‘आर्टिकल १५’:वर्गाची फोडणी – जातीचा मसाला

ज्याला भारतीय चित्रपट असं म्हटलं जातं,तो खरं तर भारतातील चित्रपट असतो. त्यात भारतीय वगैरे असं काही नसतं. त्यात ‘जात’ही भारतातील प्रमुख समस्या हाताळलेली नसतेच व कधी हाताळलीच तर त्या मागचं मुख्य कारण ‘मार्केट’असतं. ‘अछुत कन्या’आणि नंतर ‘सुजाता’या चित्रपटांनी कधी काळी जाती व्यवस्थेला स्पर्श केला म्हणून चित्रपट इतिहासात त्यांची दखल घेतली जाते. मधल्या काळातही जातीला हात घालणारे काही चित्रपट आले. १९६० च्या दशकापर्यंत चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांना काही सामाजिक भान नक्कीच होते. ‘इप्टा’शी संबंधित कलावंतांनी तो काळ गाजवला असल्याने तसं होणं अगदी साहजिक होतं. आज मोठ्या कार्पोरेट घराण्यांनी क्षेत्रात सुद्धा मुसंडी मारली आहे. त्यांच्यापैकी एक असलेल्या झी स्टूडियोची निर्मिती ‘आर्टिकल १५’ची चर्चा मोठया जोरात व जोमात सुरू आहे. त्याला कारणही तसंच आहे. ‘जात’विषयाला स्पर्श करणारे केवळ २ टक्के चित्रपट निर्माण होत असताना हा विषय केंद्रस्थानी ठेवून बनवलेला चित्रपट म्हणजे ‘आर्टिकल १५’. झुंडबळी हीच संस्कृती ठरवली जात असताना हे शीर्षक अनेकांना मोहात पाडते यात नवल ते काय? आणि आपल्याकडे भावनिकतेची वानवा तरी कुठं आहे?काहीही असो,पण हा चित्रपट सामान्य आणि मध्यमवर्गीय समताकांक्षी प्रेक्षकांवर गारुड करतो एवढं मात्र खरं.

कहब त लगीजाइ धक से
कहब त लगी जाइ धक से

बड़े बड़े लोगन के महला-दुमहला
और भइया झूमर अलग से

बड़े बड़े लोगन के हलुआ पराठा
और मिनरल वाटर अलग से

हमरे गरीबन के चटनी औ रोटी
पानी पीएं बालू वाला नल से

हमरे गरीबन के झुग्गी-झोपड़िया
आंधी आए गिर जाए धड़ से
कहब त लगीजाइ धक से

भाकप (माले) पक्षाशी संलग्न जन संस्कृती मंच आणि हिरावल या सांस्कृतिक संघटनांद्वारे नेहमी गायल्या जाणार्‍या या गीताने चित्रपटाची सुरुवात होते. त्यामुळे सुरुवातीलाच विषमतेबद्दल घृणा असणार्‍या सामान्य प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवणं चित्रपटाला सोपं जातं आणि पुढे चांगल्या पद्धतीनं रचलेल्या दृष्यांच्या व लोकेशन्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या हळव्या भावना आणखी हळुवारपणे कुरवाळल्या जातात.

अलिकडे देशात गाजलेल्या दोन दलित मुलींवरील सामूहिक बलात्कार व त्यांची हत्या,ऊना प्रकरण,रोहित वेमुलाची संस्थागत हत्या,भीम आर्मीचे नेते चन्द्रशेखर आजाद यांची अटक अशा अनेक घटना व त्यासंबंधात झालेली आंदोलनं यांचं सुरेख विणकाम लेखक व दिग्दर्शकाला चांगलं जमलं आहे. त्यासाठी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. मनोज पाहवा आणि सयानी गुप्तासारख्या एफ.टी.आय.आय. मधून अनेक प्रशिक्षित कलावंतांच्या अभिनयानं चित्रपट अधिकच उठावदार झाला आहे. अतिशय कौशल्यपूर्ण चित्रीकरण सुद्धा दृश्यांमध्ये श्वास ओततं. डुक्कर तलावात पूजाला शोधण्यास उतरलेल्या समुहाचं चित्रीकरण तर अद्भुत असंच आहे. परंतु यात संवादांचं सुद्धा मोठं योगदान आहे. ते देशात घडणार्‍या इतर सामाजिक व राजकीय घटनांची आठवण प्रेक्षकांना सतत करून देत राहतात.

यात एक पात्र आहे निषाद. (उत्तर भारतात निषाद ही दलितांची एक जात सुद्धा आहे.) दलितांवरील अत्याचाराचा त्याला प्रचंड राग आहे. त्याचं बंदुकीच्या जोरावर अपहरण केलं जाते तेव्हा त्याचं अंतर्मन रोहित वेमूलाच्या शेवटच्या पत्रातील अगतिकता दर्शवणार्‍या ओळी बोलत असतं. पुढे ते म्हणतं,जेवढे लोक सीमेवर बलिदान देतात त्यापेक्षाही जास्त बलिदान गटार साफ करताना दिलं जाते. परंतु त्यांना कधी कुणी श्रद्धांजली वाहत नाही. त्याच्या अंतर्मनाचं असं बोलणं सुरूच राहते. ‘मला काही झालं तर तुम्हाला क्रोध येईल. त्याच क्रोधाला शस्त्र बनवायचं,परंतु त्या व्यतिरिक्त कोणतंही शस्त्र आड येता कामा नये मित्रांनो! कारण ज्या दिवशी आपण लोक हिंसेच्या मार्गावर वाटचाल करु तेव्हा आपल्याला मारणं त्यांना आणखी सोपं होईल.’व्वा!  क्या बात है! हे स्वगत ‘आपल्या मर्यादेत राहून चला,पुढे भीम आर्मी आहे’,असे फलक प्रत्यक्षात लावलेल्या संघटनेची व तिच्या नेत्याची प्रतिमा कलात्मकरित्या कसं मलिन करते,हे कळत सुद्धा नाही. निषाद हे पात्र आंबेडकरी आहे गांधीवादी नव्हे,याचाही प्रेक्षकांना विसर पडतो हे चित्रपटाचं मोठं कौशल्य आहे.

जाटव आणि मयंक जात असताना त्यांच्या जीपवर आगीचा गोळा फेकला जातो व जाटवला समज देवून सोडून दिलं जाते. हे करवणारा निषाद असतो,मग इथं जाळपोळ हिंसा कशी ठरत नाही?पोलिस अधीक्षक निषादची प्रेयसी गौराला विचारतो तेव्हा ती उत्तर देते, ‘बहिर्‍यांना ऐकवण्यासाठी मोठ्या आवाजाची गरज असते,हे भगत सिंगानं १९२९ सालीच म्हटलं होतं. हे मी नवव्या वर्गात नागरिकशास्त्रात वाचले आहे. निषादने जरा जास्तच वाचले आहे.’याचा अर्थ त्याला हिंसेची गरज केव्हा भासते व तिचा वापर कसा करावयाचा याचं चांगलं ज्ञान आहे. मग त्याचं बोलणं आणि वागणं असं विरोधाभासी कसं?याचं कोणतंही स्पष्टीकरण चित्रपट देत नाही.

‘जात कोणतीही असू द्या,परंतु हा हिंदूंनी एकत्र येण्याची वेळ आहे… आणि खरा शत्रू ओळखण्याचीही वेळ आहे.’असं महंत सांगतो तेव्हा त्याच्याबरोबर दलितांचे तथाकथित राजकीय पुढारीही असतात. हे उत्तर प्रदेशातील अलिकडच्या काळात घडलेलं राजकारण आठवते.

एका दृष्यात नायक सीबीआय अधिकार्‍याला विचारतो, ‘हिंसा कोण करत आहे,सर?कधी कधी बाहेर दिसणार्‍या हिंसेमागे एक अशी हिंसा असते जिच्याबद्दल कोणीही बोलत नाही. ती आमच्या संस्कृतीचा भाग बनते. तिला आम्ही हिंसा म्हणत नाही… सामाजिक व्यवस्था म्हणतो.’

‘आग लागली असेल तर तटस्थ राहण्याचा अर्थ होतो सर,की आपण त्यांच्या सोबत उभे आहोत जे आग लावत आहेत.’

‘आमच्या कामोड्समध्ये आता जेट स्प्रे लागलेत सर… परंतु हे आजही सफाईसाठी मेनहोल मध्ये नग्न उतरतात.’

असे कितीतरी संवाद प्रेक्षकांना सुखावतात. असे वास्तव मांडणारे चित्रपट फार कमी पाहण्यात आले,परंतु हा चित्रपट वेगळा आहे याचं समाधान प्रेक्षकाला मिळतं.

काही संवाद व दृष्ये खरोखरच मनःपटलावरून पुसल्या गेलेल्या महितीला जागवण्याचे कार्य करतात. बसप आणि भाजप यांची हातमिळवणी, आदित्यनाथांचं दलितांसोबत सहभोजनाचं प्रदर्शन, दलित नेत्यांसोबत हिंदू ऐक्याच्या नावावर केलेल्या मोहिमा,जातीवर होणारे मतदान,प्रत्येक समूहातील जातीय उच्च-नीचता या सर्व बाबींवर चित्रपट माहिती जागवणारं भाष्य करतो. खरं तर हे वास्तव भारतातल्या सर्वांनाच माहीत आहे. पण प्रश्न आहे हे वास्तव बदलण्याचा. यावर उत्तर काय,तर चित्रपट सांगतो संविधानाचं ‘आर्टिकल १५’.

मार्क्स म्हणतो, ‘कामगार वर्गाची मुक्ति हे कामगार वर्गाचं कर्तव्य आहे.’बाबासाहेब आंबेडकर सांगतात, ‘दलितांची मुक्ति हे दलित वर्गाचं कर्तव्य आहे.’पण चित्रपट सांगतो,दलितांची मुक्ति ब्राम्हण जात-वर्गाकडून होईल. चित्रपटाचा नायक अयान रंजन हा उदारमतवादी ब्राम्हण तरुण आहे,दलित युवक निषाद नव्हे. ‘कहब तो लग जाइ धक से’हे जागृती गीत गाणारे दलित संपूर्ण चित्रपटात अगदी लाचार आहेत. एवढा जुलूम होत असताना त्यांचा सामूहिक प्रतिरोध कुठंच दिसत नाही. पूजाला शोधण्याचा साधा प्रयत्नही दलित किंवा त्यांची संघटना करत नाही, नायक तो प्रयत्न अत्यंत पोटतिडीकेनं करतो. ‘बहिर्‍यांना ऐकवण्यासाठी प्रचंड आवाजाची गरज असते’,भगत सिंगाचं हे तत्वज्ञान सांगणारी गौरा सुद्धा पुजाला अँब्युलंसमध्ये शेवटी हात जोडते तेव्हा त्याचा अर्थ असतो, ‘तु’होतास म्हणून पूजा परत मिळाली,खूप खूप आभार! दलित संघटनेचा नेता सारं काम करतो छुप्या पद्धतीनं. ती त्याची तत्कालीन गरज असली तरी संघटना लोकांपासून कधीच गुप्त नसते. संघटनेच्या सकारात्मक कामाची किंवा प्रतिरोधाची काही सार्वजनिक दृष्ये चित्रपटात असू शकत नव्हती? एकदा भेटीत नायक निषादला बाबासाहेबांच्या उल्लेखासह संवैधानिक तरतुदींचा गौरव करतो तेव्हा ‘त्याच बाबासाहेबांनी हे संविधान जाळणारा मी पहिला माणूस असेल,हे सुद्धा म्हटलेलं आहे.’असं निषादचं प्रत्युत्तर असते. एवढी राजकीय दृष्टी असलेला तरुण प्रत्यक्ष लढताना शहीद होत नाही. तो मारला जातो त्याच्या प्रेयसीच्या डोळ्यादेखत अपहरण करुन खोट्या चकमकीत. त्या हत्येबद्दल कोणी काही बोलत नाही. दलित युवकांनी नायक बनण्याचा प्रयत्न केला तर त्यांना संपवलं जाईल,त्यांची जागा घेण्यासाठी उच्चवर्णीय नायक आहे ना! हा संदेश चित्रपट देतो. मात्र आपण शेवटचे नाही आहोत,आपल्या नंतरही अनेक लोक आहेत असा आशावाद निषाद त्याच्या विसवसघातक मित्राला देतो,हा संवाद सुखवतो. सुरुवातीला नायकाची उच्चवर्णीय मैत्रीण एकदा नायकाला चॅट करते, ‘हीरो बनण्याची गरज नाही,पण अशी वेळ यावी की लोकांनी हिरोची वाट पाहू नये.’हे केवळ सांगण्यापुरतं राहिलं आहे,हे संपूर्ण चित्रपटात जाणवतं. फँड्रीतला एकटा जब्या प्रतिकारार्थ दगड भिरकावतो आणि येथे ती प्रतिक्रिया सामुहिकपणे सुद्धा दिसून येत नाही.

मागे एकदा दिल्लीच्या विश्व पुस्तक मेळयात एका मोठ्या प्रकाशकाने दुसर्‍या मोठ्या प्रकाशकाला थट्टेनं म्हटलं होतं, ‘शेठ,अलिकडे आंबेडकरांवर फारच पुस्तकं छापतायं. बरंच प्रेम उफाळून आलेलं दिसते आंबेडकरांवर! त्यावर त्या शेठने हसत उत्तर दिलं होतं, ‘नाही,तसं नाही. अलिकडे आंबेडकरांवरची पुस्तकं फार विकली जातात. त्यामुळे आतमध्ये काहीही लिहिलेलं असलं आणि मुखपृष्ठावर आंबेडकरांचं चित्र असलं की ते हातोहात विकलं जाते.’ शेठ अगदी खरं बोलला होता. चित्रपटांचंही अगदी तसंच आहे. व्यावसायिक चित्रपट निर्मिती सामाजिक कार्य नसते. झी स्टुडिओज किंवा रिलायन्स एन्टरटेनमेंट्स सारख्या कंपन्या मार्केटमध्ये सर्वात जास्त विकल्या जाऊ शकणार्‍या मालाची निर्मिती व वितरण करतात. आज दलितांमध्ये व उदारमतवादी उच्चवर्णीयांमध्ये सुद्धा चित्रपटांचं एक मोठं मार्केट निर्माण झालेलं आहे. देशात आज जे काही सुरू आहे,त्यांत आर्थिक गरजेपोटी अशा कंपन्यांचाही हातभार असतो. पण त्याच परिस्थितीतून मुक्त होऊ पाहणारा प्रेक्षक अशा चित्रपटांकडे खेचला जातो. व्यापार्‍यांना याचं गणित चांगलं जमते.

‘जात’विषयाला केंद्रस्थानी असलेली कथा व उत्तम दिग्दर्शन यासाठी लेखक-दिग्दर्शकाचे त्यांच्यावरील टीकेसहित अभिनंदन करायला हरकत नाही. चित्रपटात सुरुवातीला खमंग वर्गीय फोडणी घालून मस्तपैकी जातीचा मसाला वापरला आहे. असे झणझणीत व्यंजन अनेकांना रुचकर वाटते. सैराटची हवा सुद्धा अशीच भिनली होती.     चित्रपटात अनेक गंभीर उणिवा असल्या तरी पटकथा,संवाद,अभिनय आणि चित्रीकरण यासाठी हा चित्रपट अवश्य पहावा. पण या चित्रपटाच्या सादरीकरणातून समाजशास्त्रीयदृष्ट्या निष्कर्ष काढताना भावनिक होण्याऐवजी काळजी घेण्याची अतिशय आवश्यकता आहे.