाष्यकार आहेत त्या कायदे निर्मात्यांना आहे, की न्यायिक हत्यांचे दिग्दर्शन करणाऱ्या व नव्या संविधानाला अमान्य करणाऱ्या खूनी कायद्यांना फ्रांसच्या संविधानातून पुसून टाकावे. मी त्यांच्या  समोर हे सिद्ध करू इच्छितो की, १) मृत्युदंड सारतः अन्याय आहे आणि २) हा दंडांमध्ये सर्वात दमनकारी नाही व अपराध रोखण्याऐवजी त्यात वृद्धी करतो.

नागरी समाजाच्या परिघाबाहेर जर एक कडवा शत्रू माझे जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो किंवा मी उगवलेल्या पिकाला नष्ट करण्यासाठी वारंवार परत येतो, तेव्हा त्याचा प्रतिकार करण्यासाठी मला केवळ माझ्या वैयक्तिक शक्तीचाच आधार असल्याने त्याला अनिवार्यतः नष्ट करावे लागेल किंवा त्याला संपवावे लागेल आणि नैसर्गिक संरक्षणाचा नियम मला औचित्य व स्विकृती प्रदान करतो. परंतु समाजात जेव्हा सर्वांची शक्ति केवळ कुण्या एका व्यक्तिविरुद्ध एकवटते तेव्हा न्यायाचे कोणते तत्व त्याच्या हत्त्येस मान्यता देऊ शकते? कोणती अनिवार्यता याला दोषमुक्त करू शकते? आपल्या बंदी शत्रुची हत्त्या करणार्‍या विजेत्याला क्रूर म्हटले जाते. कुण्या बालकाला शक्तिहीन करून त्याला शिक्षा करण्याचे सामर्थ्य बाळगतो अशा प्रौढ व्यक्तीने जर त्याची हत्त्या केली तर त्याला राक्षस समजले जाते! समाजाकडून शिक्षा देण्यात आलेला आरोपी एक पराजित व शक्तिहीन शत्रुशिवाय काही नाही व एका प्रौढासमोरील बालकापेक्षाही असहाय्य आहे.

 

आणि म्हणुन ज्यांना हे विधीपूर्वक आदेशित करतात ते मृत्युचे हे देखावे सत्य आणि न्यायाच्या नजरेतून भ्याड खुनांशिवाय दुसरे काही नाही. हे केवळ काही व्यक्तींऐवजी संपूर्ण राष्ट्रांनी कायदेशीर पद्धतीने केलेले भयंकर अपराध आहेत. कायदे मग ते कितीही निर्दयी व वैभवशाली का असेनात! आश्चर्य वाटू देऊ नका, हे निवडक उत्पीडकांच्या कारवायांशिवाय दुसरे काही नाही. ज्यांनी मानव समाजाला अधःपतित केले जाते, ह्या अशा श्रुंखला आहेत. ह्या अशा भुजा आहेत, ज्यामुळे त्याला गुलाम केले जाते, हे कायदे रक्ताने लिहिले गेले आहेत.

 

कोणत्याही रोमन नागरिकाला मृत्युदंड देणे वर्ज्य होते. हा जनतेने तयार केलेला कायदा होता. परंतु जेत्या स्काईलाने म्हटले: ज्यांनी माझ्या विरोधात शस्त्रे उचललीत ते सर्व मृत्यूस पात्र आहेत. ओक्टाव्हियन व अपराधात सहभागी असलेल्या त्याच्या सहकार्‍यांनी ह्या नव्या कायद्याचे समर्थन केले.

तिबेरियसच्या हुकूमतीत ब्रूटसचे गुणगान करणे हा मृत्युस पात्र असा अपराध होता. ज्यांनी ज्यांनी सम्राटाच्या चित्रासमोर नग्न होण्याचे धारिष्ट्य केले त्या सर्वांना कालिगुलाने मृत्युदंड दिला. जे कधी अवज्ञा किंवा पराक्रमी कृत्य मानले जाई त्या राजद्रोहाच्या अपराधाचा शोध एकदा जर जुलूमशहांनी लावला तर मग स्वतःला राजद्रोहाच्या कृत्याचा भागीदार बनवल्याशिवाय कोण हा विचार करण्याचे धाडस करु शकत होता की त्यांना मृत्युदंडापेक्षा थोडी कमी शिक्षा मिळावी?

अज्ञान आणि जुलूमशाहीच्या अघोरी ऐक्यातून जन्मास आलेल्या अतिरेकी श्रद्धेने जेव्हा दैवी राजद्रोहाच्या अपराधाचा शोध लावला, जेव्हा त्याने आपल्या बुद्धीविभ्रमात स्वतःच ईश्वराचा सूड घेण्याचा निश्चय केला, तेव्हा हे आवश्यक नव्हते का की त्याने आपले रक्त अर्पावे आणि स्वतःला ईश्वराचे रूप मानणार्‍या अधम श्रेणीत पोहचवावे?

प्राचीन रानटी कायद्याचे समर्थक म्हणतात की मृत्युदंड अनिवार्य आहे, ह्याच्याशिवाय अपराधांवर अंकुश लावणे शक्य नाही. हे तुम्हाला कुणी सांगितले? ज्यांच्या आधारे दंडात्मक कायदा मनुष्याच्या संवेदनेवर कार्य करू शकतो त्या सर्व अंकुशांचे तुम्ही आकलन केले आहे?  खेद आहे, मृत्युच्या आधी मनुष्य किती शारीरिक व नैतिक कष्ट सहन करु शकतो?

जगण्याची इच्छा ही हृदयावर राज्य करणार्‍या उत्कट भावनांपैकी सर्वात प्रबळ असलेल्या स्वाभिमानासमोर नतमस्तक होते. अपमानित होणे, सार्वजनिक तिरस्कारास पात्र ठरणे ही सामाजिक माणसास सर्वात मोठी शिक्षा आहे. कायद्याचे निर्माते जर नागरिकाला एवढ्या सार्‍या नाजुक जागांवर अनेक प्रकारे घाव घालू शकतात तर मग त्यांनी मृत्युदंडाचा उपयोग करण्याच्या पातळीपर्यंत खाली का यावे? दंड हा दोषींना यातना देण्याकरिता नसतो, तर त्याच्या भयाने अपराधांवर अंकुश लावण्यासाठी तो दिला जातो.

जे कायद्याचे निर्माते वारंवार क्रूर शिक्षा देऊन आपल्या शिष्यांचा आत्मा मलिन व अपमानित करणार्‍या ढोंगी गुरुप्रमाणे मृत्यु आणि घातक शिक्षांना इतर पद्धतींपेक्षा प्राधान्य देतात, ते जनभावना दुखावतात आणि शासितांमधील आपली नैतिक प्रतिमा कमकुवत करतात. ते अधिकच जास्त जोराने दाबून सरकारच्या स्प्रिंगांना ढीले व कमकुवत करून टाकतात.

 

मृत्युदंडाचा कायदा स्थापित करणारे कायदा निर्माते या उपयोगी तत्वाचा निषेध करतात की एखाद्या अपराधास दडपण्याची योग्य पद्धत त्या उत्कट भावनांच्या स्वभावधर्मानुसार दंड निश्चित करणे आहे, जी अपराध जन्मास घालते. मृत्युदंडाचा कायदा त्या सर्व विचारांना उधळून लावतो, सर्व संबंध विस्कटून टाकतो आणि अशा प्रकारे दंडात्मक कायद्याच्या उद्देशाचा उघडपणे निषेध करतो.

 

तुम्ही म्हणता मृत्युदंड अनिवार्य आहे. हे जर सत्य आहे तर मग बर्‍याच लोकांना ह्याची गरज का पडली नाही? कोणत्या प्रारब्धामुळे असे लोकच सर्वात बुद्धिमान, सर्वात आनंदी आणि सर्वात स्वतंत्र  होते? मृत्युदंडच जर मोठ्या अपराधांना रोखण्यासाठी सर्वात योग्य आहे तर जिथे हा स्वीकारला गेला आणि उपयोगात आणला गेला तेथे असे अपराध तेथे सर्वात कमी असायला पाहिजेत. परंतु वास्तव अगदी उलट आहे. जपानकडे पहा: तेथल्यापेक्षा जास्त मृत्युदंड आणि यातना अन्य कुठेही दिल्या जात नाहीत, तेथल्यापेक्षा अधिक संख्येने व घातक अपराध इतर कुठेही होत नाहीत. कुणी म्हणू शकते की जपानी लोक रानटीपणात जुलमी व  संतापदायक कायद्यांना आव्हान देऊ इच्छितात. जेथे शिक्षा मवाळ होत्या व जेथे मृत्युदंड एक तर कमी होते किंवा नव्हतेच, त्या युनानी प्रजासत्ताकांमध्ये खूनी कायद्यांद्वारे शासित देशांपेक्षा अपराध जास्त व सदाचार कमी होते? अत्याचारांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या स्काईलाच्या काळात जेव्हा सर्व कठोर कायदे परत आणले गेले होते त्या तुलनेत पोर्सियन कायद्याच्या वैभवशाली काळात रोममध्ये सर्व कठोर कायदे रद्द करण्यात आले होते तेव्हा जास्त अपराध होत होते, असे तुम्हाला वाटते का? रशियाच्या जुलमी शासकाने मृत्युदंड बंद केला तेव्हा तेथे कोणत्या तरी प्रकारचे संकट उद्भवले? असे वाटते की अशा प्रकारची मानवता व तत्वज्ञान प्रदर्शित करून ते लक्षावधी लोकांना आपल्या जुलमी सत्तेच्या जोखडाखाली ठेवण्याच्या अपराधातून दोषमुक्त होऊ पाहतात.

न्याय आणि विवेकाचे म्हणणे समजून घ्या. ते तुम्हाला ओरडून  सांगत आहेत की मानवी निर्णय कधीही एवढे निश्चित नसतात की चुका करू शकणारे काही मनुष्य कुण्या इतर व्यक्तीच्या मृत्युसंदर्भात निर्णय करण्याच्या औचित्याचे प्रतिपादन करू शकतील. तुम्ही सर्वांकडून संपुर्ण न्यायिक निर्णयांची अपेक्षा जरी केली, तुम्ही सर्वात ज्ञानी व ईमानदार न्यायाधीशांची व्यवस्था जरी केली तरी चुकांची शक्यता कायम राहते. तुम्ही ह्या चुका दुरुस्त करण्याच्या अवजारांपासून स्वतःला वंचित का करू इच्छिता? कुण्या उत्पीडित निर्दोष माणसाची मदत करण्यास स्वतःला अक्षम का बरे बनवू पाहता? कुण्या अदृश्य सावलीसाठी, कुण्या अचेतन राखेसाठी तुमच्या वांझोटया पश्चातापाला, तुमच्या भ्रमित चुका सुधारण्याला काही अर्थ आहे? ते तुमच्या दंडात्मक कायद्याच्या क्रूर तत्परतेचे दुःखद पुरावे आहेत. अपराधांना पश्चाताप व चांगल्या कार्यांनी सुधारू शकण्याच्या शक्यता कुण्या व्यक्तिपासून हिरावून घेणे, त्याचे चांगुलपणाकडे परतीचे सर्व मार्ग निर्दयपणे बंद करणे, त्याच्या अपराधांनी अजूनही कलंकित असलेले त्याचे पतन शीघ्रतेने  कबरीपर्यंत पोहचवणे हे माझ्या मते क्रोर्याचे सर्वात भयंकर शुद्धीकरण आहे.

 

सर्व स्वातंत्र्ये आणि सर्व सामाजिक आनंदांचे मूळ उगमस्थान असलेल्या सार्वजनिक  नैतिक मूल्यांची स्थापना करणे व ती कायम राखणे हे एका कायदा निर्मात्याचे सर्वात प्रथम कर्तव्य आहे. एखादे विशिष्ट उद्दीष्ट गाठण्याच्या प्रयत्नात जर त्याला  सर्वसाधारण व आवश्यक उद्दिष्टांचा विसर पडत असेल तर तो सर्वात गावंढळ व भयंकर चुक करतो. म्हणून राजाने लोकांसमोर न्याय आणि विवेकाचे सर्वात आदर्श उदाहरण प्रस्तुत केले पाहिजे.

 

जर ह्याचे गुण वर्णन करणार्‍या शक्तिशाली, शांत आणि उदार सक्तीऐवजी क्रोध आणि सूडभावना अमलात आणत असतील, जर ते अनावश्यक मानवी रक्त वाहवत असतील व जे वाचवले जाऊ शकत होते आणि जे वाहवण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, आणि ते लोकांसमोर  क्रूर दृश्ये व यातनांनी विकृत प्रेते सादर करीत असतील तर ते नागरिकांच्या मनात न्याय व अन्यायविषयक त्यांचे विचार बदलवून टाकतात. ते समाजात अशा भयंकर  दुराग्रहांचे बी रोवतात जे अधिकाधिक वाढत जातात. जेव्हा माणसाचे जीवन एवढ्या सहजपणे संकटात टाकले जाऊ शकते तेव्हा माणूस हा माणूस असण्याची प्रतिष्ठा गमावून बसतो. जेव्हा कायदा स्वतःच ह्याला एक उदाहरण व तमाशाप्रमाणे प्रस्तुत  करतो तेव्हा हत्त्येचा विचार एवढा भितीदायक राहत नाही. जेव्हा त्याला आणखी एका अपराधाच्या माध्यमातून दंड दिला जातो तेव्हा अपराधाची भयानकता कमी होते. कोणत्याही शिक्षेच्या प्रभावाला त्याच्या कठोरतेवरुन मोजू नका. ह्या दोन्ही परस्परांच्या अगदी उलट बाजू आहेत: प्रत्येक जण मवाळ कायद्यांना सहकार्य करतो. प्रत्येक जण कठोर कायद्यांविरुद्ध कट करतो.

हे दिसून आले आहे की स्वतंत्र देशांमध्ये अपराध कमी आहेत आणि दंडात्मक कायदे जास्त सुसह्य आहेत. एकूणच जेथे  व्यक्तीच्या अधिकारांचा आदर केला जातो व याच्या परिणामी जेथील कायदे न्यायपूर्ण आहेत ते स्वतंत्र देश आहेत. जेथे अतिशय  कठोरपणे मानवतेचे उल्लंघन केले जाते तो या बाबीचा पुरावा आहे की तेथे माणुसकीच्या प्रतिष्ठेला अजून ओळखले गेले नाही, तो या गोष्टीचा पुरावा आहे की तेथे कायद्याचा निर्माता मालक आहे जो गुलामांना संचालित करतो व मनात येईल तेव्हा त्यांना शिक्षा करतो. म्हणून माझा निष्कर्ष आहे की मृत्युदंड समाप्त करावा.